थोरले साहेब - २२२

१९७७ च्या जानेवारीत साहेबांना विदेश दौर्‍यावर जावयाचं असल्यानं साहेबांनी इंदिराजींची भेट घेतली.  भेटीत अनेक विषयांवर चर्चा झाली.  त्यात आणीबाणीबद्दल पुनर्विचार करावयास पाहिजे, आणीबाणी मागे घेऊन जनतेच्या दरबारात जाऊन निवडून यावयास पाहिजे यावर चर्चा झाली; पण इंदिराजींनी मनाचा थांगपत्ता लागू दिला नाही.

साहेब १५ जानेवारीला फ्रँकफुर्टला पोहोचले.  जर्मनीचे विदेशमंत्री गेनचर यांच्यासोबत दोन्ही देशांच्या संबंधात चर्चा केली.  गेनचर यांनी भारताला भेट देण्याची इच्छा व्यक्त केली.  साहेबांना गेनचर यांना भारतात येण्यासंबंधीचं निमंत्रण देता आलं नाही.  इंदिराजींनी मार्चमध्ये निवडणुका घेतल्या तर... १८ जानेवारीला ते बुखारेस्टला पोहोचले.  हा एक दिवसाचा दौरा संपवून साहेब दिल्लीला परतणार होते.  दिल्लीहून त्यांना एक खास संदेश मिळाला.  त्या संदेशाबद्दल बुखारेस्टहून मला साहेबांनी पत्र लिहिलं.

१८ जानेवारी १९७७
बुखारेस्ट.

.... मी अॅम्बॅसडर कौल यांच्या घरी दुपारच्या जेवणासाठी गेलो होतो.  येथील जेवण खाऊन उबगलो होतो.  तेव्हा आपली डाळरोटी खावी म्हणून हा बेत आम्ही योजना होता.  राजदूत कौल यांना बेलग्राडचा फोन आहे असे सांगितले.  तो घेण्यासाठी ते गेले.  मी तोपर्यंत माझे जेवण संपविले.  निवांत हात धूत होतो.  राजदूत घाईघाईनं माझ्याकडे आले आणि म्हणाले, ''तो बेलग्रेडचा कौन्सल काही सांगत नाही.  तुमच्याशीच प्रत्यक्ष बोलायचे म्हणतो.  तुमच्यासाठी काही मेसेज आहे.''

मी गेलो तेव्हा कौन्सलने आपले नाव सांगितले आणि पंतप्रधानांचा मेसेज आहे, १७ तारखेचा, तो मी वाचून दाखवतो, असे म्हणून हिंदीत असलेला संदेश वाचून दाखविला.

सारांश असा होता, ''जो महत्त्वाचा निर्णय आपण घेणार होतो तो उद्या घेणार आहे.  तुमच्याशी मी तुम्ही जाण्यापूर्वी बोलणार; पण तुम्ही व मीही कामाच्या घाईत असल्यामुळे राहून गेले.  तुम्हाला निर्णय रेडिओवरून समजू नये, आधी माहीत व्हावा म्हणून कळवीत आहे.  शक्य असेल तर (हो सके तो) कार्यक्रम संपण्यापूर्वी परत या.''

राजदूताला मी विश्वासात घेतले आणि सांगितले, ''पहिल्या परतीच्या प्लेनने मी दिल्लीस जाऊ इच्छितो.  झेकोस्लाव्हाकियाचा कार्यक्रम रद्द.  निर्णय प्रत्यक्ष जाहीर होईतो कारण कुणाला सांगू नका.  परत जाण्याचा माझा निर्णय पक्का.... निर्णय संध्याकाळी ६ वाजता बीबीसी (येथील) वरून येथे सर्वांना समजला.... २० तारखेस पहाटे अडीच ते तीन वाजता येईन.  तसा संदेश पंतप्रधानांना पाठवला आहे....''