जगावेगळी संक्रांत.
सन १९५४ सालच्या जानेवारी महिन्यात यशवंतराव काँग्रेसच्या अधिवेशनासाठी हैदराबादला गेले होते. अधिवेशनातील कामकाज संपल्यावर संध्याकाळी ते शहरात फिरायला गेले. रात्री नऊ वाजता जेवणासाठी ते परत आले. जेवणाला जाण्यापूर्वी त्यांना कोणीतरी तिळगूळ दिला. मग एकदम त्यांना आठवले- आज मकरसंक्रांत आहे. कामाच्या धांदलीत त्यांना संक्रांतीची आठवणच झाली नाही. का कोण जाणे, त्यांना एकदम दहा वर्षांपूर्वीची संक्रांत आठवली.
त्यावेळी ( १९४३ ) यशवंतराव भूमिगत झाले होते. इंग्रज सरकारचे पोलिस त्यांच्या शोधात होते. सहा महिन्यांपूर्वीच त्यांचे लग्न झाले होते आणि त्यांची पत्नी पहिल्या संक्रांतीसाठी माहेरी गेली नव्हती, तर तिला पोलिसांनी तुरुंगात नेले होते. १४ जानेवारी १९४३ रोजी संध्याकाळी यशवंतराव बबनराव गोसावींच्या घरी गेले होते. त्यांच्या घरी त्यांच्या पत्नीने संक्रांतीचा हळदी-कुंकवाचा समारंभ धामधुमीने साजरा केला होता. यशवंतरावांनी ते पाहिले, आणि त्यांचे डोळे भरून आले. ते तिथेच अश्रू ढाळू लागले. त्यांच्या रडण्याचे कारण कोणाला समजेना. सौ. वेणूताईंची ही पहिलीच संक्रांत होती. अशा मंगलप्रसंगी त्यांना जेलच्या अंधा-या कोठडीत खितपत रहावे लागले याची वेदना यशवंतरावांना असह्य झाली व ती अश्रूरूपाने बाहेर पडली. बबनरावांनी व त्यांच्या पत्नीने कशीबशी त्यांची समजूत काढली. पण त्यानंतरच्या कोणत्याही संक्रांतीला यशवंतराव वेणूताईंना सोडून राहिले नाहीत. तो दिवस दोघांसाठी ' खास ' होता.