कृष्णाकांठ१०१

या निवडणुकीच्या प्रचारासाठी पंडित जवाहरलाल नेहरू यांची भेट कराड व सातारा या ठिकाणी झाली. पंडितजींची कराडची सभा सकाळी आठ वाजता होती. अनेक तालुक्यांतून रात्रीचा प्रवास करून शेतकरी आले होते. एक लाखावर समाज कृष्णाकाठच्या स्वामीची बाग व वाळवंट या परिसरात जमला होता. कराडात प्रथमच या सभेमध्ये लाऊड स्पीकरचा वापर केला गेला. आमचे काँग्रेसचे उमेदवार श्री. शिराळकर हे सधन गृहस्थ होते. त्यामुळे हा खर्च करता येणे आम्हांला शक्य झाले. अशा तऱ्हेची कराडमधली ही पहिली विराट सभा झाली. पंडितजींच्या या भाषणाने लोकांत एक अपूर्व चैतन्य निर्माण झाले.

या प्रचारासाठी आम्हांला दुसरे महत्त्वाचे पाहुणे लाभले, ते म्हणजे मानवेंद्रनाथ रॉय. मी मानवेंद्रनाथ रॉय यांच्या विचाराबद्दल आणि त्यांच्या क्रांतिकारी पूर्व जीवनाबद्दल पुष्कळ ऐकले होते आणि काहीसे वाचलेही होते. त्यांची काही पत्रे आणि लेख यांची माहिती आमच्या जिल्ह्यातले त्यांच्या विचारांचे जे भक्त होते, त्यांच्याकडून मिळाली होती. त्यामुळे मी मागे सांगितल्याप्रमाणे मनामध्ये या व्यक्तिमत्त्वाबद्दल एक प्रकारचे राजकीय आकर्षण निर्माण झाले होते. या निवडणुकीच्या प्रचाराच्या दिवशी मी त्यांना प्रथम पाहिले व भेटलो. त्यांच्या बरोबर श्रीमती मणिबेन कारा ह्याही प्रवास करीत होत्या. त्यांच्याशी चार-दोन मिनिटांचे काही औपचारिक बोलणे, हीच त्यांची-माझी पहिली ओळख. सहा फुटांपेक्षा जास्त उंची असलेला, चेह-यावर बुद्धिमत्तेचे तेज सहजदर्शनी दिसणारा हा पुरुष प्रकृतीने काहीसा खालावलेला होता, पण स्वभावाने गंभीर म्हणून प्रभावी वाटला.

निवडणुकीचा प्रचार यथासांग पार पडला आणि आमच्या काँग्रेसच्या उमेदवारांपैकी आत्माराम पाटील सर्वांत जास्त मते मिळवून निवडून आले. श्री. पांडूआण्णा शिराळकर हेही निवडून आले. आमचे तिसरे काँग्रेसचे उमेदवार भाऊसाहेब कुदळे यांचा मात्र पराभव झाला. आम्हांला आमच्या काँग्रेसच्या या एका उमेदवाराच्या पराभवाची खंत लागून राहिली. परंतु उमेदवार निवडणुकीचा जो व्यूह रचला होता, तो चुकीचा असल्यामुळे बिचा-या कुदळे यांना पराभवाचे शल्य स्वीकारावे लागले.

१९३७ ची ही निवडणूक सर्व राज्यांत, त्याचप्रमाणे आमच्या जिल्ह्यात घडलेली एक अतिशय महत्त्वाची घटना होती, यात शंका नाही. कारण त्यामुळे राजकीय चळवळीचे पाऊल पुढे पडले होते. यातून काँग्रेसचे सरकार बनणार होते. काँग्रेसने मंत्रिमंडळ बनवावे, की नाही यासंबंधाने चर्चा सुरू झाल्या. माझी स्वतःची त्यावेळची भावना मला माहीत आहे. १९३५ च्या कायद्याकडे आम्ही विरोधाच्याच भावनेने पाहत होतो, परंतु त्या कायद्याखाली मिळालेल्या सत्तेच्या आधारावर सरकार बनवून जनतेची शक्ती अधिक संघटित करण्याची संधी त्यामुळे मिळणार होती. स्वातंत्र्य-चळवळीच्या दृष्टीनेही ते अत्यंत युक्त आहे, असे माझे मत होते. सत्तेपासून लांब राहावे, या मोहात गुंतू नये, असे म्हणणा-या संन्याशांचा एक वर्ग होता, परंतु त्यामध्ये काही राजकीय विचार दिसत नव्हता. सत्तेपासून दूर राहण्याचा जो एक पोकळ सोवळेपणा असतो, तोच त्यात होता.

ही राजकारणी वृत्ती आमच्या जिल्ह्यापुरती किंवा महाराष्ट्रापुरती मर्यादित नव्हती, तर देशाच्या पातळीवरही हे विचार मांडणारे समाज नेते होते. जवाहरलालजींनीही व्यक्तिशः आपली अशीच भावना असल्याचे व्यक्त केले होते. पण वर्किंग कमिटीचा ठराव सत्ता स्वीकारावी, असा झाला. तेव्हा त्यातून जनतेला निश्चित प्रकारचे मार्गदर्शन झाले. आमच्या जिल्ह्यातून कोणी मंत्री होईल, असे आम्हांला कधीच वाटले नव्हते किंवा आमची तशी अपेक्षाही नव्हती. परंतु आमचा तरुण नेता आत्माराम बापू पाटील हे विधिमंडळात जाऊन शेतकरी समाजाचे आणि गरीब लोकांचे प्रश्न पोटतिडकीने मांडेल आणि आपल्या कर्तृत्वाने आपल्याभोवती तेथल्या अनेक मंडळींची शक्ती उभी करेल, अशी आशा होती. आत्माराम बापूंनी सुरुवात तर चांगली केली होती. आणि त्यांच्याबद्दल लोकांमध्ये एक कौतुकमिश्रित आदराची भावना निर्माण झाली होती. आमच्या जिल्ह्यातील लोक जिल्ह्याचा एक नवा नेता या दृष्टीने त्यांच्याकडे पाहू लागले आणि ग्रामीण नेतृत्वाचे एक नवे केंद्र निर्माण झाले, असा माझा अनुभव आहे. अनेक प्रश्न घेऊन लोक आत्माराम बापू यांच्याकडे तर जातच, आता ते आमच्याकडेही येऊ लागले आणि माझ्या असे लक्षात आले, की मीसुद्धा सातारा जिल्ह्यातील एक महत्त्वाचा घटक बनलो आहे, ही भावना मनाला प्रसन्न करणारी होती आणि त्याचबरोबर त्या क्षेत्रात अधिक उमेदीने काम करण्याकरता प्रोत्साहन देणारी अशी शक्ती होती.