कृष्णाकांठ९०

मी त्यावेळपर्यंत समाजवादाचा विचार करत असल्यामुळे पं. जवाहरलाल नेहरूंच्या नेतृत्वाकडे आकर्षित झालो होतो. गांधीजींबद्दल आपुलकी आणि हिंदुस्थानच्या सामाजिक आणि आर्थिक प्रश्नांकडे नव्या समाजवादी दृष्टिकोनातून पाहण्याचा विचार या दोन गोष्टींच्या संघर्षाचे चक्र माझ्या मनात फिरत होते.

अशाच प्रकारचे संघर्षाचे चित्र मी पं. जवाहरलाल नेहरूंच्या विचारात आणि जीवनात पाहिले. त्यांचे आत्मचरित्र नुकतेच प्रसिद्ध झाले होते. आम्ही काही मित्रांनी ते एकत्र बसून वाचले. मी तर त्याची पुन्हा पुन्हा पारायणे केली. त्यावेळी मनात एक गोष्ट स्पष्ट झाली, की पं. जवाहरलाल नेहरूंच्या मार्गाने जर काँग्रेस गेली, तर त्यात आपण जो समाजवादाचा विचार करतो आहोत, तो यशस्वी होईल. यामुळे पंडित नेहरूंचे व्यक्तिमत्त्व आणि त्यांचे विचार यांचे एक नवे आकर्षण माझ्या मनात निर्माण झाले होते.

श्री. बिडेश कुलकर्णी यांच्याशी बोलताना मी माझे हे म्हणणे मोठ्या आग्रहाने मांडत असे. दुस-याचा विचार सहजासहजी मान्य करण्याइतके ते लेचेपेचे नव्हते. त्यावेळी त्यांनी माझे विचार मान्य असल्याचे कधीच सांगितले नाही. पण पुढे ब-याच वर्षांनी त्यांनी मला एकदा सांगितल्याचे आठवते,
''तुम्ही कोल्हापूरला असताना पंडित नेहरू आणि समाजवादासंबंधाने जे विचार मांडत होता, त्यांचा काहीसा परिणाम माझ्यावर जरूर झाला.''

माझे हे वैचारिक प्रकरण इतके साधे नव्हते. गांधींच्या व्यक्तिमत्त्वावर निष्ठा, पंडित जवाहरलाल नेहरूंच्या विचारासंबंधी एक नवी जवळीक आणि माझ्या जिल्ह्यातल्या काही मित्रांच्या साहचर्यामुळे, नाही म्हटले तरी, काहीशा आपुलकीने मानवेन्द्रनाथ रॉय यांच्या विचाराकडे पाहण्याचा दृष्टिकोन, अशा एका वैचारिक त्रिकोणात मी या वेळी उभा होतो. या त्रिकोणाचे उत्तर ताबडतोब मिळाले पाहिजे, असा माझा आग्रह नव्हता. कारण ते शक्य नव्हते. परंतु त्यावेळी माझी वैचारिक परिस्थिती काय होती, याचे हे चित्र आहे. विचारांचा गोंधळ कितीही असला, तरी प्रत्यक्ष कार्यामध्ये त्यांची कसोटी लावल्याशिवाय, बरोबर काय आणि चूक काय, हे समजत नाही. म्हणून मी मन मोकळे ठेवून माझ्या सातारा जिल्ह्यातील कार्यकर्ते आणि मित्रांशी हे सगळे बोलत होतो आणि वागत होतो. प्रत्यक्ष कार्य करताना जे खरे असेल, ते निघेल, असा विचार मनाशी केला. निर्णयाची मला काही घाई नव्हती. जीवन पुढे चालू होते.

