दुसर्या दिवशी वर्तमानपत्रांनी साहेबांच्या निवेदनाची दखल घेतली आणि साहेबांनी ज्या खुल्या दिलानं संसदेला विश्वासात घेतलं त्याबद्दल साहेबांना दाद मिळाली. लोकसभा आणि राज्यसभा आपण जिंकू शकतो असा विश्वास साहेबांमध्ये निर्माण झाला.
दासप्पा आणि बळीराम भगत या मंत्र्यांच्या शपथविधीला साहेब राष्ट्रपती भवनात हजर होते. शपथविधी संपल्यानंतर राष्ट्रपती राधाकृष्णन साहेबांच्या जवळ आले. साहेबांच्या खांद्यावर हात ठेवून नेहरूजींसमक्ष म्हणाले,
''चव्हाण, मी तुमचं हृदयातून स्वागत करतो व अभिनंदनही करतो. राज्यसभेतील तुमचं भाषण अप्रतिम झालं.''
साहेबांच्या खांद्यावर हात तसाच ठेवून इतर मंत्र्यांना राष्ट्रपती राधाकृष्णन विचारू लागले, ''चव्हाण यांचं भाषण आपण ऐकलंत का ?''
राष्ट्रपतींकडून साहेबांची झालेली स्तुती नेहरूजींना कितपत भावली असेल हा विचार साहेबांच्या मनात घोळू लागला.
नेहरूजींनी साहेबांना बाजूला घेतलं. विश्वासात घेऊन विचारलं, ''या चर्चेत मी भाग घेतला तर योग्य राहील का ?''
साहेबांनी स्पष्टाणे नकार दिला व म्हणाले, ''माझं व्यक्तिगत मत असं आहे. आपण चर्चेत भाग न घेतलेला बरा. हा देशाच्या भावनेचा प्रश्न बनला आहे. एखाद्या सदस्यानं भावनेच्या आहारी जाऊन तुमच्यावर काही आरोप केले तर त्या आरोपाचं खंडन करण्यास मी समर्थ आहे.''
नेहरूजींना साहेबांचं म्हणणं पटलं.
या अहवालात देशाला राजकीय नेतृत्व देण्यास कमी पडल्याचा मथितार्थ निघू शकतो व त्यात नेहरूजींवर विरोधक हल्ला करू शकतात याची कल्पना साहेबांना आलेली होती. विरोधकांची धार बोथट करण्याचा प्रयत्न साहेबांनी लोकसभेत बोलताना केला होता.
साहेब म्हणाले, ''नेफामध्ये आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्या विसरून त्यावर काय मार्ग काढायचा आहे याचा विचार आपण केला पाहिजे. भविष्यात त्या चुका होणार नाहीत याची काळजी आपण घेतली पाहिजे. या घटनांना समोरं जाण्यासाठी आपण एकजुटीनं प्रयत्न करावयास नको का ? घडून गेलेल्या चुकांचा परिणाम भविष्यावर होऊ नये यासाठी आपण जपायला पाहिजे. इतिहासातील चुकांची दखल वर्तमानकाळात घेऊन त्या दुरुस्त केल्या नाही तर भविष्यकाळ तुमचं नेतृत्व झुगारू शकतो. माझ्या समोर कुणी एक व्यक्ती नाही. देशहित लक्षात घेऊन मी हे विधान करीत आहे.''