कृष्णाकांठ२०

गावागावांमध्ये, भागाभागांमध्ये स्पर्धा असे. पुढे नामांकित झालेले असे अनेक पहिलवान अशा फडावर येत. त्यांना फडात गोलाकार फिरवत असत व त्यांना कोणी जोडीदार मिळाला नाही, तर बक्षीस देऊन त्यांचा जयजयकार होत असे. दरसाल रंगणारा कुस्त्यांचा फड  म्हणजे आमच्या देवराष्ट्राचा. श्रावणातला सरता सोमवार सागरेश्वराचा जत्रेचा दिवस. सोमवारी पालखी फिरे आणि मंगळवारी कुस्त्यांचा फड भरे. घाटाखालील व घाटावरील अशा दोन बाजूंमध्ये स्पर्धा सुरू होई. आणि चवदा-पंधरा वर्षाच्या वयापासून तो ऐन पंचविशीतील पहिलवानांच्या चांगल्या कुस्त्या तेथे होत असत. निदान पन्नास हजार माणसे अशा या कुस्त्यांच्या फडाला जमत असत, हे मी पाहिले आहे. गाव त्यासाठी मोठी वर्गणी जमा करे, कामाची वाटणी करीत असत. आणि अत्यंत शिस्तीने हा फड पुरा करत असत. या फडामुळे पुढे नामांकित झालेले आणि आमच्या राष्ट्रीय चळवळीत कार्य करू लागलेले साहेबराव कडेपूरकर हे पहिलवान मी प्रथम पाहिले. पुढे त्यांचा-माझा, त्यांची कुस्ती हा पेशा संपल्यानंतर, राजकीय क्षेत्रातला मोठा स्नेह जमला. सातारा जिल्ह्यामधील माझ्या सर्व कामाला व मला पाठिंबा देणारा माझा तो एक सहकारी बनला, याची आठवण माझ्या मनातून जात नाही.

वेगवेगळ्या पुस्तकांच्या वाचनांतून मी नवे विचार समजावून घ्यायचा जसा प्रयत्न करीत होतो, तसेच ग्रामीण जीवनाशी असलेला माझा भावनात्मक संबंध अधिक दृढ होईल, या दृष्टीने मला नकळत या ग्रामीण सांस्कृतिक क्षेत्राशीही मी समरस होत होतो. मला माझ्या वाचनाने जसे घडविले, तसेच या ग्रामीण संस्कृतीच्या अनुभवाचे हे जे स्रोत आहेत, त्यांतूनही मी जडलो-घडलो, असे म्हटले, तरी चालेल.

दिवस असे चालले होते. त्यामध्ये एक वर्ष कराडला प्लेगचा प्रादुर्भाव झाला. शाळा बंद झाल्या, परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या. आम्ही गावाबाहेर कोयनेच्या पलीकडे, सातारा रोडच्या लगत तात्पुरत्या झोपड्या बांधून राहायला गेलो. आम्ही ज्यांच्या घरी राहत होतो, त्यांनी आमच्यासाठीही एक छोटी झोपडी बांधून दिली होती. जेवणखाण आणि रात्रीचा मुक्काम शेतीवरील झोपडीमध्ये, आणि दिवसाचे चार-सहा तास गावामध्ये, असा माझा कार्यक्रम होता. गावात गेल्याशिवाय करमतच नसे. बाजारहाट गावात असे. दररोजची वर्तमानपत्रे येण्याची ठिकाणे गावातच असत. रानात राहायला गेलेली इतर कुटुंबांतील मुलेही दिवसा गावात येत असत. त्यामुळे दिवसा गावात व रात्री रानात वस्ती, असा आमचा दिनक्रम चालू होता. माझे थोरले बंधू त्यावेळी नोकरीसाठी विट्याला असत. मी आणि आई फक्त कराडला असू. माझे मधले बंधू गणपतराव प्लेगमुळे कराडची शाळा बंद होती, म्हणून काही महिन्यांसाठी तासगावच्या शाळेत गेले. निदान अभ्यासक्रम बुडू नये, हा हेतू होता. त्याप्रमाणे जवळ जवळ चार महिने ते तासगावात आणि आम्ही कराडात, अशी वाटणी झाली होती. गणपतराव अधून मधून तासगावहून कराडला येत.

या बंधूंचे माझ्यावर मोठे प्रेम होते. उंचीने मध्यम, काळासावळा वर्ण, चेह-याची धाटणी थोडी-फार माझ्यासारखीच, डोक्याला रंगवलेला फेटा, हातामध्ये छत्री आणि डुलत डुलत चालण्याची सवय हे त्यांचे विद्यार्थिदशेपासूनचे नजरेसमोर असलेले चित्र अखेरपर्यंत कायम राहिले. माणसांची ओळख करून घेण्यात व मैत्री जमविण्यात ते अतिशय पटाईत असत. लोकांचे प्रश्न समजून घेऊन त्यात त्यांना मदत करावी, ही त्यांची पहिल्यापासूनची हौस. त्यामुळे त्यांच्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या मंडळींतही ते लोकप्रिय होते. त्यांना खेळण्याचा नाद असे. विशेषतः त्यांच्या वयाच्या विद्यार्थ्यांबरोबर ते फार उत्तम कुस्ती खेळत असत. टिळक हायस्कूलमधल्या एका कुस्त्यांच्या स्पर्धेत त्यांनी अतिशय उत्तम कुस्ती करून बक्षीस मिळविले होते. ही अटीतटीची कुस्ती मी पाहायला गेलो होतो. आणि ती कुस्ती व त्यातील त्यांचे प्रावीण्य पाहून मला माझ्या भावाबद्दल नितांत आदर वाटला. त्यांच्याइतकी चांगली कुस्ती मला येत नसे; परंतु त्यांच्याबरोबर मी तालमीत जात असे. अधून मधून त्यांच्या आग्रहाने मी फेटाही बांधत असे. त्यांची शरीरप्रकृती माझ्यापेक्षा उत्तम असे.