श्री. यशवंतराव चव्हाण
मनुष्य मोठा झाल्यावर त्याच्या लहानपणच्या आठवणी आणि लहानसहान गोष्टी, मोठ्या आणि कौतिकाचा विषय होऊन बसतात, ही नेहमीचीच गोष्ट आहे. भारताच्या केंद्रीय मंत्रीमंडळांत संरक्षणमंत्री, गृहमंत्री, अर्थमंत्री व त्या आधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या जागावर विराजमान होऊन कौशल्यपूर्ण कारभार हाकू लागल्यावर श्री. यशवंतरावांच्या पूर्व चरित्राची आठवण त्यांच्या आवतीभोवती वावरणा-या मंडळींना व इतरेजनांना होऊ लागणे हे साहजिकच आहे.
मला मात्र श्री. यशवंतरावांच्या लहानपणापासून व काही वर्षे रात्र दिवस निकट सान्निध्यांत असल्याकराणाने त्यांची होत आसलेली प्रगती सातत्याने पहावयाचे भाग्य लाभले आहे. प्रतिकूल प्रापंचिक परिस्थितीतही त्यांनी विद्यार्थीदशेपासून केलेली लोकजागृती व दाखविलेले संघटनाचातुर्य बहुमोलाचेच आहे.
हल्लीच्या सांगली जिल्हयातील देवराष्ट्रे या आपल्या आजोळी श्री. यशवंतरावांचा जन्म झाला. त्यांचे पिताजी मूळचे विटे, तालुका खानापूर जिल्हा सांगली येथील रहिवासी, तेथे त्यांचे लहानसे घर व एकर दोन एकराची शेतीवाडी होती. सरकारी नोकरीच्या निमित्ताने श्री. यशवंतरावांचे वडील कराडास बरेच दिवस राहून तेथेच दिवंगत झाले. वडील बंधू श्री. ज्ञानोबांना वडिलांचे जागेवरच नोकरीची संधी मिळाल्याने या कुटुंबाचे वास्तव्य कराडासच कायम झाले.
वडिलांचे मृत्यूसमयी श्री. यशवंतराव केवळ दोन तीन वर्षाचे होते. त्यांना पितृसुख लाभले नाही असे म्हणावे लागेल. वडील बंधू श्री. ज्ञानोबा व श्री. गणपतराव. तसेच धार्मिक प्रवृतीच्या त्यांच्या मातोश्री विठाबाई यांच्या छायेखाली श्री. यशवंतरावांनी आपले शिक्षण कराड येथे सुरू केले. पण अंत:करणातील स्वातंत्र्यप्रेमाच्या उर्मीनी शालांत परिक्षेपर्यंतचा. कालही सुरळीतपणे त्यांना चोखाळता आला नाही. टिळक हायस्कूलमधील झेंडा प्रकरण, श्री छत्रपती मंडळातील श्री शिवाजी उत्सव, राष्ट्रीय चळवळींतील संघटनाकर्य, भिंतीपत्रके, बुलेटिन आदिमुळे शालांत परीक्षा उत्तीर्ण होण्यासही कारावासामुळे त्यांना दोन तीन वर्षे आधिक कालावधी घालवावा लागला. या सर्व कालावधीत तसेच महाविद्यालयीन अभ्यासक्रमाव्यतिरिक्त अन्यविषयावरील ग्रंथाचे सखोल वाचन व ज्ञान संपादन त्यांनी अहर्निश केले. त्यायोगे झालेल्या ज्ञानाच्या जोरावर वादविवाद व चर्चा करून त्यांनी आपले विचार अधिकच खंबीर करून घेतले.
सन १९४० – १९४१ च्या सुमारास वकिलीची परिक्षा उत्तीर्ण झाल्यावर काही महिने त्यांनी वकिलीही केली. पण श्री. यशवंतरावांच्या मनाचा कल राजकीय चळवळीकडेच प्रामुख्याने असल्यामुळे लोकजागृतीचे त्यांचे कार्य अव्याहत चालू होते. त्याच सुमारास त्यांचा विवाह फलटणच्या मोरे घराण्यातील सौ. वेणूताई या सुकन्येशी झाला. सन १९४२ च्या राष्ट्रीय आंदोलनांत श्री. यशवंतराव भूमिगत राहून लोकजागृतीचे कार्य अविरतपणे करीत होते. सन १९४४ मध्ये त्यांना अटक करून स्थानबध्द केले. पण लवकरच सरकारी हुकूमात झालेल्या एका गफलतीमुळे ते बंधमुक्त झाले. नंतर झालेली चूक सरकारी नोकरांचे नजरेस आल्यावर त्यांना पुन्हा अटक करून येरवडा जेलमध्ये स्थानबध्द करून ठेविले, सन १९४४ मध्ये त्यांना कन्यारत्न झाले. पण दुर्देवाने ही कन्या त्यांना फार दिवस लाभली नाही.
सन १९४४ मध्ये श्री. यशवंतराव चव्हाण जेलमध्ये असतांना त्यांचे वडील बंधू श्री. ज्ञानोबा निधन पावले. श्री. यशवंतरावांना त्यांच्या अकाली मृत्यूचे दु:ख सहन करावे लागले. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर श्री. यशवंतराव आपल्या तेजाने विधीमंडळात पार्लमेंटरी सेक्रेटरी म्हणून चमकू लागल्यावेळी त्यांचे द्वितीय बंधू श्री. गणपतराव यांचे निधन ता. १५-१२-४७ या दिवशी क्षयरोगाने झाले. पुढे श्री. यशवंतरावांची पत्नी सौ. वेणूताई याही क्षयरोगाची बाधा होऊन मिरजेच्या हॉस्पीटलमध्ये त्यांच्यावर औषधोपचार करण्यात आले अशा सर्व सांसारिक दु:खात हालअपेष्टा सहन करीत श्री. यशवंतराव राजकीय क्षेत्रांत आपले पाऊल पुढे पुढे टाकीत चालले होते.
याठिकाणी एक गोष्ट नमूद करावयास पाहिजे की, स्वातंत्र्य पूर्वकाली जेमतेम कुटुंब पोषणाच्या परिस्थितीत श्री. यशवंतरावाच्या मातोश्री व वडील बंधु यांनी त्यांच्या राजकीय कार्यात अडथळा तर नाहीच आणला, पण त्यांच्या सहका-यासहि कोणत्याहि प्रकारे दोष दिला नाही.