कृष्णाकांठ७१

अशा तऱ्हेचे अनेक बौद्धिक व शैक्षणिक वर्ग बराकीच्या वेगवेगळ्या कोनाकोपऱ्यांत सुरू करण्याचे प्रयत्न झाले.

आमचे 'शाकुंतल' चे वर्ग सुरू झाल्यानंतर काही दिवसांनी आचार्य भागवतांनी आम्हांला शेक्सपियरचे एक नाटक शिकविण्याचे कबूल केले. त्याप्रमाणे त्यांनी निवड केली 'ज्यूलिअस सीझर' या नाटकाची. आम्हां विद्यार्थ्यांचे इंग्रजी शिक्षण मॅट्रिकपर्यंतचे होते, तेव्हा शेक्सपियरच्या अभ्यासासाठी ते उपयोगी पडू शकेल, की नाही, याची आम्हांला शंका होती, पण आचार्य भागवत हे हाडाचे शिक्षक होते. त्यांनी फार परिश्रम घेऊन नाटकाची पार्श्वभूमी, ज्यूलिअस सीझरचे इतिहासातले महत्त्व आणि या नाटकातील इतर व्यक्तिरेखा व सौंदर्यस्थळे इतक्या कौशल्याने सांगायला सुरुवात केली, की शाकुंतलचा वर्ग जसा लोकप्रिय झाला, तसाच हाही झाला. ज्यूलिअस सीझरच्या आणि शाकुंतलच्या या वर्गाच्या कीर्तीमुळे इतर विद्वान मंडळींनीही अशाच प्रकारचे वर्ग बराकीत सुरू केले.
हे दोन्ही प्रयोग जवळ जवळ महिनाभर चालू होते. त्यानंतर आमचाही आत्मविश्वास वाढला. इतर इंग्रजी पुस्तके वाचण्याची आमची इच्छा जागी झाली. कधी इतरांच्या शिफारशीवरून, तर कधी आपल्या आवडीवरून आम्ही पुस्तके निवडू लागलो व वाचू लागलो. वाचनाची दिशा आणि खोली बदलू लागली.

या जेलच्या वर्ष, सव्वा वर्षाच्या संपूर्ण मुक्कामात पुढच्या विद्यार्थी-जीवनात जितके वाचले नसेल, तितके मी वाचून घेतले.

राजकीय विचारांच्या वेगवेगळ्या छटा आणि त्यांचा परस्परांशी संबंध याचाही आता बराकीमध्ये चर्चेच्या रूपाने व्यासंग सुरू झाला होता.

आचार्य भागवत हे कट्टर गांधीवादी म्हणून प्रसिद्ध होते आणि गांधीवादाची ते बौद्धिक दृष्ट्या उकल करून सांगत असत. महात्मा गांधी हे निव्वळ राजकीय पुढारी आहेत, असे नसून मानवी विचारांच्या परिपक्वतेत भर घालणारी अशी नवी दृष्टी त्यांनी आपल्या तत्त्वज्ञानाने दिली आहे असे ते सांगत असत. गांधीवादी विचार हा भारतीय संस्कृतीतून निर्माण झालेला एक नवीन जीवन-दृष्टिकोन आहे आणि त्या विचारांना जशी काही मूलभूत आर्थिक सिद्धांताची बाजू आहे, तशीच राजकीय बाजूही आहे. तसेच त्या विचांराना काही शास्त्रीय पायाही आहे. किंबहुना ते जीवनाचे एक स्वतंत्र तत्त्वज्ञान आहे. अहिंसा आणि सत्य हे नुसते दोन शब्द नसून एकाच तत्त्वप्रणालीच्या दोन बाजू आहेत. आचार्य भागवत आपले हे विचार मोठ्या आक्रमक पद्धतीने मांडत असत आणि मग यावरती चर्चा व वाद सुरू होत असे.

आम्ही सर्वच कार्यकर्त्यांनी गांधींचे राजकीय नेतृत्व मान्य केलेले होते; परंतु सर्वांनीच त्यांचे तत्त्वज्ञान स्वीकारलेले होते किंवा सर्वांना ते समजलेले होते, असे म्हणता येण्यासारखे नव्हते. या चर्चांमुळे विचारांतील मूलभूत फरक आणि त्यांतील फरकांच्या सूक्ष्म छटा ध्यानात यायला मदत झाली. आचार्य भागवत प्रतिपादतात, त्या अर्थाने मी गांधीवाद स्वीकारला आहे काय? असा प्रश्न मी स्वतःला विचारू लागलो आणि त्याचे उत्तर होकारार्थी येईना. माझ्या मनात हा संघर्ष पुढे कित्येक वर्षे चालणार होता, याचीही मला यावेळी कल्पना नव्हती.

गांधीवादाच्या चर्चेबरोबर समाजवाद आणि मार्क्सवाद याही विचारांची बराकीतील या वर्गात चर्चा सुरू झाली आणि त्याला पोषक असे वाङ्मयही आम्हां लोकांना वाचण्यासाठी मिळू लागले. आमचे राजकीय शिक्षण हे या पद्धतीने नियमित, सातत्याने व मोठ्या तीव्रतेने सुरू झाले. काय वाचावे आणि काय वाचू नये, असे वाटावे, इतक्या पुस्तकांचा साठा तेथे जमला होता. एस. एम्. जोशी, ह. रा. महाजनी ही तरुण मंडळी गांधीवाद स्वीकारलेल्यांपैकी दिसत नव्हती. त्यांच्या मनात त्यासंबंधी अनेक शंका होत्या व ते त्या वेळोवेळी विचारत असत. स्वातंत्र्याच्या चळवळीसाठी समाजवादाचा विचार आवश्यक नाही का, असे प्रश्न उभे करीत आणि त्यांचे हे प्रश्न बरोबर आहेत असे मला वाटे.