कृष्णाकांठ७९

आम्ही तेथे गेल्यानंतर थोड्याच दिवसांत येरवड्यातील बाराव्या बराकीचे रूप या विसापूरच्या बराकीस देण्याचा प्रयत्न केला. मुंबईचे प्रसिद्ध नेते स. का. पाटील त्यावेळी विसापूर जेलमध्ये होते. त्यांनी जेलमध्ये अतिशय व्यवस्थित आणि संपन्न अशी लायब्ररी उभी केली होती. शेकडो जुनी पुस्तके दररोज परत जात आणि शेकडो जुनी पुस्तके येत, असा हा सहकार्याचा संबंध येथे प्रस्थापित झालेला मी पाहिला.

आमच्या या बराकीमध्ये कॅम्प जेल १२ मधील बराकीतीलही काही मित्र होते. तात्या डोईफोडे, दयार्णव कोपर्डेकर आणि मी होतो. योगायोगाने ह. रा. महाजनीसुद्धा या बराकीत आले होते. त्यामुळे वाचनाच्या, चर्चेच्या बैठकी येथेही सुरू झाल्या. या बराकीमध्ये राहिल्यानंतर गुजराती मित्रांच्या सहवासामुळे गुजराती बोलणे आम्हांला समजू लागले आणि गुजराती भाषेशी नजीकची ओळख विसापूर जेलमध्ये झाली. त्याचा उपयोग पुढे मला मी द्विभाषिक राज्याचा मुख्यमंत्री झाल्यानंतर फार झाला.

ह. रा. महाजनींनी एक दिवस मला सूचना केली,

''आपण गेले वर्ष, सव्वा वर्ष विविध विषयांवरील पुस्तके वाचतो आहोत,  अभ्यासतो आहोत, तेव्हा त्यांचे आपल्या मनावर झालेले परिणाम आणि आपल्या विचारांच्या दिशा इतर लोकांना सांगण्यासाठी बराकीतील मित्रांपुढे एक व्याख्यान दे.''

- आणि माझ्या आठवणीप्रमाणे 'गांधीवाद' हा विषय घेऊन मी ३५ ते ४० मिनिटांचे एक भाषण त्या बराकीत दिले. गांधीवादाचे जे वेगवेगळे पैलू होते, त्यांची माझ्या वाचनामधून आणि चिंतनामधून मला जी समज आली होती, तिची मी मांडणी केली. आणि भाषणाच्या शेवटी हे स्पष्ट केले, की मला जो समजला आहे, तो गांधीवाद असा आहे. ही माझी जीवननिष्ठा आहे, असे मी प्रामाणिकपणे म्हणू शकत नाही; पण एक गोष्ट मान्य केली पाहिजेल, की गांधीवादाची सर्वांत महत्त्वाची देणगी - जी मानवी जीवनाला नित्य उपयोगी पडणारी अशी आहे, ती म्हणजे साध्य, साधन, शुचिता. गांधीवादाचे राजकीय आणि आर्थिक कार्यक्रम कोणी स्वीकारो अगर न स्वीकारो, पण साध्य, साधन, शुचितेचा सिद्धांत हा नुसता तत्त्वतः श्रेष्ठ वाटतो, असे नव्हे तर व्यवहारतः दैनंदिन आचारासाठीही अत्यंत उपयोगी पडणारा आहे.

असा एखादा नेमका विषय घेऊन त्यावर बोलण्याचा माझा हा पहिलाच प्रसंग होता. माझे ते पाऊण तासाचे भाषण झाल्यानंतर अनेकांनी माझे अभिनंदन केले. विशेषतः, ह. रा. महाजनी आणि निपाणीचे अनंतराव कटकोळ-जे गांधीवादी म्हणून प्रसिद्ध होते, त्यांनी माझे फार कौतुक केले. त्यांच्या कल्पनेपेक्षा, माझ्या वयाच्या आणि शिक्षणाच्या मानाने मी केलेली विषयाची मांडणी त्यांना फार मोलाची वाटली. आणि मला समाधान वाटले, की गेले वर्ष, सव्वा वर्ष आपण जे वाचतो आहोत, त्याचा काही ना काही उपयोग झाला आहे. यापुढे आपण जे वाचू, त्यासंबंधाने असेच बोलत गेले पाहिजे, असा विचार माझ्या मनाशी येऊ लागला. आयुष्यातील हा माझा पहिला महत्त्वाचा अनुभव म्हणून त्याची ही नोंद मी केली आहे.

१९३३ च्या मे महिन्यात आमची शिक्षेची मुदत संपली व आम्ही सजा होण्यापूर्वीचे आमचे घरचे कपडे अंगावर चढवून, विसापूर स्टेशनवर येऊन दाखल झालो. तात्या डोईफोडे आणि मी एकदम जेलमध्ये आलो होतो आणि दोघेही परत चाललो होतो. घरचे कपडे अंगावर घालताच काही क्षण मला चुकल्या चुकल्यासारखे वाटू लागले. पण फक्त थोडा वेळ जेलचे अधिकारी तिकिटे वगैरे काढून देण्याकरता स्टेशनवर आले होते. त्यांच्या मदतीने तिकिटे काढून घेतली आणि दौंडहून पुण्याला जाणा-या गाडीत बसलो आणि या तऱ्हेने कारागृहातील एक लांब मुदतीचा मुक्काम संपवून आम्ही आता आमच्या घरच्या वाटेला लागलो होतो.