ज्याचं पोट दुखतं , तोच ओवा मागतो !
मुख्यमंत्रीपदाच्या अल्प कारकिर्दीत यशवंतरावांनी अनेक नवीन प्रकल्पांची मुहूर्तमेढ रोवली. राज्याची सिंचन क्षमता वाढविण्यासाठी अनेक धरणे बांधली. धरणे बांधत असताना त्या क्षेत्रातील लोकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण व्हायचा. यातूनच धरणग्रस्तांची संघटना निर्माण झाली. डॉ. बाबा आढाव या संघटनेचे नेतृत्व करीत होते. मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांच्या हस्ते एकदा येडगाव येथे कुकडी धरणाचे भूमिपूजन होणार होते. पण डॉ. बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली धरणग्रस्तांनी तो भूमिपूजन समारंभ उधळून लावला. काँग्रेसची महाराष्ट्रात एकहाती सत्ता असताना व राज्यात विरोधी पक्ष नाममात्र असताना हे घडले होते. संपूर्ण महाराष्ट्राला हा जोरदार धक्का होता. पण यशवंतरावांची या आंदोलनाबद्दलची प्रतिक्रिया संतप्त नव्हती. त्यांनी राजकीय मौनही धारण केले नाही. ते म्हणाले, ' ज्याचं पोट दुखतं तोच ओा मागतो.' धरणग्रस्तांचे प्रश्न त्यांनी मान्य केले. नंतरच्या काळात त्यांना ' ओवा ' द्यायचे कामही केले. पुढे महाराष्ट्र सरकारने धरणग्रस्तांसाठी स्वतंत्र कायदा केला. असा कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले. सत्ताधारी संवेदनशील असले, तर काय घडते याचे हे उदाहरण आहे.