थोरले साहेब - २२१

अशा अनिश्चिततेच्या वातावरणात जयप्रकाशजींनी संपूर्ण परिवर्तनाचा नारा दिला.  भ्रमनिराश झालेली जनता जयप्रकाशजींच्या आंदोलनाकडे आकर्षित झाली.  राजकीय अस्थिरतेचा कडेलोट झाला.  जयप्रकाशजींनी दिल्लीतील सत्ताधार्‍यांसमोर एक आव्हान उभं केलं.  आंदोलनाची परिसीमा काँग्रेसची सत्ता उलथून टाकण्यापर्यंत पोहोचली.  सत्ता उलथून आपल्या हातातून जाते की काय या शंकेच्या भोवर्‍यात इंदिराजी अडकल्या.  व्यक्तिस्तोमाच्या तटबंदीमध्ये इंदिराजींना सुरक्षितता वाटू लागली.  याच विचारानं इंदिराजींच्या एकाधिकारशाहीला बळकटी मिळाली.  त्यांनी लोकशाहीमध्ये घेऊ नये तो आणीबाणीचा निर्णय २६ जून १९७५ ला घेतला.

संपूर्ण परिवर्तनाचे आंदोलन चिरडून काढण्यासाठी आणीबाणीच्या कार्यवाहीला विरोध करणार्‍यांची धरपकड सुरू केली.  देशभरात जयप्रकाशजींसह अनेक नेत्यांना व कार्यकर्त्यांना कारावासात डांबण्यात आलं.  ही धरपकड सुरू झाल्यानंतर देशांत आणीबाणी लागू झाल्याचं साहेबांना माहीत झालं.  परदेशातून साहेबांना फोन येऊ लागले.  विचारणा होऊ लागली,

''तुम्ही नजरकैदेत आहात का ?  इकडील वर्तमानपत्रात तशा बातम्या येत आहेत.''

बीबीसी लंडनवरून प्रक्षेपित करण्यात आलेल्या बातमीत म्हटलं, ''साहेब आणि जगजीवनरामजींना नरजकैद करण्यात आलं आहे.''

ही बातमी ऐकून दिल्लीतील एक वरिष्ठ पत्रकार अनंत सात्त्वि साहेबांना भेटण्याकरिता आले.

त्यांना पाहताच साहेबांनी त्यांना विचारलं, ''बातमीची शहानिशा करायला आला का ?  आताच परदेशातून दूरध्वनी आले.  ते विचारणा करताहेत, नजरकैदेत आहात का म्हणून...''

साहेबांनी अनंत सात्त्विसोबत चहापान केलं.  राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय समस्या या आणीबाणीच्या निर्णयानं निर्माण होतील.  त्या समस्यांना आपल्याला तोंड द्यावं लागणार अशी चर्चा केली.  एक-दोन दिवसांत परदेश दौर्‍यावर निघणार आहे असंही त्या पत्रकाराला सांगितलं.  'नजरकैद' साहेबांच्या बाबतीत अफवा होती.

आणीबाणीच्या काळात साहेबांनी गियाना, क्युबा, मेक्सिको, जमेका, इजिप्‍त, पेरू, अमेरिक, युरोप-अमेरिका या देशांना भेटी दिल्या.  भारताच्या परराष्ट्र धोरणाला मान्यता मिळविण्याचा प्रयत्‍न केला.  अफगाणिस्तान, कुवेत, इराक, फ्रान्स, बहरीन या देशांच्या दौर्‍यात येथील नेत्यांशी व मुत्सद्यांशी चर्चा करून भारतीय परराष्ट्रनीतीबद्दल असलेल्या शंका-कुशंकांचं निरसन केलं.

इंदिराजींनी देशात आणीबाणी पुकारल्याने देशात व परदेशात एक अविश्वसनीय वातावरण निर्माण झालं.  परदेशात राहणार्‍या भारतीयांच्या तीव्र नाराजीला साहेबांना सामोरं जावं लागत असे.  तडजोडीच्या राजकारणाचा पिंड असलेल्या साहेबांना आणीबाणी मानवणार नाही.  केंद्रातील ज्येष्ठ मंत्र्यांना इंदिराजींचा हा निर्णय मनापासून आवडला नव्हता; पण विरोध दर्शविण्याचा मार्ग सापडत नव्हता.  लाचारी ज्यांच्या राजकारणाचा पाया आहे असे दुय्यम दर्जाचे मंत्री आणीबाणीची तळी उचलून धरू लागले.