साहेब नियमित शाळेत जाऊ लागले. बरोबरीचे मित्र दोन वर्षे पुढे गेले होते. साहेबांपेक्षा वयानं लहान असलेल्या वर्गबंधूबरोबर साहेब शाळेत जाऊ लागले. शाळेत शिक्षक जे शिकवीत असत त्या विषयात आपण कितीतरी पुढे गेलो आहोत. आपली परीक्षा आताच घेतली तर बरं होईल, असं साहेबांना वाटायचं. अभ्यास केल्यानंतर फावल्या वेळेत सर्वहरा वर्गात काम करायचं, असं जेलमध्ये असतानाच सत्याग्रहींनी ठरविलं होतं. साहेब हरिजन वस्तीत जाऊ लागले, तेथील कार्यकर्त्यांशी चर्चा करू लागले. स्वातंत्र्य चळवळीबद्दल दलित वर्गात आस्था का नाही याची कारणं साहेब शोधू लागले. दलितांना मंदिरप्रवेशाची चळवळ फोफावत होती. महार समाजातील साहेबांच्या मित्रांना मंदिर प्रवेशाबद्दल काडीचीही आत्मीयता वाटत नव्हती. ''मंदिर प्रवेशाने आमचे पोट थोडेच भरणार आहे ? गावातील लोकांचा रोष कशाकरिता पत्करायचा ?'' असं मत दलित मंडळी व्यक्त करीत असे. महात्मा गांधींचा मंदिर प्रवेश कार्यक्रम दलित मंडळींच्या पचनी पडला नाही; पण त्यांचं महत्त्व काही कमी होऊ शकत नाही, असं साहेबांना वाटायचं.
जुन्या आणि नव्या मित्रांच्या सहकार्यानं 'हरिजन सेवा' ही चळवळ दलित वस्तीत चालवायची, असं साहेबांनी ठरविलं. कराड तालुक्यातील शणोली गावचे मूलचंदभाई महाविद्यालयीन शिक्षण अर्धवट सोडून हरिजन सेवा करण्याकरिता गावी आले होते. साहेबांनी त्यांच्याशी संपर्क साधला. चर्चेअंती एक मंडळ स्थापन करून त्या माध्यमातून कार्य करायचं ठरलं. या कामाकरिता वरिष्ठांचा आशीर्वाद आवश्यक वाटला म्हणून साहेबांनी शहरातील थोर देशभक्त पांडुरंगअण्णा शिराळकर यांची भेट घेतली. हे देशभक्त धनिक असल्यानं त्यांनी साहेबांना प्रोत्साहन दिलं.
सुटीच्या दिवशी कराडच्या पंचक्रोशीतील खेड्यांना साहेबांनी भेटी देण्याचा सपाटा लावला. सोबत मित्रमंडळी असायची. खेड्यातील दलित वस्तीत त्यांचं चांभार व मातंग समाजात स्वागत व्हायचं; पण दलितांतील महार समाज मात्र फटकून राहायचा. साहेबांच्या हे लक्षात आल्यानंतर कराड येथील महार समाजातील कार्यकर्ते मोहिते यांची भेट घेण्याचं साहेबांनी ठरविलं. हे मोहिते कराडच्या नगरपालिकेत नोकरीवर होते. साहेबांनी या मोहितेंची भेट घेतली. माणूस चाणाक्ष वाटला. हरिजन सेवा चळवळीबद्दल त्यांच्या मनात आकस होता. साहेबांनी या चळवळीबद्दलच्या शंका-कुशंकांचं निरसन केलं. मोहितेंनी साहेबांना पूर्णपणे टाळलं तरी साहेबांनी या समाजात काम करण्याचं ठरविलं. प्रथम या समाजाला शिक्षित करू, यांच्यात शिक्षणाचे प्रमाण वाढले म्हणजे हा समाज आपोआपच स्वातंत्र्य चळवळीच्या मुख्य प्रवाहात सामील होईल, असे त्यांना वाटत होते.
दलित कार्यकर्ते मोहिते यांच्या तर्हेवाईक वागणुकीमुळं साहेब नाउमेद न होता जोमाने कामाला लागले. मूलचंदभाई यांनी शणोली येथे व साहेबांनी कराडमध्ये रात्रीची शाळा दलित वस्तीत सुरू करण्याचं ठरविलं. कराडमधील दलित वस्तीतील कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन त्यांना साहेबांनी विश्वासात घेतलं. साहेबांच्या कार्याबद्दल ज्यांना माहिती होती अशा एक-दोन कार्यकर्त्यांनी आपल्या वस्तीत सहकार्य करण्याचं साहेबांना आश्वासन दिलं. या कार्यक्रमाच्या शुभारंभाला कुणाला बोलवावं याविषयी साहेब विचार करू लागले. या समाजासाठी ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य खर्ची घातलं अशा कर्मयोग्याला आमंत्रित करावं असं साहेबांना मनोमन वाटायचं.
१९३० च्या चळवळीतील हरिभाऊ लाडांची साहेबांना आठवण झाली. हरिभाऊ लाड येरवड्याच्या तुरुंगातून सजा भोगून परत आल्यानंतर त्यांचे जेलमधील अनुभव ऐकण्याकरिता साहेबांसह अनेक कार्यकर्ते हरिभाऊ लाड यांच्या गाठीभेटी घेत असत. हरिभाऊ लाड यांनी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या आठवणी साहेबांना सांगितल्या होत्या. हरिभाऊ लाड अपंग असल्यानं जेलमधील सर्वांचे आवडते होते. विठ्ठल रामजी शिंदे हरिभाऊंना जीव लावत असत. या रात्रीच्या शाळेच्या उद्घाटनाला विठ्ठल रामजी शिंदे यांना निमंत्रण देण्याचं साहेबांनी ठरविलं.