एक दिवस त्यांनी मला निरोप पाठविला, की कॅम्प जेलच्या मार्फत गांधीजींना भेटायला जाणा-या मंडळींत या खेपेला त्यांच्या बराकीने त्यांचे नाव सुचविले आहे. मला आनंद झाला. गांधीजींच्या आदेशावरून आम्ही कारागृहात आहोत आणि असे कारागृहात असताना आपली नाही, तरी निदान आपल्या मित्राची गांधीजींशी भेट होत आहे, याचा मला आनंद वाटला.
ठरल्याप्रमाणे सिंहासने गेले आणि गांधीजींची भेट घेऊन आले. त्यांनी या सत्याग्रहात भाग घेतल्यामुळे त्यांच्यांत आणि त्यांच्या कुटुंबियांमध्ये निर्माण झालेले प्रश्न त्यांनी गांधीजींना विचारले. गांधीजींनी त्यांना सल्ला दिला,
'सत्याग्रहात भाग घेणे ही गोष्ट तुम्ही तुमच्या मनाने जर स्वीकारली असेल, तर आता तुमच्या कुटुंबियांवर अवलंबून राहण्याचा तुम्हांला काही अधिकार नाही. तुमचे जीवन तुमचे तुम्ही घडविले पाहिजे. त्याचा बोजा तुमच्या एकत्र कुटुंबावर टाकण्याचा तुम्हांला अधिकार नाही.'
ही हकीकत मला सिंहासने यांनी गांधीजींची भेट घेऊन आल्यानंतर सांगितली. सिंहासने यांचे शिक्षण तसे फार झालेले नव्हते. पण राजकारणातल्या कामाची त्यांची निष्ठा इतकी प्रबल होती, की त्यांनी गांधीजींचा शब्द पुरा करावयाचे आपल्या मनाशी ठरविले.
ही आठवण मला नेहमी आनंदित करते, ती यासाठी, की गांधीजींची जेलमध्ये भेट मिळविली, म्हणजे आपण स्वराज्य मिळविले, अशा आनंदात सिंहासने होते आणि माझ्या मित्राच्या आनंदात मी सहभागी होतो.
या जेलमध्ये काढलेले एक वर्ष म्हणजे माझ्या मताने माझे एक प्रकारे विद्यापीठीय जीवन होते. १९३२ साल उजाडले आणि शिक्षेपैकी एक वर्षाचा कालावधी झाला. एक वर्ष संपल्यानंतर या जेलमधून आमची बदली विसापूर जेलमध्ये होणार, असे जाहीर झाले. विसापूर जेल, म्हणजे अत्यंत कष्टदायी जेल, अशी त्याची ख्याती होती. हवामान चांगले नाही, पाण्याची कमतरता फार, कडक बंदोबस्त व कठोर अधिकारी असलेला जेल, अशी या जेलची ख्यातीहोती. आम्ही विचार केला, एक वर्ष तर आनंदात गेले. राहिलेले दिवस थोडे दुःखात जातील, तर काय बिघडले, म्हणून आम्ही मनाची तयारी केली. ठरलेल्या दिवशी सकाळी विसापूर जेलमध्ये जाणा-या माणसांचे गट करण्यात आले आणि मी ज्यात होतो, असा शंभर माणसांचा गट कॅम्प जेलच्या दाराशी असलेल्या पोलिसांच्या मोटारीत बसण्यासाठी निघाला. त्या जेलच्या दारातून बाहेर आल्यानंतर मी एकदा परत पाठीमागे फिरून त्या जेलकडे पाहिले. घर सोडताना जसे दुःख होते, त्याच्यापेक्षा काहीसे जास्त दुःख मला हा जेल सोडताना होत होते. ही एक वर्षाची जेलची आनंददायी संगत जन्मभर लक्षात राहील, अशी होती. तेथे भेटलेली माणसे, तेथे वाचलेली पुस्तके, तेथे झालेल्या चर्चा, त्यांतून आलेली नवी जाण, या सर्व जीवनाला शक्ती देणा-या व पोषक गोष्टी होत्या, त्यामुळे माझ्या मनामध्ये कृतज्ञतेचा भाव आला आणि माझे डोळे अक्षरशः भरून आले. माझे मला आश्चर्य वाटले.
दुस-या दिवशी आम्ही विसापूरला पोहोचलो. विसापूर जेल दौंड आणि मनमाड या रेल्वे लाईनवर असलेल्या स्टेशनपासून दोन-तीन मैलांवर आहे. एखाद्या ओसाड वाटणा-या माळावर बांधलेला हा जुना जेल ब-याच लांबून पाहिल्यावर मनामध्ये एक प्रकारची भीती निर्माण करतो. परंतु आम्ही तेथे पोहोचल्यानंतर मात्र आमच्या ध्यानात आले, की गेले वर्षभर तेथे राहणा-या सत्याग्रहींनी त्याला अतिशय वेगळे रूप दिलेले आहे. जेल अधिकाऱ्यांची आणि सत्याग्रहींची एक सहकाराची भावना तेथे निर्माण झाली होती. गुजरात आणि मुंबई येथून आलेले अनेक प्रमुख नेते आणि कार्यकर्ते या जेलमध्ये गेले वर्षभर राहात होते. या जेलला अनेक बराकी होत्या आणि प्रत्येक बराकीला सत्याग्रहींतून एक प्रमुख 'स्पोक्समन' निवडला जात असे. त्या बराकीतील सत्याग्रही कैद्यांचे जे प्रश्न असतील, ते हा पुढारी सोडवून घेत असे. पत्रव्यवहार, पुस्तके मागविणे, आजारपणासाठी लागणारी औषधे मिळविणे अशा स्वरूपाचे हे प्रश्न असत. मी ज्या बराकीत होतो, त्या बराकीचे पुढारी बडोद्याचे प्रसिद्ध काँग्रेस नेते श्री. मगनभाई पटेल होते. अत्यंत सज्जन मनुष्य, मनमिळाऊ स्वभाव, मृदु व मधुर भाषण करण्याची सवय, यामुळे सगळ्यांचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास होता.