आमचे मुख्यमंत्री -५५

खाजगी क्षेत्रांतील उद्योग शासनाकडून अनेक सवलती घेतात. म्हणून त्या क्षेत्राने अल्पसंख्यांकांना नोकरी देण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे व त्याकरता आपल्या पैशातून तजवीज केली पाहिजे अशी घोषणा त्यांनी केली आहे. त्याचबरोबर अल्पसंख्यांकांची व्याख्या शास्त्रशुध्द रीतीने केली पाहिजे असा त्यांचा आग्रह आहे.

व्यक्तित्व

अंतुले ह्यांच्या विषयी अनेक मते आहेत. काहींच्या मते त्यांची शैली विचित्र आणि धसमुसळी होती. त्यांच्याविषयी माधव गडकरी ह्यांनी भ्रष्टाचार्य अंतुले म्हणून एक पुस्तिका लिहिली आहे. काहींच्या मते ते एक अत्यंत धडाडीचे, भविष्याचे भान असलेले कार्यक्षम मंत्री होते. गडक-यांनी देखील त्यांची ही धडाडी आणि चटकन निर्णय घेण्याची क्षमता ह्याबद्दल त्यांची स्तुती केली आहे. ते महत्वाकांक्षी आहेत, परंतु तोंडाने फटकळ आहेत. त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे त्यांनी अनेक शत्रू निर्माण केले आहेत.

अंतुले गरिबीतून वर आलेले आहेत. गरिबांच्या प्रश्नांची त्यांना जाण आहे. त्यांच्यात काही विशेष गुण आहेत. त्यांची निर्णयक्षमता, निधमी दृष्टिकोन, कामाचा उरक, प्रखर बुध्दिमत्ता, उत्तम वक्तृत्व, व्यासंग, विद्वत्ता व हुशारी ह्या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. त्यांची विद्वत्तापूर्ण ग्रंथसंपदा आहे, उदा., Appointment of Chief Justice, Parliamentary Privileges, Mahajan Report ही विद्वतमान्य आहेत. त्यांना स्वास्थ्य मिळाले असते तर त्यांच्याकडून अजूनही उत्तम ग्रंथसंपदा निर्माण झाली असती. एक कर्तबगार व्यक्तीअसेचत्यांचेवर्णनकरावे लागेल.

टीप १९४८ साली बॅ. अंतुले इस्माईल युसुफ महाविद्यालयात विद्यार्थी होते. त्यावेळी मी तेथे अर्थशास्त्राचा प्राध्यापक होतो. – रायरीकर.

संदर्भग्रंथः

१)    सोपान गाडे – अंतुले, २००२, अविष्कार प्रकाशन, पुणे.
२)    माधव गडकरी – भ्रष्टाचार्य अंतुले, प्रकाशिक सौ. कुलकर्णी-गडकरी, कोहिनूर प्रकाशन,
       विलेपार्ले, मुंबई ५७.
३)    विश्वास मेहेंदळे – मला भेटलेली माणसे, १९९५, सिग्नेट पब्लिकेशन.
४)    पुण्यनगरी रविवार, ५-२-२००५.
५)    लोकराज्य माहिती व जनसंपर्क महासंचालनालय.