नागपूर येथील ज्या भूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लाखो बांधवांसोबत बुद्ध धर्माची दीक्षा घेतली त्या भूमीवर डॉ. आंबेडकरांचं भव्य आणि दिव्य स्मारक उभं राहावं असं नवबौद्धांचं स्वप्न आहे. हे स्वप्न साकारण्याचं साहेबांनी मान्य केलं. त्याचसोबत १४ एप्रिल या डॉ. आंबेडकर जयंतीदिनाची सार्वजनिक सुटी जाहीर केली. या आदरापोटी दीक्षाभूमीवर नवबौद्धांनी साहेबांचा भव्य सत्कार १९६० साली घडवून आणला.
या सत्काराला उत्तर देताना साहेब म्हणाले, ''अस्पृश्यता भारतीय संस्कृतीचा लागलेला एक काळा डाग आहे. तो धुऊन काढण्याचं कार्य डॉ. आंबेडकरांनी केलं आहे. आम्ही नवबौद्धांना सवलती देऊन त्यांच्यावर उपकार करीत नाही. तो त्यांचा हक्क आहे, अधिकार आहे. तो आम्ही मान्य केला आहे. नवबौद्ध शिकून बुद्धीच्या जोरावर झपाट्यानं प्रगती साधत आहेत. नवबौद्धांनी आपल्या बुद्धीचा उपयोग राष्ट्रउभारणीसाठी करावा. बौद्धिक पातळीवर भारताचं नाव जगात तळपत राहील याकरिता आपल्या बुद्धीचं योगदार द्यावं. महाराष्ट्र बहुजनहिताय, बहुजनसुखाय याकरिता निर्माण केलाय.'' साहेबांनी नवबौद्ध बांधवांची मनं जिंकून घेतली. रिपब्लिकन पक्षाचे नेते दादासाहेब गायकवाड यांना सोबत घेऊन सत्तेची दारं नवबौद्धांना उघडी करून दिली.
लोकसाहित्य साहेबांच्या जिव्हाळ्याचा विषय. ग्रामीण भागात जी लोककला आहे ती नष्ट होण्याच्या मार्गाला लागली होती. तिचं जनत केलं पाहिजे, तिला पुनरुज्जीवित करण्याचं साहेबांनी ठरविलं. लोकसाहित्य हा वेगळा विभाग स्थापन करून शुभारंभ केला. या लोकसाहित्य विभागाची सूत्रं डॉ. सरोजिनी बाबर यांच्या हाती सुपूर्द केली.
सहकारी चळवळीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या पिचलेला माणूस ताठ मानेनं उभा राहावा याकरिता साहेबांनी २८ ऑक्टोबर १९६० ला एक सहकारी कायदा पास करून घेतला. या कायद्यामुळं सहकारी बँका, भूविकास बँका अस्तित्वात आल्या. सहकारी क्षेत्रात कारखानदारी उभी करीत असताना सामान्य शेतकर्याला त्या कारखान्याचं सभासद होता येईल याची तरतूद केली. त्या शेतकर्याला भागभांडवल सरकारनं पुरविलं. सहकारी कारखान्याचा सामान्य शेतकरी मालक केला. शेतीवर आधारित सहकारी साखर कारखाने, सहकारी बँका, सहकारी सूतगिरण्या, सहकारी कुक्कुटपालन, सहकारी दूध डेअरी इत्यादी शेतीला पूरक कारखाने उभे राहिले.
सामान्य शेतकरी या कारखान्याचा सभासद व मालक झाला. त्याच्या संसारात सहकारानं चांगले दिवस आणले. खाजगी सावकाराच्या तावडीतून या शेतकर्यांची सुटका केली. सुरुवातीला महाराष्ट्रात अठरा सहकारी साखर कारखाने उभे राहिले. शेतकर्यांच्या आर्थिक भांडवलाची अडचण लक्षात घेऊन सरकारनं जास्तीत जास्त भांडवलाची गुंतवणूक केली. शेतकरी राजा सुखासमाधानानं जीवन जगू लागला. साहेबांच्या काळात पन्नास सहकारी साखर कारखाने उभे राहिले.
दिवा-दासगाव या रेल्वेमार्गावर रेल्वे सुरू करून कोकणवासीयांना मुंबईशी जोडलं. दिवा-पनवेल रेल्वे लाईनची केंद्राकडून मंजुरी मिळविली. काम आपल्या कारकीर्दीत सुरू केलं. कोकण रेल्वेचे जनक साहेब आहेत. मराठवाड्यात कला व क्रीडागुणांना उत्तेजन देण्याकरिता साहेबांनी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाची स्थापना केली. डोक्यावरून मैला वाहून नेण्यास बंदी घालणारा कायदा केला.