कृष्णाकांठ१०४

सुरुवातीच्या काळात जहाल-मवाळ, पुढे फेर-नाफेर आणि आता जेव्हा ३० ची चळवळ सुरू होऊन काँग्रेसच्या इतिहासाने एका नव्या पर्वामध्ये प्रवेश केला होता, तेव्हा समाजवादाच्या विचाराने या मतभेदांची जागा घेतली. समाजवाद हा शब्द जेव्हा तो स्वीकारला, असे मी म्हणतो, तेव्हाही तो शब्द अतिव्याप्त अशा स्वरूपात आम्ही वापरत होतो. कारण समाजवाद या शब्दाच्या पाठीमागे विचारांचे इतके वेगवेगळे पदर आहेत, की त्या चर्चेत पडणे सुतराम् शक्य नाही. मी जेव्हा म्हणतो, की मी स्वातंत्र्य-सैनिक म्हणून काँग्रेसचे व्यासपीठ हे मूलभूत मानतो आणि त्याच वेळी समाजवादही स्वीकारतो, तेव्हा त्याचा एक मर्यादित अर्थ असतो; आणि हा मर्यादित अर्थ एवढाच आहे, की राजकीय स्वातंत्र्य म्हणजे निव्वळ इंग्रजांचे राज्य जाऊन या देशातील जनतेची प्रगती होणार नाही. त्याचबरोबर आमच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनामध्ये मूलभूत फेरफार करावे लागतील आणि त्यासाठी स्वातंत्र्याचा अर्थ निश्चित करण्याची गरज आहे, असा विचार आम्हां मंडळींच्या मनात आला.

एकदा हा अर्थ निश्चित झाला, म्हणजे त्या अर्थाप्रमाणे त्या स्वातंत्र्याची प्राप्ती कशी करायची, याचा मार्ग सुनिश्चित करून घेतला पाहिजे. या मर्यादित अर्थाने आम्ही समाजवादाचा विचार स्वीकारला होता.

त्यावेळी समाजवादाचा विचार करणारे आणि त्यासाठी स्वतःला बांधून घेतलेले काँग्रेसच्या बाहेर कम्युनिस्ट पक्षासारखे दुसरे पक्षही होते. ते लहानमोठे असतील; परंतु त्यांचे अस्तित्व स्वतंत्र होते. महात्मा गांधींचे नेतृत्व म्हणजे त्यांच्या अहिंसात्मक सत्याग्रहाच्या कल्पनेचा स्वीकार आणि संपूर्ण स्वातंत्र्याच्या मागणीचा आग्रह, ही काँग्रेस कार्यकर्त्यांची मूळ भूमिका. त्याला जोडून सामाजिक आणि आर्थिक बदलाची नवी भूमिका घेऊन मी इतरांबरोबर जेलमधून बाहेर पडलो. शास्त्रीय समाजवादाचा स्वीकार करावा, असा आग्रह करणारी माणसे भेटली, की त्यांच्याशी चर्चा करताना आमची गडबड उडे.

परंतु त्या खोलात शिरण्याची त्यावेळी मनाची तयारी नव्हती. मी स्वतःलाच बजावले होते, की विचारात जे बदल व्हावयाचे असतील, ते शेवटी जनआंदोलनाच्या अनुभवांतून झाले पाहिजेत. काँग्रेसची मूळ निष्ठा आणि समाजवादाचा दृष्टिकोन यांचा मेळ घालून आपण कार्य करावयाचे. मी समाजवाद स्वीकारला, याचा त्यावेळी एवढाच मर्यादित अर्थ होता.

आम्ही जेलमधून आल्यानंतर काही महिन्यांनी मला समजले, की १९३२ सालीच देशातल्या काही प्रमुख तरुण नेत्यांनी जेलमध्येच एकत्र विचार करून काँग्रेस समाजवादी पक्ष स्थापन करण्याचा संकल्प सोडला होता. हा पक्षही काँग्रेस-अंतर्गत पक्ष होता. परंतु स्वातंत्र्यासाठी काँग्रेस संघटनेला समाजवादी विचारांची दृष्टी देऊन एक शक्तिशाली शस्त्र बनवावयाचे, असा या मंडळींचा विचार असावा. यावेळची माझी जी मनोभूमिका होती, ती या विचारांशी मिळतीजुळती अशी होती. त्यामुळे माझे मित्र राघूआण्णा यांनी एक दिवस मला सुचविले,

''हा जो नवा विचार आणि संघटना जयप्रकाश नारायण, नरेंद्र देव वगैरे पुढाऱ्यांच्या मार्गदर्शनाने निघत आहे, त्याच्याशी आपण समरस झाले पाहिजे.''

मी त्यांना सांगितले,

''असेच काहीसे विचार माझ्याही मनात आहेत.''

मग त्यांनी विचारले,

''अडचण कोठे आहे ?''

मी सांगितले,

''माझी अडचण एवढीच आहे, की आपण ज्या कार्यकर्त्यांबरोबर काम करतो आहोत, त्यांना हे पटविल्याशिवाय असे पाऊल उचलल्याने आपण एकाकी तर नाही पडणार?''