देशातील राजकीय परिस्थिती ही कायदेभंगाच्या वातावरणाच्या बाहेर आली होती. विधायक कार्यक्रम, पक्षाची संघटना, आजवर झालेल्या कामाचे समालोचन, विचारांत स्वच्छता आणण्याची आवश्यकता या सर्व गोष्टींची कार्यकर्त्यांना जाणीव झाली होती आणि या दृष्टीने आपापल्या परीने ते प्रयत्न करू लागले होते. मला आठवते, १९३४ साली कायदेभंग चळवळीनतंरचे काँग्रेसचे पहिले अधिवेशन मुंबई येथे भरायचे होते आणि त्या अधिवेशनासाठी बाबू राजेंद्रप्रसाद यांची अध्यक्ष म्हणून निवड झाली होती. मी गेली काही वर्षे कार्य करीत होतो. परंतु राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांशी संबंध प्रस्थापित करावेत, असा योग मला एकदाही लाभला नव्हता. निदान आपण त्यांना एकदा प्रत्यक्ष पाहिले तरी पाहिजे, असे मला वाटे. त्यामुळे मी माझ्या मित्रांपुढे प्रस्ताव मांडला. त्यांनाही तो पटला. या अधिवेशनामुळे मुंबई पाहिल्यासारखी होईल, ही गोष्ट मनामध्ये होती. मीही मुंबई अद्याप पाहिलेली नव्हती. या अधिवेशनासाठी मी मुंबईला गेलो. या अधिवेशनात काँग्रेसचे विशाल रूप मी प्रथम पाहिले. जनमानसात या पक्षाला केवढे मोठे स्थान आहे, याचे विराट दर्शन मला मुंबई शहरात पाहायला मिळाले. राजेंद्रप्रसाद यांचे मुंबई शहरात झालेले भव्य स्वागत डोळे दिपविणारे असे वाटले. वरळीच्या बाजूला काँग्रेसचे हे अधिवेशन होते. आम्ही अधिवेशनाच्या प्रेक्षागारात बसून सर्व चर्चा व भाषणे ऐकली.

त्यावेळी जातीय निवाडा (कम्युनल ऍवार्ड) हा देशात सर्वत्र वादग्रस्त प्रश्न झालेला होता. आणि याचे प्रतिसाद काँग्रेसमध्येही उठत होते. ब्रिटिश सरकार हिंदुस्थानसंबंधी १९३५ चा कायदा पास करण्यासाठी एक एक पाऊल पुढे टाकत होते. जातीय निवाडा हा त्यातीलच एक भाग होता. त्याला मान्यता द्यावयाची, की नाही, असा प्रश्न या अधिवेशनापुढे चर्चेसाठी होता आणि तो अतिशय वादळी ठरला. १९३५ च्या या कायद्यामध्ये मुसलमानांना स्वतंत्र मतदार-संघ देण्याची योजना या निवाड्यामुळे मांडली गेली होती. त्याला स्पष्ट विरोध करावा, असा हिंदुनिष्ठांचा आग्रह होता व मत होते. पण काँग्रेस वर्किंग कमिटीने राजकीय व्यवहार म्हणून पवित्रा टाकला होता, की आमची मागणी स्वातंत्र्याची आहे, जातीय निवाड्याचा स्वीकार किंवा अस्वीकार यामध्ये आम्हांला रस नाही. प्रथमतः समजायला ही भूमिका अवघड होती. पण हिंदुस्थानातील मुसलमानांचे राजकारण जे वळण घेत होते, ते लक्षात घेता, मोठ्या धोरणीपणाने व अडचणीने ही भूमिका ठरवली आणि वर्किंग कमिटीने त्याला मान्यता दिली होती. खुल्या अधिवेशनात या बाबतीत जेव्हा ठराव आला, तेव्हा त्याला विरोध करणारे अतिशय परिणामकारक असे भाषण पंडित मदनमोहन मालवीय यांचे झाले. लक्षावधी माणसांनी भरलेल्या त्या विशाल पटांगणात एक तासभर अतिशय आर्जवी आणि वक्तृत्वपूर्ण असे त्यांचे भाषण झाले. ते हिंदी भाषेत बोलले. मला तर असे वाटले, की मालवीयजींनी अधिवेशन जिंकले आणि त्यांच्या मताप्रमाणे ठराव नापास होणार, पण प्रत्यक्षात जेव्हा अधिकृतपणे मतदान झाले, तेव्हा मोठ्या बहुसंख्येने प्रतिनिधींनी मूळ ठराव पास केला.