कथारुप यशवंतराव- मीही काही पालापाचोळा नाही !

मीही काही पालापाचोळा नाही  !

१० ऑक्टोबर १९५५ रोजी राज्य पुनर्रचना आयोगाचा अहवाल प्रसिद्ध झाला. आयोगाने मुंबईचे स्वतंत्र राज्य करण्याची शिफारस केली. यामुळे महाराष्ट्रात कमालीचा असंतोष निर्माण झाला. संयुक्त महाराष्ट्रासाठी जनतेने आंदोलन सुरू केले. यशवंतरावांना देखील संयुक्त महाराष्ट्र हवा होता, पण केंद्रीय नेतृत्वाचे मन वळवून महाराष्ट्र मिळवावा ही त्यांची भूमिका होती. पण त्यांच्या या भूमिकेचा विपर्यास करण्यात आला. विरोधकांनी त्यांना महाराष्ट्रद्रोही ठरवले. यशवंतरावांवर टीकेचे वादळ उठले. त्यांच्या राजकीय जीवनाची नौका हेलखावे खाऊ लागली. पण आश्चर्य म्हणजे याच काळात यशवंतरावांचा आत्मविश्वास प्रचंड वाढला.

आपली भूमिका योग्य आहे याची त्यांना पक्की खात्री होती . चहूबाजूंनी होणा-या टीकेला त्यांनी सांगली येथे झालेल्या जाहीर सभेत ठासून उत्तर दिले. सहसा आक्रमक भाषा न वापरणारे यशवंतराव आपल्या भाषणात म्हणाले, ' मला मुद्दाम बदनाम करायचे असेल तर तो उद्देश साध्य होईलही, पण सत्य बदनाम होणार नाही. एक वेळ अशी येईल की तुम्ही जाहीरपणे नाही पण निदान माझ्या कानात तरी कबूल कराल, की पंचावन्न - छपन्न साली तुम्ही जे सांगत होता ते बरोबर होतं. झगड्याने आणि वैराने असे रस्त्यावर भांडून मुंबई मिळणार नाही. मी जो राजकारणात आलो आहे, तो सेवेचा अधिकार घेऊन आलो आहे. मी तुम्हाला आवडत नसेन तर मला असेंब्लीत पाठवू नका, पण माझा सेवेचा अधिकार तुम्हाला हिरावून घेता येणार नाही. मीही काही पालापाचोळा नाही की विरोधाच्या फुंका-याने उडून जाईन. पंचवीस वर्षांचे माझे राजकीय जीवन लोकांच्या समोर आहे. त्याची जाहीर चौकशी करून घेण्यास मी तयार आहे. '

या तडाखेबंद भाषणाने यशवंतरावांच्या अफाट मनोधैर्याची कल्पना विरोधकांना व जनतेलाही आली.