मी व सार्वजनिक कार्याची आवड
मी शरीराने असा व्यंग की, ज्यामुळे माझी उंची कमी भासावी. शालेय शिक्षणाच्याबाबत प्रगती बरी असायची! गणित, भूमिती व इतिहास हे माझे आवडते विषय. प्रथम मातोश्री व नंतर वडील भाऊ यांच्या अकाली निधनामुळे मला माझा शालेय अभ्यासक्रम थोडक्यातच आटोपावा लागला. प्राथमिक शाळेच्या अखेरची परीक्षा उत्तीर्ण होऊन इंग्रजी २-३ इयत्तापर्यंत मजल मारतो तोच माझ्या शिक्षणाची इतिश्री झाली व घरच्या नडीशी टक्कर देण्यास मला निरनिराळे व्यवसाय करावे लागले.
वृत्तपत्र वाचनाचा नाद असल्यामुळे इंग्रजी मराठी वृत्तपत्राचे वाचन, श्रवणाने व मूळच्या चौकस बुध्दीमुळे काहीशी ध्येयभावना मूळ धरू लागली. आणि याचाच परिपाक म्हणजे अविवाहित राहून काही सार्वजनिक देशकार्य करीत रहावे असा मनाचा कल वाहू लागला. पण मृत्यूशय्येवर पडलेल्या वडिलांनी माझ्याकडून विवाह करण्याचे वचन घेतले. त्यांचे मन मोडू नये, निदान मृत्यूसमयी त्यांना दु:ख देणे बरे न वाटल्याने त्यांना ‘विवाह करीन’ असे वचन मला द्यावे लागले.
वडिलांच्या मृत्यूनंतर इमारतीलाकडाची वखार, शेंगा फोडण्याची गिरणी, बांधकाम – खात्याची काँट्रॅक्टची कामे व छापखाना वगैरे उद्योग केले. मी जरी असे उद्योग करीत होतो तरी अंगी बाणू लागलेली राष्ट्रीयवृत्ती फिरफिरून जागी होऊन मला हाती घेतलेला व्यवसाय सरळ सुचू देत नव्हती, असे म्हटले तरी चालेल. वरील उद्योगधंद्यांतून निवृत्त होण्याला घडलेली अनेक कारणे देता येतील. पण त्यापासून तादृश्य असा काहीच फायदा आता नसल्यामुळे त्यांचा उल्लेख टाळून मी माझ्या सार्वजनिक कार्यातील अल्प स्वल्प लोकसेवेच्या कार्यासंबंधी लिहिण्याचे ठरविले असल्यामुळे आता त्याकडे वळावयास पाहिजे.
शालेय काळात निव्वळ हौसेने वृत्तपत्रांची ने आण करण्याचे काम आमचे दे. भ. सदाशिव खंडो तथा आप्पासो. अळतेकर, श्री. नानासो. भागवत, श्री. पांडुआण्णा पाठक आदि शेजारी गावक-यांच्या कृपाप्रसादाने करण्याचा योग आला होता. प्रथम प्रथम तर इंग्रजी वृत्तपत्रांतील चित्रे पहाणे व मराठी वर्तमानपत्रांतील ठळक ठशाची अक्षरे जुळवून वाचणे एवढाच लाभ या कामगिरीतून झाल्याचे स्मरते. मात्र याहून मोठा फायदा झाला तो गावातील मोठ्या लोकांच्या ओळखीचा व त्यांच्या कौतुकदृष्टीचा.
श्री. यशवंतरावजींच्या लौकिकाच्या पायाचा दगड
सन १९२४ मध्ये धर्मवीर बटाणे यांच्या सहवासात संपूर्ण खादीधारी व्रताच्या पालनामुळे काँग्रेस सभासदत्व स्वीकारले. सातारा जिल्ह्यातर्फे महाराष्ट्र काँग्रेसवर कराड तालुक्यातून निवड झाली. पुढे वडिलांच्या मृत्यूनंतर १९२८ साली विवाहबध्द झालो. सन १९२५ पासून श्रीगणेशोत्सव, श्रीशिवजयंतीउत्सव अशा राष्ट्रीय उत्सवात मनापासून भाग घेऊ लगलो होतो. याच कालात समवयस्क व समानवृत्तीच्या अशा श्री. यशवंतराव चव्हाण (सध्याचे भारताचे अर्थमंत्री) व श्री. शिवाजीराव बटाणे यांसारख्या मित्रांशी सहवास आल्याने माझे कार्यक्षेत्र ब-याच अंशांनी सार्वजनिक कार्य हेच होऊन बसले.