मला मतदानाचा अधिकार नव्हता. काँग्रेस अधिवेशनात उपस्थित राहण्याचा माझा हा पहिलाच अनुभव होता. त्याकरता मी तेथील माणसे, तेथील वातावरण सर्व न्याहाळून मनात साठविण्याचा प्रयत्न करीत होतो. माझे कान तेथे झालेल्या सर्व चर्चा व मोठ्या पुढाऱ्यांची भाषणे हे सर्व काळजीपूर्वक टिपून घेत होते. मतदानाचे ठराव पास झाल्यामुळे कसलाच पेच नव्हता.
या अधिवेशनाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील ज्येष्ठ काँग्रेस पुढाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना पाहावयचा व भेटण्याचा योग आला. त्यांमध्ये मी प्रथमतः साने गुरूजींना पाहिले, याची आठवण आहे. माझे मित्र दयार्णव कोपर्डेकर यांच्यामुळे त्यांची माझी ही भेट झाली. मी जसा कोल्हापूरला उच्च शिक्षणासाठी गेलो होतो, त्याचप्रमाणे दयार्णव हा आयुर्वेदाच्या शिक्षणासाठी पुण्याला गेला होता. तेथे तो साने गुरूजींच्या संपर्कात आला. दयार्णव आणि माझा स्नेह तसा फार जुना होता. आमचा एकमेकांशी पत्रव्यवहारही होत होता. तो आपली सुख-दुःखे मला कळवीत असे. तो माझ्यासारखाच परिस्थितीने सामान्य होता, तरी चिकाटीने आयुर्वेदाचे शिक्षण घेत होता. आपल्या खर्चासाठी पैसे मिळविण्यासाठी तो चार-दोन तास काही तरी उद्योगही करीत होता.
त्या काँग्रेस नगरात साने गुरूजींना मी प्रथम पाहिले, तेव्हा ते फारसे प्रसिद्ध नव्हते. पण खानदेशात त्यांना फार मोठा मान होता. अनेक तरुण मुलांना त्यांनी देशसेवेची दीक्षा दिली होती.
मी त्या दिवशी साने गुरूजींना पाहिले, तेव्हा गुडघे पोटाशी धरून, एकटेच एका चटईवर चिंतनात बसावेत, तसे ते दिसले. दयार्णवने माझी साने गुरूजींशी भेट करून देताना माझी माहिती करून दिली. तेव्हा ते हसले आणि मान हलवीत म्हणाले,
''फार फार छान ! ''
''हे माझे घनिष्ट मित्र आहेत.'' दयार्णवने असे त्यांना पुन्हा सांगितले, तेव्हा - ''दयार्णवचे मित्र राहा.'' असे त्यांनी मला सांगितले.
मी त्यांना नमस्कार करून निरोप घेतला. मुंबईच्या अधिवेशनात माझ्या ज्या काही नवीन ओळखी झाल्या, त्यांत साने गुरूजींची भेट माझ्या कायमची लक्षात राहिली.
या जातीय निवाड्यावरून महाराष्ट्रात पुष्कळ वादग्रस्त चर्चा आणि वादळ झाले. या जातीय निवाड्याच्या प्रश्नावरून महाराष्ट्रामध्ये - विशेषतः पुण्यामध्ये तेव्हा काय वातावरण होते, याचा अनुभव या काँग्रेस अधिवेशनानंतर मुंबईहून परत जाताना योगायोगाने मला पाहायला मिळाला. पुण्यामध्ये आम्ही एक - दोन दिवस थांबलो. तेव्हा सकाळी सहज वर्तमानपत्रात बातमी वाचली, की काँग्रेस अधिवेशनात जातीय निवाड्यासंबंधाने काँग्रेसने पास केलेल्या ठरावावर वर्किंग कमिटीचे एक प्रमुख डॉक्टर अन्सारी यांचे पुण्यात भाषण होणार आहे. आमच्या मनात विचार आला, की एका मोठ्या पुढा-याचे भाषण अगदी जवळून ऐकायची संधी आली आहे, तेव्हा आपण या सभेला जरूर जायचे. ही सभा सदाशिव पेठेतील शिवाजी मंदिरात होती. पुण्यात त्यावेळी ब-याचशा जाहीर सभा त्या ठिकाणी होत असत. आम्ही सभेच्या ठिकाणी जाऊन पोहोचलो, तेव्हा तेथे एक-दोन हजार माणसे जमली होती. काही प्रमुख काँग्रेस कार्यकर्तेही दिसले. परंतु त्यांतले काही जण मला काहीसे अस्वस्थ वाटले. मी त्यांना विचारले,
''या सभेत काही विशेष होणार आहे काय? तुम्ही लोक अस्वस्थ दिसता.''
त्यांनी सांगितले,
''सभेमध्ये जमलेले जे लोक आहेत, त्यांत बहुसंख्येने काँग्रेसविरोधी लोक आहेत आणि ते सभा नीट चालू देतील, असे काही आम्हांला दिसत नाही.''