हेमबरुआ तत्काळ मध्ये उठून म्हणाले, ''तुमच्या पूर्वीच्या संरक्षणमंत्र्याची आठवण झालेली दिसते.''
साहेबांनीही त्याच समयसूचकतेनं उत्तर दिलं. म्हणाले, ''मला कल्पना आहे. मीही एके दिवशी माझी मंत्री होईल.''
लोकसभेत नाथ पै, अॅन्थनी यांच्या धगधगत्या तोफा आग ओकताहेत. संपूर्ण सभागृह सुन्न झालेलं. नाथ पै अहवालातील सरकारच्या नाकर्तेपणाचे वाभाडे काढीत आहेत.
नाथ पै म्हणतात, ''ज्या लष्कराला शौर्याचा इतिहास आहे त्या सैन्याला सीमेवर नामुष्की पत्करावी लागली ही देशाच्या दृष्टीनं शरमेची बाब आहे. संरक्षणमंत्री चव्हाण या काळ्या कृत्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करीत आहेत. देश या हल्ल्याने घायाळ झालेला आहे. नेतृत्वाच्या नाकर्तेपणाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न चव्हाणांनी करू नये. त्यांनी भारतीय जनतेला अंधारात ठेवू नये. रणभूमीवर शस्त्रास्त्रांचा अभाव, रस्ते नाहीत, वाहतुकीची संपूर्ण यंत्रण कोलमडून पडलेली, नेतृत्वहीन लष्कर सीमेवर कसं लढणार ? सीमेवर गलथानपणाचं साम्राज्य पसरलेलं. नेतृत्व नामर्दपणानं हतबल झालेलं. नेतृत्वाअभावी सैन्य निष्क्रिय झालेलं. करमसिंग व त्यांच्यासोबतच्या जवानांची हत्या झाली तेव्हा प्रत्येक भारतीयाची मानसिकता काय झाली ? प्रत्येक भारतीयाची मान शरमेनं खाली झुकली. त्याला या अपमानाचा बदला घ्यावा वाटतोय. त्याचा राग अनावर झाला. तो त्वेषाने म्हणतो, 'उत्तुंग आमची उत्तर सीमा इंच इंच लढवू.' ''
नाथ पै यांच्या घणाघाती भाषणाने लोकसभा अचंबित झाली. त्यांच्या उपहासगर्भ वक्तव्यानं अनेक अकार्यक्षम लष्करी अधिकारी व वातानुकूलित कक्षात बसून कागदावर युद्धाचे मनसुबे आखून यशाच्या अपेक्षा ठेवणार्या माजी संरक्षणमंत्र्याची भंबेरी उडविली.
साहेबांना इशारा देताना नाथ पै म्हणाले, ''या सार्वभौम देशाच्या नव्या संरक्षणमंत्र्यांनी या अपमानित घटनेची दखल घेऊन कुणाचाही मुलाहिजा न ठेवता निर्भयपणे देशहिताचे निर्णय घ्यावेत. या सार्वभौम भारताला अपयशाचा लागलेला कलंक धुऊन काढावा. सारा देश तुमच्याकडे वेगळ्या भावनेतून पाहत आहे. 'मराठा गडी यशाचा धनी' मराठ्यांच्या इतिहासातील या ब्रीदवाक्याचं विस्मरण नव्या संरक्षणमंत्र्यांना होता कामा नये. हे ब्रीद त्यांनी आपल्या कर्तृत्वानं सिद्ध करून दाखवावं. सच्चा भारतीय माणूस त्यागाच्या कुठल्याही सीमेपर्यंत जाण्यास तत्पर झालेला आहे. या देशाच्या भावनेशी खेळणार्या कुठल्याही व्यक्तीच्या अकार्यक्षमतेवर मेहरबानी करण्याची गरज नाही. काळाची ती हाक तुम्हाला आहे. तुम्ही मागाल ते देण्यास हा देश तयार आहे. या देशाची माता आपला पुत्र व लेकी देशाच्या संरक्षणाकरिता समर्पित करण्यास तयार आहे.''
संसद नाथ पै यांच्या भाषणानं बधिर अवस्थेत पोहोचली होती. फ्रँक अॅन्थनी यांच्या मर्मभेदी मार्यानं संसद घायाळ झाली. अॅन्थनी यांनी आपली तोफ कृष्ण मेनन व नेहरूजींवर डागली.