थोरले साहेब - १५९

चहाचे एक-एक घोट घेत म्हणाले, ''माझ्या व आपल्या घराण्याच्या जीवनातील आजचा सुवर्णदिन आहे, असं मी मानतो.  या दिवसासाठी माझं राजकीय जीवन पणाला लागलं होतं.  महाराष्ट्राच्या इतिहासात मला खलपुरुष ठरविण्याचा विडा काही मंडळंनी उचलला होता.  मी त्यांची मनोकामना धुळीस मिळविली.  जनताजनर्दनाच्या दरबारात मला न्याय मिळाला.''

''तुमच्या त्यागाला आणि प्रामाणिक प्रयत्‍नाला आलेलं हे फळ आहे.  गणपतराव भावजीनं जे स्वप्न पाहिलं होतं ते तुम्ही पूर्ण करून दाखविलं यातच तुमचं मोठेपण आहे.  त्यांच्या ॠणातूनही मुक्त झालात.  गोरगरिबांच्या उन्नतीकरिता गणपतराव जी तळमळ व्यक्त करीत असत ती पूर्ण करणे हे तुमचं आद्यकर्तव्य आहे.'' मी.

''इथून पुढे जे काही निर्णय घ्यावयाचे आहेत त्या निर्णयात वंचित माणसाच्या कल्याणाचं आणि उन्नतीचं प्रतिबिंब दिसलं पाहिजे.  गोरगरिबांना सुखकारक आणि सन्मानाचं जीवन जगता आलं पाहिजे.'' साहेब.

आमचं बोलणं चालू असताना डोंगरे आत आले.  ते आणि साहेब आजच्या दिवसभराच्या कार्यक्रमाची आखणी करण्यात गढून गेले.  डोंगरेंनी कार्यक्रमाची टिपणं घेतली.  १२:३१ मिनिटांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची वेळ निश्चित केली.  साहेबांना शुभेच्छा देण्याकरिता आलेल्यांची गर्दी उसळली होती.  साहेब तयार होऊन जनतेच्या घोळक्यात जाऊन त्यांचे झाले.  डोंगरे आलेल्यांच्या चहापाण्याच्या व्यवस्थेवर लक्ष ठेवून होते.  सर्वांचं आदरातिथ्य करून साहेब आपल्या खास सहकार्‍यांसोबत आपल्या अभ्यासिकेत जाऊन बसले.  सहकार्‍यांसोबत अर्धा-पाऊण तास खलबतं चालू होती.  सहकारी गेल्यानंतर साहेब न्याहरी करण्याकरिता स्वयंपाकघरात आले.  साहेबांनी आणि मी सोबत न्याहारी केली.  मला तयार राहायचं सांगून परत आपल्या सह्याद्रीतील कार्यालयात अधिकार्‍यांसोबत कामाचा आढावा घेऊन त्यांना पुढील कामाबद्दल मार्गदर्शन करण्यात ते मग्न झाले.

साडेअकरा वाजता डोंगरे यांनी वाहनचालकाला गाडी पोर्चमध्ये लावण्यास सांगितलं.  साहेबांना वेळेची आठवण करून दिली.  मीही माझ्या तयारीस लागले.  साहेब आपल्या खोलीत जाऊन तयार झाले.  मला आवाज दिला.  मी तयार होऊन बाहेर आले.  साहेब व मी आईच्या खोलीत गेलो.  आई पंढरीच्या विठोबाची तुळशीची माळ जपत बसल्या होत्या.  आम्ही दोघांनी आईचं दर्शन घेतलं.  नेहमीप्रमाणं 'यशवंत, कीर्तिवंत' होण्याचा आशीर्वाद दिला.  साहेब आणि मी गाडीत जाऊन बसलो.  गाडी सह्याद्रीहून राजभवनाच्या दिशेने निघाली.

१२:३१ मिनिटांनी राज्यपाल जयप्रकाश यांनी साहेबांना महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शपथ दिली.  साहेबांनंतर त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकार्‍यांचा शपथविधी पार पडला.  ४ वर्षांच्या कारकीर्दीत साहेबांना तिसर्‍यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यावी लागली.  शपथविधी झाल्यानंतर साहेबांनी आपल्या सहकार्‍यांना मार्गदर्शन करताना महाराष्ट्राच्या भावी जडणघडणीबद्दल कल्पना दिली.