कृष्णाकांठ७६

एस्. एम्. जोशी हे विशेषतः तरूण कार्यकर्त्यांच्या चळवळीकडे आणि त्यांच्या प्रश्नांकडे मोठ्या आत्मीयतेने पाहात असत. ते त्या वेळी 'यूथ लीग'चे पुढारी होते. बारा नंबरच्या बराकीमध्ये एके दिवशी संध्याकाळी युवक चळवळीच्या संबंधाने त्यांचे एक सुरेख व्याख्यान झाल्याची मला आठवण आहे. त्यांची त्या विषयाची तळमळ आणि स्वातंत्र्यासंबंधी असलेल्या भावनेची तीव्रता, सर्व जातींच्या मंडळींना एकत्र घेण्याची वाटणारी गरज या त्यांच्या विचारसरणीने माझ्या मनात त्यांच्याबद्दल जिव्हाळा निर्माण झाला. दररोज चाललेल्या वादाच्या खटपटीत ते फारसे भाग घेत नसत. प्रसंगोपात्त ते वादात पडत. परंतु जेव्हा पडत, त्यावेळी मोठ्या हिरिरीने पडत. त्यांच्या सेवाभावी वृत्तीबद्दल मला फार मोठा आदर वाटण्यासारखा अनुभव या काळात आला. जेलमध्ये त्यांनी सत्याग्रहींचे केस कापण्याचे आणि दाढी करण्याचे काम आपणहून आपल्याकडे मागून घेतले आणि हळूहळू ते यात थोडे फार तज्ज्ञ झाले, असे म्हणायला हरकत नाही. ते काम ते मोठ्या आनंदाने आणि हसत खेळत करीत असत. त्यामुळे एस्. एम्. जोशी हे बाराव्या बराकीतील एक लोकप्रिय व्यक्तिमत्त्व होते.

याच वेळी आमच्याबरोबर कोल्हापूरचे वीर माने बारा नंबरच्या बराकीत होते. ते बोलण्यात ओबडधोबड, कमी शिकलेले, परंतु देशसेवेची अत्यंत तीव्र जाणीव असलेले कार्यकर्ते होते. त्यांनी मुद्दाम आमच्या जेलचे संडास साफ करण्याचे काम मागून घेतले होते. एस्. एम्. जोशी, वीर माने यांच्यासारखी माणसे आमच्यांत होती, याचा आम्हांला अभिमान वाटे. वीर माने आणि माझी ओळख पुढे कोल्हापूरला शिक्षणासाठी गेल्यावर अधिक वाढली आणि आमची मैत्री वाढत राहिली.

आमच्या १२ नंबरच्या बराकीमध्ये नुसते चर्चा, वक्तृत्व आणि शिक्षण एवढेच काम चालू होते, असे नाही, तर पुढे पुढे तेथे बराकीचे बुलेटिन निघू लागले. आपल्याला वाटणारे विचार कागदावर किंवा स्लेट पाटीवर लिहून बराकीतील सर्व मंडळींत ते फिरवावे, अशी प्रथा सुरू झाली. ह. रा. महाजनी आपल्याजवळ असलेल्या स्लेट पाटीवर दोन्ही बांजूनी आपल्या सुरेख अक्षरांत त्या दिवसाचा त्यांचा विचार लिहून ठेवत असत आणि तो सर्व बराकीत फिरवला जाई. 'बजरंग' या टोपण नावाखाली ते असे लेख लिहीत. त्यांच्या लेखनातील ते कौशल्य पाहिल्यावर त्यावेळी माझ्या मनाची खात्री झाली, की पुढे हे प्रसिद्ध लेखक होतील. आणि झालेही तसेच. पुढे महाराष्ट्रात 'लोकसत्ता'चे एक प्रभावी संपादक म्हणून त्यांनी लौकिक मिळविला. त्यांच्या पत्रकारितेचा श्रीगणेशा बराक क्रमांक १२ मध्ये असा झाला होता.

अशा तऱ्हेने जेलमध्ये आमचे दिवस चालले होते. १९३१ साल संपले आणि ३२ उजाडले. यावेळी घडलेली आणखी एक महत्त्वाची घटना म्हणजे ३२ सालामध्ये महात्मा गांधीजींनी केलेला 'कम्युनल ऍवार्ड' संबंधीचा आमरण उपवास. या उपवासाचा आमच्यावर खूप परिणाम झाला. यासंबंधी बराकीमध्ये चर्चा सुरू झाली. शेड्यूल कास्टना स्वतंत्र मतदार संघ देण्याची योजना ब्रिटिश सरकारने जाहीर केली. त्यामुळे देशात मतभेदाचे वातावरण निर्माण झाले. राजकीयदृष्ट्या एक समाज दुस-या समाजापासून अशा कारणाने वेगळा करून राष्ट्रात दुही पेरण्याचा एक मार्ग, म्हणजे स्वतंत्र मतदार संघ देणे, ही गोष्ट हिंदुस्थानला अनुभवाने माहिती होती. मुसलमान समाजाला वेगळा मतदार संघ देऊन, त्याचा परिणाम शेवटी देशाच्या जीवनामध्ये एक मोठी दुफळी निर्माण होण्यास झाला होता, याचा अनुभव होता.

हिंदू समाजातून पुन्हा एकदा त्यांच्यांतला अस्पृश्य मानला जाणारा समाज राजकीय दृष्टीने कायमचा बाजूला करण्याचा या ब्रिटिश सत्तेने टाकलेला एक डाव आहे, असे आपले मत राष्ट्रीय विचाराच्या मंडळींनी जाहीर केले. आणि हे थांबवले पाहिजे, असा निर्धार व्यक्त केला. ते कसे थांबविणार, हा मोठा प्रश्न होता. महात्मा गांधीजींनी यासाठी उपोषण केले होते. हरिजनांसाठी स्वतंत्र मतदार संघाची योजनाच मुळातून काढून टाकली पाहिजे, असा त्यांचा निर्धार होता.