पूर्व काल
व्यापारमिषाने जलपर्यटन करून देशोदेशी साम्राज्य स्थापन करणा-या ब्रिटीशांच्या मोहिमेत भारतालाही पारतंत्र्याचे जाळ्यांत अडकावे लागले. परंतु इंग्लंड आणि भारत यांत ५००० पेक्षां अधिक मैलांचे अंतर असल्याकारणाने राज्यकर्ते म्हणून इंग्रजांचा भारतीयासी जो संबंध आला त्या व्यतिरिक्त फारशी जानपहचान होण्यासारखे काही प्रथमत: तरी घडू शकले नाही.
सन १८६९ मध्ये सुवेजकालवा झाल्यापासून सन १८७२ मध्ये इंग्लंड व भारतात तारायंत्राचे दळणवळण सुरू होऊन भारत इंग्लंड जवळ येवू लागला. सन १८९२ साली भारताचे पितामह दादाभाई नौरोजी इंग्लंडच्या पार्लमेंटचे सभासद म्हणून निवडून आले व त्यांनी आपल्या भाषणांनी पार्लमेंटमध्ये भारतासंबंधी जागृती केली. तसेच सन १८८५ मध्ये सेवानिवृत्त अधिकारी श्री. ह्यूमसाहेब यांनी काही भारतीय पुढा-यांच्या सहाय्याने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना करून भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाचा श्रीगणेशा केला. त्यावेळी भारताचे ग. जनरल लॉर्ड डफरीनसाहेब यांनीही भारतीय काँग्रेस स्थापन करण्याच्या कामी श्री. ह्यूमसाहेबांना पुष्कळच सहाय्य केले. राष्ट्रीयसभा सुरू झालेवर पुढील दहा पाच वर्षात राष्ट्रीय सभेमार्फत विलायतेत भारतीयाच्या आशा आकांक्षाना तोंडपाडण्यासाठी पार्लमेंटमध्ये शिष्टमंडळे जावू लागली व त्यांच्यातील कै. सुरेंद्रनाथ बॅनर्जी, कै. नामदार गोखले यांच्यासारख्यांनी आपल्या भाषणानी भारतीयाबरोबर इंग्लंडचेही लोकमत जागृत करण्याचा प्रयत्न केला. सर चार्लस ब्रँडला, सर हेन्री फसिस्ट, केरहार्डी यांच्यासारख्या काही उदार आत्म्यांनी भारतासंबंधीची आपली उदार मते प्रदर्शित करून भारताबददलची आपली आस्था प्रकट केली, लॉर्ड कर्झनचा करडा अंमल व त्यामुळे भारतात उत्पन्न झालेला असंतोष याचा प्रतिध्वनी इंग्लंडमध्ये पोचून इंग्लंडच्या पार्लमेंटचे लक्ष भारताकडे दिवसेदिवस अधिक लागू लागले.
सन १८९२ ते १९०५ या काळांत इंग्लंडच्या कायदेमंडळात काहीही फेरफार झाला नाही. याच कालांत भारताच्या व जगाच्या राजकारणांत मोठे स्थित्यंतर घडून आले. भारतीय राष्ट्रीय सभेची अधिवेशने दिवसेदिवस अधिक लोकप्रिय होऊन भारतांत राष्ट्रीय सभेचा बस बसत चालला. सालोसाल सरकारकडे राष्ट्रीय सभेने केलेले ठराव व विनंत्या कागदपत्राच्या फायलीतून पडून राहू लागल्या. इंग्लंडच्या पार्लमेंटपुढे गा-हाणे गाण्यास गेलेल्या शिष्टमंडळांची गा-हाणी निरर्थक झाली. बेकार असंतुष्ट पदवीधरांची संख्या वाढून लागली. त्यातच कर्झनशाहीच्या कडक अमदानीने जनतेत असंतुष्टता व राजकिय जागृती उत्पन्न केली. राजकारणांत सनदशीर पक्षाच्या जोडीला भारतांतील तरुण क्रांतीकारक पुढे सरसावू लागले. त्यावेळच्या रशियासारख्या बलाढ्य राष्ट्रास एशिआई जपानसारख्या चिमुकल्या राष्ट्राने चीत केल्यामुळे आशियाच्या क्षितिजावर भाग्याचा सूर्य उगवला असे वाटू लागले, त्यामुळे तरुणामध्यें आशावादाचे नवचैतन्य संचारले.
सन १९०५ साली इंग्लंडच्या प्रधान मंडळात फार वर्षानी उलथापालथ होऊन हुजूरपक्ष अधिकारभ्रष्ट होवून उदारपक्ष अधिकारावर आला. सन १९०७ साली इंग्लंडच्या इंडिया कौन्सिलमध्ये दोन हिंदी गृहस्थांचा प्रथम प्रवेश झाला व सन १९०९ साली गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळात हिंदी माणसांचा प्रवेश म्हणजे हिंदी मनुष्याचा सरकारच्या अंतगृहांत प्रवेश होय. ही गोष्ट त्याकाळी फार महत्त्वाची वाटत होती लॉर्ड मार्लेसारखे नाणावलेले राजकारणी भारताला भारतमंत्री म्हणून लाभले. तेव्हा आता खरोखरच काही लाभ होणार असे काही भारतीयांना वाटू लागले. परंतु देशातील काही असंतुष्ट तरुणांच्या विचारास भलतीच दिशा लागून ते क्रांतीस व रक्तपातास उद्युक्त झाले. अशावेळी हिंदी जनतेत राजकीय असंतुष्टता कमी व्हावी म्हणून लॉर्ड मोर्ले यांनी आपले धोरणास अनुसरून सन १९०९ साली मोर्ले-मिंटो सुधारणा कायदा केला. सदर कायद्यामुळे हिंदी लोकांच्या हातांत खरीखुरी सत्ता आली नाही, पण त्यांना राजपध्दतीतील दोष दिग्दर्शित करण्यास वाव मिळाला. सन १९१४ च्या महायुध्दाने जगाच्या त्याचबरोबर भारताच्या राजकारणांत एकदम क्रांती घडवून आणली नसती तर मोर्ले-मिंटो सुधारणांची आयुमर्यादा अधिक वाढली असती.