हे सर्व आमचे कमकुवत दुवे आमच्या लक्षात आले. या सर्व उणिवा दूर करण्याचा प्रयत्न युद्धपातळीवर चालू आहे. अकार्यक्षम लष्करी अधिकार्यांनी संरक्षण मंत्रालयाला अंधारात ठेवलं. संरक्षणमंत्र्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला ही त्यांची चूक झाली. मग त्यांनी कुणावर विश्वास ठेवावयाचा हा प्रश्न निर्माण होतो. लष्करप्रमुखांच्या बाबतीत सैन्याच्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत त्या याठिकाणी सन्माननीय सदस्यांनी व्यक्त केलेल्या आहेत. त्यात सत्यताही असेल हे मी अमान्य करणार नाही. पण याच सेनानीनं वालांग विभागत ज्या चकमकी झाल्या त्याचं यशस्वी नेतृत्व केलेलं आहे. त्यांचा पराक्रम आपल्याला विसरता येणार नाही. देशाच्या राजकीय नेतृत्वावर अनेक आरोप येथे करण्यात आले. या देशाच्या नेतृत्वांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन लष्करास आदेश दिले. 'शत्रूसैन्याला आपल्या भूमीवरून परतून लावा' हेच योग्य मागदर्शन होतं असं मला वाटतं. संपूर्ण देश आपल्या पाठीशी आहे ही भावना सैन्यामध्ये निर्माण झाली. राजकीय नेतृत्वानं आपली जबाबदारी आत्मविश्वासाने पार पाडलेली आहे. लष्कराचं मनोधैर्य वाढविण्याचं काम राजकीय नेतृत्वानं केलं. संरक्षण मंत्रालय तिथं कमी पडलं त्याला राजकीय नेतृत्व काय करणार ? शेवटी मला आपणास असं सूचित करावंसं वाटतं की, भूतकाळातील चुकांचा मागोवा घेऊन वर्तमानकाळात त्या चुकांचा नायनाट करून भविष्यकाळातील विजयाचा मार्ग सुखकारक करावा लागतो. तो आपणा सर्वांच्या सहकार्यानं यशस्वी करूया.''
नेफा पराभवाच्या भुताला कायमचे गाडून टाकण्यात साहेब यशस्वी झाले. संसदेच्या दोन्ही सभागृहांचा विश्वास संपादन करण्यात साहेबांना विजय मिळाला. प्रसिद्धीमाध्यमांनी साहेबांना उचलून धरलं. संरक्षणमंत्र्याच्या पायवाटेवर पेरून ठेवलेले सुरुंग आपल्या चाणाक्ष नजरेनं हेरून ते निकामी करण्यात साहेबांना यश मिळालं. संसदेला जिंकून साहेब संरक्षणाच्या सबलीकरणाकरिता परदेशाच्या कामगिरीवर निघाले.
अमेरिकेला निघण्यापूर्वी साहेबांनी बंगलोरच्या हिंदुस्थान एरोनॉटिक कारखान्यास भेट दिली. या कारखान्यात एच. एफ. २४ हे अत्यंत प्रभावशाली, गतिमान बॉम्बफेकी विमान हवाईदलात सामील करण्यात आलं. या शक्तिमान विमान बनावटीच्या तांत्रिक कौशल्याबद्दल साहेबांनी अभिमान व्यक्त केला. स्वदेशी तंत्रज्ञान जागतिक तंत्रज्ञानाच्या तोडीस तोड असल्याबद्दल कौतुक केलं. जर्मन तंत्रज्ञ डॉ. कुर्ट यांच्या नेतृत्वाखाली आपल्या तंत्रज्ञांनी हे विमान निर्माण केलं.
साहेब अमेरिकेला पोहोचले. तेथील संरक्षणविषयक धोरण हाताळणार्या मॅकन्मारांबरोबर चर्चा झाली. 'वॉशिंग्टन पोस्ट' सारख्या वर्तमानपत्रांनी साहेबांच्या या भेटीची दखल घेतली. पेंटागॉनमध्ये लष्करी मानवंदना स्वीकारत असल्याचे छायाचित्र प्रथम पानावर छापून आले.
त्या बातमीत पुढे म्हटले, ''भारताचे वरच्या श्रेणीतील राजकीय मुत्सद्दी संरक्षणमंत्री वाय. बी. चव्हाण अमेरिकेची लष्करी मदत मिळविण्याच्या प्रयत्नात आहेत. या दोन्ही देशांत दीर्घमुदतीचा लष्करी मदतीचा करार व्हावा असा हेतू ते बाळगून आहेत.''
'भारताचे संरक्षण' या मथळ्याखाली संपादकीय लिहिताना त्यात म्हटले, 'भारताचे संरक्षणमंत्री अतिमहत्त्वाच्या कामगिरीवर आले आहेत. भारतीय लष्करी योजना मजबूत करण्याच्या दृष्टीने ते प्रयत्न करणार आहेत. भारत आणि अमेरिका यांच्या राजकीय संबंधांवर याचे परिणाम होणार आहेत.''