कृष्णाकांठ१०५

- आणि आज पन्नास वर्षांनंतरही मी हे कबूल केले पाहिजेल, की माझ्या आतापर्यंतच्या अनुभवाने ही कसोटी माझ्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाची आणि व्यवहार्य कसोटी म्हणून नित्य वावरत राहिली आहे.

पुढेही असे अनेक प्रसंग माझ्या राजकीय आयुष्यात आले, तेव्हा मी या कसोटीवरच माझ्या पुढील पर्यायांचा स्वीकार करावयाचा, की नाही, हे ठरवीत आलो आहे. नंतर आम्ही दोघेही इतर मित्रांशी बोलत राहिलो. तेव्हा त्यांचा याला फारसा विरोध नाही आणि उत्साहही नाही, असे आमच्या जिल्ह्यापुरते माझ्या लक्षात आले. शेवटी मी राघूआण्णांना होकार दिला आणि त्यापूर्वी त्या पक्षाचे काम करणा-या कार्यकर्त्यांना भेटावे, असे सुचविले. राघूआण्णा मला पुण्याला घेऊन गेले आणि त्यांच्यासमवेत काँग्रेस समाजवादी विचारांच्या त्यांच्या मित्रांशी भेट आणि चर्चा घडवून आणली. ही सर्व मंडळी देशभक्त तर होतीच, पण बुद्धिमानही वाटली. परंतु त्याची मांडणी बरीचशी पुस्तकी आहे, असे माझ्या लक्षात आले आणि या पुस्तकी विचाराला शहरी झालरही लागल्यासारखे मला वाटले. त्यामध्ये जनतेमधील आंदोलनाच्या कार्याचा अनुभव मुळीच नव्हता.

आम्ही परत आल्यानंतर राघूआण्णांना ही गोष्ट मी सांगितली, तेव्हा ते म्हणाले,

''तुझे काहीतरीच आहे. त्यांच्या शहरी झालरीशी आपल्याला काय कर्तव्य आहे? आपला संबंध विचारांशी आहे.''

- आणि शेवटी राघूआण्णांच्या प्रेमाखातर मी काँग्रेस समाजवादी पक्षाचे सदस्यत्व घ्यावयाचे ठरविले आणि घेतलेही. राघूआण्णा पुण्याहून आले, म्हणजे त्यांचे तेथील स्नेही एस्. एम्. जोशी आणि ना. ग. गोरे यांच्याशी त्यांच्या झालेल्या चर्चा आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वासंबंधी अनेक गोष्टी सांगून आमच्यावर प्रभाव पाडीत असत.

ज्यावेळी राघूआण्णा आणि मी हे करीत होतो, त्यावेळी माझे दुसरे मित्र आत्माराम बापू पाटील आणि इतर मंडळी हे दुस-या विचाराच्या संपर्कात आलेली होती आणि तो विचार म्हणजे मानवेंद्रनाथ रॉय यांचा विचार. आमच्या जिल्ह्यातील बरेचसे प्रमुख कार्यकर्ते मानवेंद्रनाथ रॉय यांच्या विचारांच्या प्रभावाखाली गेले होते. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, भय्याशास्त्री वाटवे, ह. रा. महाजनी, वामनराव कुलकर्णी वगैरे मंडळी मानवेंद्रनाथ रॉय यांनी आंतरराष्ट्रीय क्षेत्रात केलेले काम आणि त्यांचे क्रांतिकारक जीवन यांचे मोठे आकर्षक चित्र आमच्या डोळ्यांपुढे उभे करीत असत.

राघूआण्णांच्या सहवासामुळे आणि प्रेमामुळे मी काँग्रेस समाजवादी पक्षाचे सभासदत्व स्वीकारले असले, तरी मानवेंद्रनाथ रॉय यांच्या विचाराच्या प्रभावाखाली असलेल्या माणसांशी माझा निकटचा संपर्क होताच. ह. रा. महाजनी हे आता आमच्या जिल्हा काँग्रेस कमिटीचे चिटणीस म्हणून सातारला राहायला आले होते. तेही वारंवार माझ्याशी येऊन बोलत असत. त्यांचेही समाजवादी विचारांची वाढ करण्याचे धोरण होते. परंतु आता त्यात अधिक बारकावे निर्माण झाले होते.

काँग्रेस समाजवादी पक्षाच्या पंखांखाली मी जातो आहे, ही गोष्ट माझ्या या मित्रांना फारशी पसंत नव्हती. त्यांचे म्हणणे असे होते, की ही मंडळी खरा समाजवाद देशात आणू शकणार नाहीत. हे गांधींचा अहिंसावाद समाजवादाच्या परिभाषेत मांडण्याचा फक्त प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या  वैचारिक भूमिकेत मूलभूत असे काही क्रांतिकारकत्व नाही. हिंदुस्थानचे सामाजिक व आर्थिक प्रश्न सुटायचे असतील, तर स्वराज्याची चळवळ अशा कार्यक्रमावर व अशा पद्धतीने बांधायला पाहिजेल आहे, की तिची जसजशी प्रगती होईल, तसतसे त्यातून समाजवादाचे स्वप्न साकार व्हायला मदत होईल. मी या दोन्ही विचारांची मनाशी तुलना करीत असे; आणि नाही म्हटले, तरी मला लक्ष्मणशास्त्री जोशी, भय्याशास्त्री वाटवे, ह. रा. महाजनी हे जे म्हणत असत, त्याचा अर्थ अधिक पटल्यासारखा वाटे. मनाची द्विधा अवस्था म्हणतात, ती ही होती. आणि मनाची अशी द्विधा अवस्था झाल्याशिवाय विचारांचा विकास होत नाही, असे मी मानतो.