कृष्णाकांठ१००

मी कोल्हापूरला पोहोचल्यानंतर एक-दोन दिवसांतच मला निरोप समजला, की श्री. आत्माराम बापूंचे नाव उमेदवार म्हणून स्वीकारले गेले आहे. वर्तमानपत्रांत ही बातमी आली.

पुढे काही दिवसांनी मला समजले, की माझ्या मुंबईच्या सरदार पटेलांशी झालेल्या भेटीचा या संदर्भात चांगलाच उपयोग झाला होता.

या तऱ्हेने उमेदवारीची ही एक लढाई सातारा जिल्ह्यात आम्ही जिंकली होती. निवडणुकीचे तिकीट मिळविण्याकरता कराव्या लागणा-या खटपटी-लटपटी यांच्या चर्चा आजही वर्तमानपत्रांत नेहमी वाचायला आणि ऐकायला येतात. पण मी ही जी तपशीलवार हकीकत दिली आहे, तिचे कारण जनजीवनाला ढवळून काढणा-या एका आंदोलनानंतर त्या आंदोलनात सैनिक असणा-या कार्यकर्त्याला जर लोकप्रतिनिधी म्हणून मान्यता मिळाली नसती, तर त्या आंदोलनाचा तो अपमान झाला असता.

आज जेव्हा मी पाठीमागे वळून पाहतो, तेव्हा सातारा जिल्ह्यातील नव्या ग्रामीण नेतृत्वाचा उदय या उमेदवारीने केलेला आहे, ही ऐतिहासिक वस्तुस्थिती आहे. ही उमेदवारी आत्माराम पाटलांना न मिळता जर जुन्या ब्राह्मणेतर चळवळीतील कुणा जुन्या प्रतिष्ठिताला मिळाली असती, तर चळवळीमध्ये एक प्रकारचे निराशेचे वातावरण निर्माण झाले असते.

आत्माराम बापूंच्या या उमेदवारीचे स्वागत सबंध सातारा जिल्ह्यामध्ये मोठ्या उत्साहाने झाले. आम्ही सातारला जाऊन भाऊसाहेब सोमण आणि सर्व मंडळींचे आभार मानून आलो. कारण आम्हांला जिल्ह्याच्या नेतृत्वाशी सुखकर संपर्क राहावा, अशी इच्छा होती. त्यांनी समाधान व्यक्त केले आणि निवडणुकीच्या तयारीसाठी कार्यशील राहा, असे सांगितले.

या निवडणुकीसारखी निवडणूक क्वचितच झाली असेल. तीमध्ये ईर्ष्या होती. विरोधी बाजूला श्री. आण्णासाहेब कल्याणी व एक नवे वकील श्री. शंकरराव मोहिते हे उमेदवार म्हणून उभे होते. काँग्रेसचे तीन उमेदवार हे, शंकरराव साठे यांनी जातवार उमेदवार उभे करण्याची जी स्ट्रॅटेजी सांगितली, त्यानुसार एक मराठा, एक जैन आणि एक ब्राह्मण असे होते. ब्राह्मण होते, ते श्री. शिराळकर, जैन होते, ते श्री. भाऊसाहेब कुदळे. तत्त्वतः विचार करता अशा तऱ्हेने जातवार वाटणी करणे म्हणजे जातीयवादाला प्रोत्साहन देण्यासारखे होते व वैचारिक पराभवाला निमंत्रण देण्यासारखे होते. आम्ही आत्माराम बापू पाटलांकरता प्रयत्न करीत होते, ते काही मराठा म्हणून नव्हे, तर ग्रामीण जनतेत जे राष्ट्रीय आंदोलन झाले, त्याचा प्रतिनिधी म्हणून आत्माराम पाटील यांचे नाव आम्हां सर्वांच्या डोळ्यांपुढे होते.

निवडणूक मोठ्या अटीतटीने झाली. आमच्याजवळ प्रवासाची साधने नव्हती. आत्माराम पाटलांनी त्यांच्यासाठी थोडे दिवसांसाठी एक मोटार कशी तरी मिळविली होती. बाकी आम्ही सर्व सर्व्हिस मोटारी आणि सायकली यांच्या जिवावर प्रवास करीत होतो. मी कराड आणि पाटण या दोन तालुक्यांमध्ये प्रचाराला गेल्याचे आठवते. सभांतून फक्त काँग्रेस पक्षाचाच प्रचार सुरू असे आणि आम्ही काँग्रेसच्या तिन्ही उमेदवारांसाठी प्रचार करीत होतो. विरोधी पक्षाच्या प्रचाराची तऱ्हा अजब होती. प्रमुख माणसे बोलावून कराड किंवा इस्लामपूर अशा ठिकाणी नेऊन त्यांच्याशी वाटाघाटी होत असत. गावोगाव निरोप पाठविले जात असत. आम्हांला तसे करून चालणार नव्हते. आम्हांला अजून लोकांकडे प्रत्यक्ष जाण्याची गरज होती आणि हौसही होती आणि त्याप्रमाणे आम्ही गावोगाव जात असू. लोकांना जमवून जाहीर सभा घेत असू.

लोकांत हळू हळू उत्साह वाढत गेला आणि आमच्या सभांना गर्दी होऊ लागली. दिवसातून चार-पाच तरी सभा मी जवळ जवळ तीन आठवडे करीत होतो. सर्व समाज ढवळून निघाला होता, असे म्हटले; तरी चालेल.

या निवडणुकीच्या निमित्ताने मी समाजाच्या सर्व थरांमध्ये अगदी खोल उतरू शकलो. माझ्यापेक्षा तरुण असलेल्या नव्या मुलांच्या ओळखी झाल्या. आणि या जिल्ह्याच्या सार्वजनिक जीवनात माझे स्वतःचे असे स्थान निर्माण झाल्याची जाणीव मला झाली.