कृष्णाकांठ९४

''डॉक्टर बाळकृष्ण मला मदत करतील, असा मला विश्वास आहे. राहिलेल्या वेळामध्ये माझ्या परीक्षेची तयारी मी पुरी करीन, अशी मला उमेद आहे. युनिव्हर्सिटीच्या परीक्षेसाठी माझा फॉर्म मुदतीत भरून जाणे जरूरीचे आहे. त्यासाठी तुम्ही जाऊन खटपट करून या, म्हणजे काही झाले, तर होईल.''

त्याप्रमाणे गणपतराव डॉक्टर बाळकृष्ण यांना कोल्हापूरला जाऊन भेटून आले. आणि मला येथे कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला पाहिजे, की डॉक्टर बाळकृष्ण यांनी सगळी हकीकत ऐकून मला सर्व तऱ्हेची मदत केली आणि आपले खास अधिकार वापरून माझी टर्म मला दिली. एवढेच नव्हे, तर त्यांनी युनिव्हर्सिटीच्या परीक्षेसाठी माझा फॉर्मही पाठविला.

पंचावन्न दिवसांनी मी कोल्हापूरला परत गेलो. आम्ही ज्या भुसारी वाड्यात राहत होतो, त्या वाड्यात राहणारे माझे मित्र श्री. नानासाहेब अयाचित आणि श्री. आनंदराव चव्हाण हेही त्यावेळी माझ्याप्रमाणे त्याच परीक्षेला बसणार होते. त्यांनी-आम्ही एकत्र अभ्यास केला.

मला माझी गैरहजेरी भरून काढण्याकरता रात्रीचे दिवस करावे लागले आणि शेवटी परीक्षेला बसलो. माझी अपेक्षा नसताना मी पास झालो, असे जेव्हा कळले, तेव्हा मला जो आनंद झाला, तो दुस-या कुठल्याही परीक्षेच्या वेळी झाला नाही.

नानासाहेब अयाचित हे आमच्या जिह्यातीलच माझे मित्र आहेत. आजही त्यांची-माझी जिव्हाळ्याची मैत्री आहे. मूलतः ते राष्ट्रीय वृत्तीचे विचारवंत आहेत. त्यांनी पुष्कळ वेळा माझ्या गैरहजेरीच्या काळात, आजाराच्या वेळी आणि इतर वेळीही पुष्कळ वेळा मदत केली आहे. मी असा राजकारणात गुंतलेला विद्यार्थी आहे, हे त्यांना पहिल्यापासून माहीत होते आणि त्यामुळेही त्यांना माझ्याबद्दल आपुलकी वाटत होती.

श्री. आनंदराव चव्हाण हे पुढे राजकारणात प्रसिद्ध पावले आणि केंद्रिय मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून त्यांनी कित्येक वर्षे काम केले.

या दोन्ही व्यक्ती माझ्याबरोबरच अभ्यास करत असत. या अभ्यासाच्या साहचर्यामुळे आमच्यामध्ये वैयक्तिक स्नेहसंबंध निर्माण झाले. पुढल्या काळात आनंदरावांशी माझे राजकीय मतभेद झाले, तरी त्यांच्या विद्यार्थिदशेतील ह्या साहचर्यामुळे माझ्या मनात त्यांच्याबद्दल नेहमी आपुलकी आणि जिव्हाळा राहिलेला आहे. ते स्वतः अतिशय बुद्धिमान आणि परिश्रमी विद्यार्थी होते. त्यामुळे त्यांनी आपले विद्यार्थिजीवन मोठे यशस्वीरीत्या घालविले होते. त्यांनी आपल्या पदव्युत्तर परीक्षा उत्तम तऱ्हेने उत्तीर्ण होऊन नावलौकिक कमावला होता.

मी ज्यूनियर बी. ए. च्या वर्गात असताना १९३६ साली राजकारणाला मोठा वेग आला होता. १९३५ चा कायदा पास होऊन प्रांतिक सरकारे बनविण्याच्या कामात सर्व राजकीय पक्ष गुंतणार, असे वातावरण दिसू लागले. १९३७ च्या प्रारंभी होणा-या या निवडणुकांसाठी सर्व पक्ष आपापल्या तयारीस लागले होते. पुष्कळ चर्चेनंतर आणि वादानंतर या निवडणुका काँग्रेस पक्षाने लढविण्याचे ठरविले. माझ्या मताने ही चांगली गोष्ट झाली. निवडणुकीच्या निमित्ताने महत्त्वाचे प्रश्न लोकांपुढे जाऊन मांडता येतील आणि लोकांच्या मनाचा कौल काय आहे, याचा अंदाज घेऊन त्यामुळे स्वातंत्र्यलढ्यास शक्ती प्राप्त होईल, असे मला वाटत होते. तेव्हा आता या निवडणुकीच्या प्रयत्नांमध्ये आपला जिल्हा पाठीमागे राहता कामा नये आणि आपल्या जिह्यात काँग्रेस विजयी झाली पाहिजे, या प्रयत्नांत आम्ही तरुणांनी गुंतवून घेण्याचे ठरविले. या वर्षी मला युनिव्हर्सिटीची परीक्षा नव्हती, हेही माझ्या दृष्टीने सोयीचे होते. त्यामुळे मी जिल्ह्यात जाऊन या निवडणुकीसंबंधाने माझ्या मित्रांशी चर्चा करू लागलो.