कृष्णाकांठ८७

कॉलेजमधल्या अध्यापनाच्या कामाबरोबरच फडक्यांचे इतरही सांस्कृतिक कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या सहकार्याने चालू असत. अधूनमधून त्यांची उत्तम व्याख्याने कोल्हापूरला होत असत. मी ती नेहमी ऐकत असे.

आमच्या कॉलेजमध्ये त्यांनी संगीताची आवड असलेल्या विद्यार्थ्यांचे एक मंडळ बनविले होते. त्या मंडळाचा मी सभासद होतो. कॉलेजच्या वरच्या मजल्यावरील हॉलमध्ये आयोजित केलेली 'गानहिरा' हिराबाई बडोदेकर यांच्या संगीताने भिजून गेलेली आणि रंगलेली एक मैफल अजूनही माझ्या नजरेसमोर तरळते.

त्याच वेळी कोल्हापुरात असलेले दुसरे महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व म्हणजे प्राध्यापक माधवराव पटवर्धन यांचे. हे उत्तम कवी म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध होते. त्यांचे अर्धे इंग्रजी आणि अर्धे मराठीतील 'माधव ज्यूलियन' हे नाव त्यांच्याबद्दल अधिकच औत्सुक्य व कुतूहल निर्माण करत असे. मात्र फडके जसे लोकप्रिय होते, तशा तऱ्हेची लोकप्रियता माधवरावांना नव्हती. पण ते प्रवृत्तीने विद्वान आणि प्रकृतीने गंभीर होते. इंटरमीजिएटच्या वर्गामध्ये ते आम्हांला इंग्रजी कविता शिकवीत असत. परंतु त्यामध्ये शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये जिव्हाळा प्रस्थापित करण्याची जी आवश्यकता असते, ती कधी आढळली नाही. ते वक्तशीर येत, आपल्या तासाच्या वेळी खाली मान घालून आपल्या खुर्चीवर येऊन बसत, हातात पुस्तक घेऊन पुस्तकाकडे पाहत पाहत खाली मान घालून तासभर बोलत राहत आणि आपला वेळ संपला, की तशीच खाली मान घालून निघून जात.

ही दोन्ही आपापल्या परीने मोठी माणसे होती. त्यांच्याबद्दल आम्हांला आदर होता. पण कारण काय, ते मला समजत नाही, त्यांच्याजवळ जाऊन त्यांची दाट ओळख करून घ्यावी किंवा त्यांच्याशी मैत्री संपादन करावी, असे विचार माझ्या मनात कधीच आले नाहीत. स्वभावभिन्नता किंवा आयुष्याकडे पाहण्याचा फरक यांमुळे कदाचित असेल, पण हे घडले खरे.

डॉक्टर बाळकृष्ण यांच्या बाबतीत मात्र मला हा असा अनुभव आला नाही.

पुढे कालांतराने मी मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रोफेसर फडके यांची आणि माझी गाठभेट झाली होती. त्यांनी जुन्या आठवणी दिल्या घेतल्या, आणि आमचा चांगला स्नेह जमला. नंतर त्यांचे माझे चांगले घनिष्ठ संबंध आले आणि त्यांच्या-माझ्यांत काही पत्रव्यवहारही झाला.

कोल्हापूरच्या शिक्षणक्षेत्रातील आणखी एका महत्त्वाच्या व्यक्तीचा उल्लेख केला पाहिजे. त्यांचे नाव डॉक्टर बोस - हे इंग्रजीचे प्रोफेसर होते. मी बी. ए. च्या वर्गात असताना तेही आम्हांला इंग्रजी कविता शिकवीत असत. हायस्कूलपासून कॉलेजपर्यंतच्या विद्यार्थिदशेत मी अनेकांपासून इंग्रजी कविता शिकलो आहे. परंतु प्रोफेसर बोस यांची शैली कोणाला साधली नाही. त्या प्रकारची काहीशी शैली हायस्कूलमध्ये असताना आमचे शिक्षक श्री. दत्तोपंत पाठक यांच्यामध्ये मला पाहायला मिळाली होती.

प्रोफेसर बोस यांची माझी त्यानंतर भेट दिल्लीमध्ये मी संरक्षण मंत्री असताना झाली. ते दिल्लीमध्ये आहेत, असे कोणी तरी मला सांगितले.

''मी तुमच्या राजाराम कॉलेजचा विद्यार्थी आहे.'' असे मी त्यांना फोन करून सांगितले व ''माझ्या घरी चहाला याल का?'' असे विचारले.

त्यांनी ते निमंत्रण आनंदाने स्वीकारले आणि त्यांचा मुलगा, जो दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये प्राध्यापक होता, त्याच्याबरोबर येऊन, माझ्या घरी तासभर बसून, ते कोल्हापूरच्या गोष्टी बोलून गेले.
शैक्षणिक जीवनातल्या अशा व्यक्तींचा प्रभाव हा बराच काळ टिकून असतो व एका अर्थाने तो अविस्मरणीय असतो, कारण त्यांच्याकडून घेतलेले संस्कार हे कायम टिकणारे संस्कार असतात.

कोल्हापूरचे राजाराम कॉलेज म्हटले, म्हणजे मला शैक्षणिक क्षेत्रातील या माणसांची नित्य आठवण येते.