माझ्या राजकीय आठवणी १

लेखकाचे अल्प निवेदन

मायभूमीचे स्वातंत्र्य हे जीवनाचे ध्येय मानून अनेक देशसेवकांनी आपले जीवित वित्त मातृभूमिच्या सेवेंत अर्पण केले आहे. ना शारीरिक शक्ती ना बौधिक बळ अशा अवस्थेंत माझ्या सारख्याच्या हातून, कितीशी देशभक्ती नी कितपत देशसेवा घडली असेल याबद्दल माझा मीच मनोमन साशंक आहे. पण एवढी गोष्ट मात्र खरी कीं, माझ्या मनोमंदिरांत देशसेवेची जी एक छोटीशी ज्योत बाळपणीच प्रदिप्त झाली, ती मी कदाकाळी विझू दिली नाहीं. किंबहुना तिजवर अन्यविचारांची वा स्वार्थाची काजळी साचू दिली नाही. भक्ताची कसोटी पाहण्यासाठी परमेश्वर त्यावर संकट परंपरा आणून त्याला हैराण करून सोडीत असतो आणि या दिव्यांतून तावून सुलाखून बाहेर पडलेल्या भक्ताला तो हृद्याशी धरून कृतार्थ करून सोडतो असे म्हणतात.

माझा देश हा माझा देव आण माझी दुबळयाची देशभक्ती ही मी त्याला अर्पण केलेल पत्र पुष्प फळ आणि तोय. माझा देश स्वतंत्र होऊन प्रगतीच्या वाटा चालू लागला. हे मीं ‘याचि देही याचि डोळा’ पाहू शकलो. हीच माझ्या भक्तीची एकमेव सांगता, असेच मानून चाललो आहे.

माझ्या देशाच्या स्वातंत्र्याचा लढा चालूं असता जे समर प्रसंग चाललेले मी पहात होतो. त्यातील फार थोड्या प्रसंगाचे फारच अल्प समजुतीने मला समजून आलेले वर्णन मी पुढील पानांतून देण्याचा प्रयत्न केला आहे. एक ध्येय, एक ध्यास या वृत्तीमुळे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यांत प्रत्यहि होत असलेल्या घडामोडी मी यथाशक्ती वृत्तपत्रांतून, व्याख्यानातून, वाचनातून तसेंच मित्रपरिवाराशी केलेल्या चर्चेतून मी मनाशी टिपत होतो व कवटाळीत होतो. त्यांना शब्दरूप देऊन लोकांपुढे मांडण्याचा माझा हा प्रयत्न आहे.

मला आठवल्या तशा माझ्या या ‘राजकीय आठवणी’ मी लिहून काढल्या, जाणत्या लोकापुढे केल्या. कारण त्यांना झाडून पूसून व्यवस्थित करण्याची आवश्यकता होती हे मी पूर्णपणें जाणून होतो. माझ्या या इच्छेला राष्ट्रीय वृत्तीची बीजें अंत:करणांत रुजलेल्या व शिक्षकी व्यवसायात असतांना ‘जे जे आपणासी ठावे, ते ते हळुं हळुं शिकवावे’ असे धोरण असणारे येथील एक शिक्षक श्री. बाळकृष्ण वासुदेव तथा बाबुराव घाटे यांनी माझ्या इच्छेला उत्साहानें सहाय्य करण्याचे मान्य केले. शालेय विषयांचे अध्यापन करीत आसतांना विविध विषयांच्या संदर्भात देशभक्तीचा दृष्टीकोन विद्यार्थ्यांना समजावून देण्याचा प्रयत्न ते करीत असत. सेवानिवृत्तीच्या कालांत रिकामपणाचा पण आवडीचा उद्योग म्हणून श्री. घाटे यांनी मला सहाय्य केले आहे. श्री शिवछत्रपती मेळयाच्या उपक्रमांतहि श्री. घाटे यांनी पद्यरचना करून मला पूर्वी मदत केली होती. या पुस्तकाच्या लेखनकार्यात त्यांनी केलेल्या सहाय्याबद्दल त्यांचे आभार मानणें माझे कर्तव्य आहे.

या ‘माझ्या राजकीय आठवणी’ लिहून झाल्यावर कुतुहल म्हणून मी त्या माझे बाळमित्र व राजकीय सौंगडी माननीय यशवंतराव चव्हाण यांना दाखविल्या. त्यांनी माझ्या लेखनांतील चुकांचे निदर्शन करून मला सतर्क केले. पण ‘या आठवणी वाचतांना माझ्या बालपणीच्या स्मृती पुन्हा उजाळून निघाल्या’ हे त्यांचे उद्गार आधिकच समाधानकारक वाटले आणि त्या आहेत तशा प्रकाशित करण्याचे धाडस मा केले आहे. त्या त्यांच्या आपुलकीच्या प्रोत्साहनाबद्दल मी त्यांचा ऋणी आहे.

राजकारणांत भाग घेत असतांना अनेक लहान मोठ्या कार्यकर्त्याशी माझा जवळून संबंध आला. पण त्या सर्वांचा उल्लेख माझ्या लेखनांत आलेला नाही, पण पुढे मागे शक्य झाल्यास त्यासंबंधीचे माझे विचार पुस्तक रुपानें प्रकाशित करण्याची माझा विचार आहे. ‘सत्य संकल्पाचा दाता भगवान’ या न्यायानें तो योग लवकरच येईल असे मानून चालतो.
माझ्या प्रस्तुत प्रयत्नानें तरुणपिढिला राजकीय आंदोलनाचे ओझरते दर्शन होऊन तिच्या मनांत अल्पशी खळबळ आणि देशप्रेमाची ज्योत प्रज्वलित झाली तरी मला समाधान वाटेल.

माझ्या या पुस्तकरुप होत असलेल्या आठवणींना उजेडांत आणण्यांचे कामी राजकारणाच्या आवडीनें आपल्या विद्यार्थीदशेपासून त्यांत भाग घेणारे पद्मश्री बाबुरावजी गोखले यांनी “जरुर तेवढे प्रास्ताविक” लिहून मला खरोखर उपकृत केले आहे. तसेच माननीय श्री. यशवंतरावजी चव्हाण यांनी आपल्या राजकीय कार्यबाहुल्यातून वेळ काढून “पुरस्कार” स्वरुप जे लेखन केले आहे, त्याबद्दल मी त्यांचा अंत:करणापासूंन ऋणी आहे.

तसेंच प्रकाशक श्री. श्रीपाद रामचंद्र देशपांडे व मुद्रक श्री. वि. रा. नावडीकर यांच्या सहाय्याबद्दल त्य़ांचे आभार मानणे माझे कर्तव्यच होय.

- हरी पांडुरंग तथा हरिभाऊ लाड.