उपोषण सुरू झाल्यानंतर या प्रश्नाची देशात विशेष चर्चा सुरू झाली आणि सबंध देश चिंतेत पडला. उपोषणाचे दिवस जसजसे जाऊ लागले, तसतशी चिंता अधिक वाटू लागली. महात्मा गांधींचे झालेले वय लक्षात घेता त्यांच्या जीवनास धोका आहे, असे लोकांना वाटू लागले. मग मध्यस्थांच्या खटपटी सुरू झाल्या.
डॉक्टर आंबेडकर यांचे मन वळवून काही तडजोड काढावी, असा प्रयत्न सुरू झाला. डॉक्टर आंबेडकरांनी गांधीजींची भेट घ्यावी, असे प्रयत्न सुरू झाले. या संदर्भात आमच्या जेलमध्ये झालेल्या चर्चा मला आठवतात. हरिजन समाज, विशेषतः, डॉक्टर आंबेडकरांना मानणारा समाज हा संपूर्णतः स्वातंत्र्याच्या लढ्याच्या बाहेर होता. ही गोष्ट मी लहानपणापासून पाहात आलो होतो. त्याचे केवढे घोर परिणाम होतात, हे आता अधिक लक्षात आले. काही लोकांच्या मते आंबेडकरांनी तातडीने येऊन महात्मा गांधींजींच्या सूचना मान्य करून त्यांना उपोषण सोडण्यास सांगावे, असे होते. काही जे अतिरेकी होते, ते म्हणत असत, की इंग्रजांचे व त्यांचे हितसंबंध जुळते असल्यामुळे ते काही असे करणार नाहीत.
महात्मा गांधीजींच्या प्राणाला धोका जरूर होता; तरीही हे असे बोलणे अनुदारपणाचे होते, असे मला त्यावेळीही वाटले. डॉक्टर आंबेडकरांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल राष्ट्रीय चळवळीत त्यावेळी बरेच अन्यायकारक गैरसमज होते. त्यांच्या विद्वत्तेबद्दल सर्वांनाच आदर असे, पण दलित समाजाचे प्रतिनिधी म्हणून ज्या अनुभवातून ते गेले होते, त्यानुसार त्यांची राजकीय मते बनली होती. त्यांच्या जीवनाच्या प्रेरणा आणि वेदना समजून घेण्याची आत्यंतिक आवश्यकता होती. आम्ही सगळेच महात्मा गांधीजींचे अनुयायी होतो, त्यामुळे सगळ्यांना काळजी वाटू लागली. आम्ही सगळे सकाळ-संध्याकाळ सामुदायिक प्रार्थना करीत होतो. हिंदुस्थानातील ही दुफळी बंद होऊन राष्ट्रीय प्रवाह हा पूर्ववत रहावा, यासाठी योजिलेला गांधीजींचा हा अखरेचा उपाय आहे, याची आम्हांला कल्पना आली. आपल्या स्वातंत्र्य-चळवळीत काही अपुरेपणा आहे, हेही सर्वांच्या ध्यानात आले.
दलित समाजाच्या मनात राष्ट्रीय भावना निर्माण व्हावी, यासाठी काही महत्त्वाची पावले उचलल्याशिवाय हे घडणार नाही, अशी मनोमन जाणीव झाली. सुदैवाने बाहेरच्या लोकांच्या प्रयत्नांना यश आले. विशेषतः, डॉक्टर आंबेडकरांच्या मनाच्या मोठेपणामुळे त्यांनी आपले विचार सोडून देऊन प्रसिद्ध पुणे करारावर सही केली आणि हिंदू समाजाची व राष्ट्रीय जीवनाची ही फाळणी या प्रकारे वाचविली. डॉक्टर आंबेडकरांनी गांधीजींचे प्राण वाचविले, याबद्दल मला डॉक्टर आंबेडकरांच्याबद्दल मनात रूजलेली आदराची भावना दुणावली.
या जेलमध्ये असताना दुसरी एक नमूद करण्यासारखी गोष्ट अशी, की गांधीजी शेजारी येरवडा जेलमध्ये असताना आम्हां कॅम्पवासी सत्याग्रहींना गांधीजींचे चुकूनही दर्शन होत नसे किंवा त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचा संपर्क साधता येत नसे. आमच्या कॅम्प जेलच्या प्रमुख प्रतिनिधींनी हा प्रश्न जेल प्रमुख अधिकाऱ्यांसमोर मांडला आणि त्याने याबाबतीत गांधीजींशी चर्चा केली. त्यानुसार अधूनमधून दरमहा किंवा दर दोन महिन्यांनी कॅम्प जेलचे निवडक दोन प्रतिनिधी गांधीजींना भेटण्यासाठी पाठवावयाचे, असे ठरले. आणि पुढे असे लोक जाऊन गांधीजींना भेटत असत आणि तेथून परत आल्यानंतर त्यांची काय चर्चा झाली, याची माहिती प्रत्येक बराकीत जाऊन देत असत. अर्थात या भेटीमध्ये राजकीय चर्चा न करण्याचे तत्त्व गांधीजींनी स्वीकारले होते. त्यामुळे विधायक कार्यासंबंधीची किंवा काही वैचारिक प्रश्नासंबंधीची चर्चा करणे एवढेच शक्य होते. मला आठवते, गांधीजींचे चिरंजीव श्री. रामदास गांधी आमच्या कॅम्प जेलमध्ये होते. ते एक वेळ कॅम्प जेलचे प्रतिनिधी म्हणून महात्मा गांधीजींच्या भेटीस गेले व त्यांनी येऊन भेटीत काय झाले, याचा वृत्तांत आम्हांला सांगितला.
सत्याग्रहींच्या मनात एक विचार असे, की या सत्याग्रहाचा शेवट कसा होणार, याचा काही अंदाज गांधीजींनी दिला काय? हे समजून घेण्यासाठी आणि त्यासंबंधी काही तरी ऐकायला मिळेल, अशा आशेने अशा भेटणाऱ्यांच्या परतीनंतर त्यांच्याभोवती सत्याग्रहींची गर्दी होत असे. गांधीजींनी काही अंदाज दिला का? गांधीजी आनंदी आहेत का? त्यांची प्रकृती बरी आहे ना ? अशा तऱ्हेचे प्रश्न विचारत असत.
माझे मित्र गौरीहर सिंहासने शेजारच्या तेरा नंबरच्या बराकीमध्ये स्थानबद्ध होते, त्यांना दोन वर्षापेक्षा जास्त शिक्षा झाली होती. त्यांना बराच काळ जेलमध्ये राहायचे असल्यामुळे त्यांनी त्या बराकीत अनेक मित्र जमा केले होते आणि एका अर्थाने त्यांचे ते एक प्रमुख मानले जात होते. त्यांच्या या कर्तबगारीचे मला कौतुक वाटत होते.