राजीनामा कशासाठी ?
सन १९५५ ची गोष्ट. मोरारजी देसाई द्विभाषिक मुंबई राज्याचे मुख्यमंत्री होते. संयुक्त महाराष्ट्राची मागणी जोर धरू लागली होती. संयुक्त महाराष्ट्र समितीने त्यासाठी विधानसभेसमोर निदर्शने केली. त्यानंतर चौपाटीवर झालेल्या मोरारजींच्या सभेतही दगडफेक झाली. दोन- तीन दिवसांनी विधानसभेवर आणखी एक मोर्चा नेण्याचा प्रयत्न झाला. तो प्रयत्न फसल्यामुळे शहरात अशांतता निर्माण झाली. पोलिसांच्या गोळीबारात दहा लोक ठार झाले. ऐंशी लोक जखमी झाले.
त्यावेळी महाराष्ट्र काँग्रेस पक्षात राजीनामे देण्याची मोहिम सुरू झाली. विधानसभेतील काँग्रेसच्या ९४ आमदारांनी राजीनामे दिले. राजीनामा देण्याची ही कल्पना शंकरराव देवांची होती व कृती भाऊसाहेब हिरे यांच्यामार्फत घडवून आणली जात होती. तसे पक्षाचे धोरण नव्हते किंवा आदेशही नव्हता. यशवंतरावांना प्रांताध्यक्ष देवगिरीकरांनी राजीनामा मागितल्यावर ते म्हणाले, ' अशा गोंधळाच्या पार्श्वभूमीवर राजीनामा देणे म्हणजे अराजकला निमंत्रण देणे ठरेल. शिवाय पक्षाचे तसे धोरणही नाही. तरीही प्रांताध्यक्षांना घाईच असेल तर त्यांनी माझ्याकडे तशी लेखी मागणी द्यावी , मी राजीनामा देण्यास तयार आहे.' यावर प्रांताध्यक्ष देवगिरीकरांनी प्रांताध्यक्ष या नात्याने राजीनामा मागण्यास नकार दिला. ते म्हणाले, ' तुमची इच्छा असेल तर राजीनामा द्या. मी फक्त राजीनामे गोळा करण्याचे काम करीत आहे.'
यशवंतरावांनी राजीनामा दिला नाही. पण नंतर ज्यांनी राजीनामे दिलेले आहेत त्यांचे राजीनामे स्वीकारावेत असा श्रेष्ठींचा आदेश आल्यावर राजीनामा देणारांची धावपळ सुरु झाली. यातून मार्ग काढण्यासाठी यशवंतरावांनाच पुढे यावे लागले. शेवटी चोवीस तासांतच या राजीनामा नाट्यावर पडदा पडला.