कृष्णाकांठ१०७

राघूआण्णांना वाईट वाटले; पण माझे हे प्रामाणिक मत त्यांनी स्वीकारले आणि ते म्हणाले,

''तुम्ही सर्वच मंडळी जर या विचाराची असाल, तर मीही हळूहळू त्यातून मुक्त होण्याचा प्रयत्न करीन. कारण या जिल्ह्यात तुम्ही-आम्ही सर्वांनी एकत्र मिळून काम करावयाचे आहे.''
मी सांगितले,

''समाजवादाचा पाठपुरावा करण्याची माझी भूमिका कायम आहे. परंतु त्याकरता काँग्रेस-अंतर्गत एखादा पक्ष काढावा, ही कल्पना मला पटत नाही.''

वैचारिक दृष्ट्या काँग्रेसला प्रभावित करण्याकरता काँग्रेसच्या अंतर्गत असा काही गट असला, तर चालेल, हीही माझी त्यापाठीमागची भूमिका होती, ती राघूआण्णांनी ऐकून घेतली आणि अशा रीतीने काही निमित्ताने माझा समाजवादी पक्षाशी काही काळ आलेला संबंध संपला.

आता मी मानवेंद्रनाथ रॉय यांच्या विचाराच्या प्रभावाखाली अधिक जात होतो. पण हे सर्व होत असताना महात्मा गांधी, पंडित नेहरू आणि त्यांचे राजकारण यासंबंधीची माझी भावना पहिल्यासारखीच जिव्हाळ्याची नि आपुलकीची राहिली. रॉयवादाचे मला जे आकर्षण वाटले, ते मी समजून घ्यावयाचा प्रयत्न केला. रॉय त्यावेळी पत्रव्यवहाराने आपले विचार त्यांच्या कार्यकर्त्यांना, मित्रांना कळवीत असत. ते त्यावेळी इंग्रजांच्या जेलमध्ये सात वर्षांची शिक्षा भोगत होते. परंतु त्यांनी जेलमधूनसुद्धा आपल्या बाहेरच्या कार्यकर्त्यांशी फार संघटित संपर्क ठेवला होता आणि आपले विचार, देशातील घडलेल्या घटना आणि त्यांवरील त्यांच्या प्रतिक्रिया, देशामध्ये काँग्रेस-अंतर्गत बांधणी कशी करावी, यासंबंधी त्यांच्या कल्पना ते आपल्या सहकाऱ्यांना कळवीत असत. त्याच आधारावर त्यांची मंडळीही माझ्याशी बोलत असत. रॉय यांचेविचार आम्हांला आकर्षित करीत होते, त्यांच्यापेक्षाही जास्त त्यांचे क्रांतिकारक म्हणून व्यक्तिमत्त्व होते, त्याचे आम्हांला अधिक आकर्षण होते. तरुणपणी एक क्रांतिकारक म्हणून ते हिंदुस्थानमधून बाहेर पडले आणि आपल्या तीव्र बुद्धिमत्तेच्या जोरावर बाहेर-परदेशात असताना त्यांनी मार्क्सवादाचा सूक्ष्म आणि सखोल अभ्यास करून त्यामध्ये प्रावीण्य मिळविले. इतकेच नव्हे, तर मेक्सिको या देशातील कम्युनिस्ट पक्ष स्थापन करण्याच्या कामात त्यांचा सिंहाचा वाटा होता, ही गोष्ट आता सर्वश्रुत आणि मान्य झाली आहे. पुढे मेक्सिकोहून प्रवास करीत करीत रशियन राज्यक्रांती झाल्यानंतर ते रशियात पोहोचले आणि लेनिनचे एक वैचारिक सहकारी म्हणून त्यांनी तेथे काम केले.

रशियन राज्यक्रांतीनंतर आशियातील पूर्वेकडील देशांमध्ये भांडवलशाहीला विरोध करण्यासाठी चळवळी कशा उभ्या करावयाच्या, यासंबंधाने जेव्हा त्यांच्या आंतरराष्ट्रीय संघटनेमध्ये चर्चा होत, त्यांमध्ये ते महत्त्वाचा भाग घेत असत.

याबाबतीत लेनिनच्या बरोबरीने त्यांनी आपले विचार मांडले आणि केव्हा केव्हा त्यांचा स्वीकारही झाला, असा त्यांचा लौकिक होता. आणि त्यामुळे माझ्या तरुण दृष्टीपुढे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाभोवती एक प्रकारचे वलय प्राप्त झाले होते.

असे जरी असले, तरी मी काही त्यांच्या विचारांची बांधिलकी स्वीकारलेली नव्हती. माझे मित्र श्री. आत्माराम बापू पाटील हे मात्र पूर्णतया रॉयसाहेबांना वाहून घेण्याच्या मनःस्थितीत होते. त्यांच्या-माझ्यांत अधूनमधून जेव्हा चर्चा होत असे, तेव्हा मी त्यांना म्हणत असे,

''बापू ,काँग्रेस समाजवादी पक्षासंबंधी माझी जी परिस्थिती झाली, ती तुमची या बाबतीत होणार नाही, याची काळजी घ्या. काँग्रेस संघटनेत राहून जर आपल्याला काम करावयाचे असेल, तर त्याच्याशी सुसंगत अशा त्यांच्या काही कल्पना असल्या, तर त्यांचा आपण जरूर स्वीकार करू या. तुम्ही तर जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी आहात. सामान्य जनतेपासून बाजूला पडाल, असे काही करू नका.''

परंतु या चर्चा अशाच मोघम राहिल्या.