कृष्णाकांठ६०

या मसूर परिषदेच्या निमित्ताने अनेक निरनिराळ्या कार्यकर्त्यांशी माझ्या ओळखी झाल्या. वाई, सातारा, वाळवे व तासगाव या तालुक्यांतील ग्रामीण भागातून आलेले कार्यकर्ते कोण आहेत व त्यांनी कायदेभंगाच्या चळवळीत काय कामगिरी केली, याची माहिती या निमित्ताने झाली. यांतले बरेचसे लोक पुढे माझ्या जीवनात माझे मित्र राहिले. खाजगी व सार्वजनिक जीवनातसुद्धा आम्ही एकमेकांना साहाय्य केले, सहयोग दिला.

यांपैकी प्रमुख व्यक्ती म्हणजे वाईचे किसन वीर, वाळव्यातले आत्माराम पाटील व पांडुरंग मास्तर आणि खटाव तालुक्यातल्या कातरखटावचे गौरीहर सिंहासने ही नावे फक्त मी वानगीदाखल देत आहे. आणखीही कित्येकांच्या ओळखी झाल्या.

गौरीहर सिंहासने हे ३० सालच्या चळवळीत तुरूंगात गेले नव्हते, परंतु आपण काही करावे, अशी त्यांची इच्छा होती. कराडला बटाणे यांच्याशी त्यांचा नात्याचा संबंध असल्यामुळे त्यांचे कराडला वरचेवर येणे-जाणे होते. कराडच्या कार्यकर्त्यांचा एकमेकांसंबंधीचा असलेला जिव्हाळा पाहून आपणही यात सामील व्हावे, असे त्यांना वाटले आणि तसे त्यांनी बोलूनही दाखविले. शेती व व्यापार या दोन्ही उद्योगांत गुंतलेले असे हे नाणावलेले लिंगायत घराणे होते. या व्यापारातून बाहेर पडणे त्यांना तितकेसे सोपे नव्हते. पण काँग्रेसच्या या चळवळीत सामील व्हावे, ही त्यांच्या मनाची ओढ होती. त्यामुळे अखेर यातून बाहेर पडण्याचा त्यांनी निर्णय घेतला व ते आमच्या गोटात सामील झाले.

आबासाहेब वीर पुढे नामांकित क्रांतिकारक नेते म्हणून प्रसिद्ध झाले. त्यांचा उल्लेख मला वारंवार करावा लागणार आहे. तीच गोष्ट आत्माराम पाटील यांची.

ग्रामीण जनतेच्या जीवनाशी समरस व एकजीव झालेले हे लोक होते, परंतु गांधीजींची सत्याग्रहाची चळवळ समाजातल्या सर्व आणि शेवटच्या थरापर्यंत घेऊन जावी, असे त्यांना वाटत होते. त्यामुळे खेड्यांतील अस्पृश्य मानला गेलेला समाज हा या चळवळीबाबत संपूर्ण उदासीन आहे, असा माझ्यासारखाच त्यांनाही अनुभव आला होता. यासाठी खास प्रयत्न करावे लागतील, असे त्यांनाही वाटत होते. परंतु त्यांचे नेमके स्वरूप काय असावे, याची निश्चित कल्पना त्यांच्याही मनाशी नव्हती.

गौरीहर सिंहासने यांच्या नावांचा उल्लेख आला. त्यामुळे मला आणखी एका गोष्टीची सहज आठवण झाली आहे. गांधी-आयर्विन करारानंतर अनेक मोठे राष्ट्रीय पुढारी देशात दौरे करू लागले होते. त्यांतील पंडित मदनमोहन मालवीय यांचा दौरा आमच्या जिल्ह्यात आला. वाई, सातारा, कराड असे दोन-तीन दिवस ते जिल्ह्यात होते. एका छानशा संध्याकाळी कराडला पं. मालवीयजी पोहोचले. स्थानिक नेत्यांनी त्यांना कृष्णेच्या संगमावर नेऊन कराडचा परिसर दाखविला. गंगाकिनारीचा हा महान पंडित कृष्णेच्या काठावरच्या शांत अशा सांयकाळच्या सुखद हवेने प्रसन्न झाला. कारण हे सर्व त्यांनी त्यांच्या रात्रीच्या भाषणात बोलून दाखविले.

या सभेच्या निमित्ताने एक छोटीशी पण वादग्रस्त घटना घडली. आमच्या कराड शहराच्या वरिष्ठ नेत्यांनी कोणत्याही प्रकारे कार्यकर्त्यांशी विचारविनिमय न करता परस्पर ठरवून टाकले, की मालवीय याच्या होणा-या प्रचंड सभेचे अध्यक्षस्थान पुण्याहून त्यांच्याबरोबर आलेले न. चिं. ऊर्फ तात्यासाहेब केळकर यांना द्यावे. सर्व कार्यकर्त्यांना जेव्हा ही बातमी कळली, तेव्हा त्यांना हे फारसे रूचले नाही.

हे असे न रूचणे हे योग्य होते, की नाही, हा वादाचा प्रश्न आहे, पण शेवटी घडली, ती गोष्ट अशी आहे, की जेव्हा सभेच्या सुरुवातीला तात्यासाहेब केळकर यांचे नाव त्या सभेच्या अध्यक्षपदासाठी सुचविले गेले, त्यावेळी दुस-या मंडळींनी नुकतेच जेलमधून परत आलेले स्थानिक पुढारी श्री. भाऊसाहेब बटाणे यांनी सभेचे अध्यक्षपद स्वीकारावे, अशी सूचना मांडली. थोडा वेळ सभेमध्ये गोंधळ माजला व अस्थिरता निर्माण झाली. परंतु यातून तडजोड निघाली, की दोघांनीही अध्यक्ष राहावे आणि त्यानुसार हे वादळ मिटले. मालवीयजींचे त्या प्रचंड सभेत साध्या, सुलभ हिंदीत सुंदर भाषण झाले.