कोल्हापूरची उच्च शिक्षणाची ही चार वर्षे माझ्या आयुष्यातील पायाभूत आणि गतिमान अशी वर्षे आहेत. गेल्या तीन वर्षाच्या राजकीय अनुभवानंतर मी आता सर्व परिस्थिती व विचारांतील भेदाभेदांकडे काहीशा तटस्थ वृत्तीने पाहू शकत होतो. उच्च शिक्षण पुरे होईल, की नाही, अशी माझ्या मनात धास्ती होती ती अडचण दूर झाली. कारण मी कोल्हापूर येथे येऊन बराच स्थिर झालो होतो. सांपत्तिक अडचणी चार वर्षे वारंवार येतच राहिल्या. पण माझे बंधू गणपतराव व माझे सर्व मित्र यांच्या मदतीने त्यांना मी तोंड देऊ शकलो. मन केन्द्रित करून अभ्यास करावा आणि वाचन करावे, अशी माझी इच्छा होती आणि या दृष्टीने या चार वर्षांत मी पुष्कळ फायदा करून घेतला, असे म्हटले, तरी चालेल. याचा अर्थ असा नाही, की मी सातारा जिल्ह्यातील माझ्या कार्यकर्त्या मित्रांपासून वा त्यांच्या कामापासून अलग राहू इच्छीत होतो. ते तर मला कदापि शक्य नव्हते. मी तर आता सातारा जिल्ह्यातील काँग्रेस चळवळीचा एक अतूट भाग झालो होतो. कधी मी त्यांच्याकडे साता-याला शनिवारी-रविवारी सुटीच्या दिवशी जात असे किंवा माझ्या मित्रांपैकी काहीजण मला भेटण्यासाठी कोल्हापूरला येत. त्यामुळे ते संबंध तसेच वाढत होते. चळवळीच्या कामापेक्षा मी वाचनासाठी जादा वेळ देत होतो. आणि वाचनाची साधने विपुल असल्यामुळे बौद्धिक आणि वैचारिक शक्ती मिळविण्याच्या कामात मी गर्क होऊन गेलो होतो.
आता माझे वाचन मर्यादित राहिले नव्हते. काय वाचावे आणि काय वाचू नये, असा संभ्रम आता वाटत नव्हता. त्या बाबतीत माझ्या दिशा कायम झाल्या होत्या आणि योजनापूर्वक काही वाचावे, असे मी ठरवले होते. राजकारण, इतिहास आणि वाङ्मय या विषयांची निवडक पुस्तके मी शोधू लागलो. कोल्हापूरच्या लायब्ररीत कित्येक तास बसून ती वाचूही लागलो. कॉलेजमध्ये अभ्यासासाठी नेमलेले काही विषय नवे होते. म्हणून त्यांसाठीही थोडा-फार प्रयत्न करावा लागला; परंतु बरेचसे विषय सामान्य स्वरूपाचे होते. त्या विषयांना धरूनही मी वाचनाचा प्रयत्न करीत असे. मला राजाराम कॉलेजच्या लायब्ररीमध्ये इतिहासविषयक पुष्कळ चांगली पुस्तके आढळली. समाजवादी विचार समजल्याने इतिहासाकडे पाहण्याची माझी दृष्टी बदलली होती. ऐतिहासिक घटनांच्या अभ्यासाबरोबर त्यांना प्रेरित करणा-या सामाजिक व वैचारिक शक्तींचाही आवाका आला पाहिजे, संकुचित व संकीर्ण क्षेत्र व काळ यांपेक्षा देश व जग यांकडे विशाल नजरेने पाहता आले, तर सर्व बाबींचा संदर्भ समजून त्यांचे सम्यक दर्शन होते, असे आता माझे मत झाले होते. या दृष्टीने एच्. जी. वेल्स यांच्या ('Outline of History') 'आऊटलाईन ऑफ हिस्टरी' या सर्व मानवजातीच्या विकासाला आपल्या कवेत पकडणा-या ग्रंथाच्या वाचनाने मी सुरुवात केली. या ग्रंथाच्या वाचनाने मी काहीसा स्तिमित झालो होतो. या तऱ्हेने वाचलेले हे पहिले पुस्तक, म्हणून याची माझी आठवण येथे देत आहे.
वाङ्मयीन क्षेत्रात मी बर्नाड शाँच्या नाटकांच्या प्रस्तावना वाचल्या. नाटकांच्या संहितांपेक्षा प्रस्तावनाच मोठ्या होत्या. पन्नास पानांचे नाटक, तर १५० पानांच्या प्रस्तावना, असा काहीसा हिशेब बर्नाड शाँच्या नाटकाबाबत होता. या माणसाची प्रतिभा विशाल होती, त्यामुळे सर्व विषयांत त्यांचा प्रवेश होता. त्यांचे समाजवादावरील एक पुस्तक त्यावेळी खूप नावाजले गेले होते. बर्नाड शाँची एक विशिष्ट लेखनशैली आहे. त्या शैलीची या निमित्ताने ओळख झाली.
यानंतर फ्रेंच लेखक व्हिक्टर ह्यूगो यांच्या 'लॉ मिझराब्ल' आणि इतर एक-दोन कादंब-याही मी वाचल्या. असे मी सर्वांगीण वाचन करीत होतो. माझे मन सांस्कृतिकदृष्ट्या सुसंपन्न करण्याचा प्रयत्न करीत होतो. त्याचबरोबर राजकीय विषय आणि घडामोडी यांच्याशीही दैनंदिन संबंध ठेवत होतो. तेव्हा प्रसिद्ध होणारे गांधीजींचे साप्ताहिक 'हरिजन'अगदी न चुकता वाचणे हे माझे महत्त्वाचे काम असे. घरून येणा-या पित्याच्या पत्राची ज्याप्रमाणे मुलगा वाट पाहतो, त्याचप्रमाणे लायब्ररीत 'हरिजन' केव्हा येतो, याची मी वाट पाहत असे. गांधीजी 'हरिजन'मध्ये त्यांना महत्त्वाच्या वाटणा-या सर्व प्रश्नांवर लिहीत असत. त्यांचे सरळ, साधे, सोप्या इंग्रजीमधील गंभीर विचार वाचताना मनाला एक प्रकारे शक्ती मिळत असे.