''तुम्हीच अन्याय केला, तेव्हा तुम्हीच त्यांची काय सुधारणा करणार? आम्ही स्वतःच प्रयत्न करून आमच्या समाजाची प्रगती केला पाहिजे. डॉक्टर आंबेडकर आमचे नेते आहेत. त्यांनी शिक्षण घेऊन स्वतःची माणुसकी व स्वाभिमान जागविण्याचा संदेश दिला आहे. राजकारणात संघटित होऊन आपण आपली प्रगती आपणच करायची, असे आम्ही ठरविले आहे. तुमच्या मंदिर प्रवेशाचा आम्हांला काडीइतकाही उपयोग नाही.''
त्या समाजाची ही भावना मी समजू शकलो आणि हरिजन-सेवेच्या प्रयत्नांचा माझ्यापुरता तरी तात्पुरता शेवट झाला.
१९३३ चे साल हरिजन-सेवेच्या कामाचे प्रयत्न आणि माझ्या परीक्षेची तयारी यात केव्हा गेले, हे मला कळले नाही. आमच्यानंतर आमचे इतर सत्याग्रही मित्रही हळू हळू घरी परत येत होते. विशेष म्हणजे श्री. काशिनाथपंत देशमुख, आत्माराम पाटील, श्री. दयार्णव कोपर्डेकर ही मंडळी त्यांत होती. मॅट्रिक झाल्यानंतर पुढे काय करणार, असा या मंडळींचा माझ्या पाठीमागे लकडा होता. मी त्यांना माझे विचार सांगत असे,
''कायदेभंगासारखी चळवळ जर पुन्हा आली, तर गोष्ट वेगळी, नाही तर मी माझा उच्च शिक्षणाचा कार्यक्रम पुरा करणार आहे.''
त्या सगळ्यांना तो योग्य वाटत असे, पण मी तो कसा पुरा करणार, याची त्यांना शंका होती. उच्च शिक्षण घेण्यासाठी लागणारी आमची सांपत्तिक स्थिती, असावी, तशी अनुकूल नव्हती. त्यासाठी कोल्हापूर किंवा पुणे या दोहोंपैकी एका ठिकाणी जाण्याची गरज होती. शिवाय तिथला दरमहाचा खर्च शेकड्याने येणार होता. तो मी कोठून उभा करणार, असा त्यांचा प्रश्न असे. मी निरूत्तर होत असे. परंतु माझा विचार मी काही सोडत नसे. मी त्यांना म्हणे,
''तुमचे काही काम तातडीने असेल, तर ते तुम्ही मला सांगा. मी त्यात माघार घेतली, तर तुम्ही मला दोष द्या.''
१९३४ च्या मार्च-एप्रिलमध्ये माझी परीक्षा झाली. जूनमध्ये मी त्या परीक्षेत पास झालो, असे समजल्यामुळे पुढे काय, हा तातडीचा प्रश्न म्हणून माझ्यापुढे आ वासून उभा राहिला. माझे मित्र राघूआण्णा यांना प्रामाणिकपणे असे वाटत होते, की मी माझे आयुष्य शिक्षणासाठी व्यर्थ घालवत आहे. त्यांचे असे मत होते, की मला आवश्यक तो अनुभव व जागृत विचारशक्ती हे सर्व आता प्राप्त झाल्यानंतर शाळा-कॉलेजच्या वर्गात बसून दिवस न् दिवस आणि महिने न् महिने व्यर्थ घालविण्यात काय अर्थ आहे? कायदेभंगाची चळवळ असताना करावयाचे काम वेगळे, पण एकदा ते व्रत स्वीकारल्यानंतर काही एक दैनंदिन काम आपण स्वतःसाठी बांधून घेतले पाहिजे. तसे काही तरी ठरविण्याची ही वेळ आहे, असे त्यांना मनापासून वाटत होते.
नेमके याच सुमारास श्री. शंकरराव देव हे काही कामासाठी कराडला आले होते. यापूर्वी त्यांची माझी भेट झालेली नव्हती. मात्र राघूआण्णा यांची त्यांची ओळख होती. शंकरराव देव हे श्री. शिराळकरांच्या घरी उतरले होते.
राघूआण्णांनी मला विचारले,
''तुझ्या शिक्षणाबाबत आपण शंकरराव देवांचा सल्ला घेऊ या का?''
मी त्यांना म्हटले,
''माझ्या शिक्षणाचा निर्णय माझा मीच केला पाहिजे. बिचा-या शंकररावांसारख्या मोठ्या माणसाला याची तसदी कशाला?''
पण त्यांनी फारच आग्रह केला, म्हणून मी त्यांच्यासमोर शंकरराव देव यांना भेटण्यासाठी गेलो. म्हटले, निदान ओळख तरी होईल. भेटल्यानंतर पहिले कुशल-समाचाराचे प्रश्न संपल्यावर राघूआण्णांनी माझी माहिती करून दिली.