म्हणाले, ''१९४८ ला जी घटना घडली ती दुर्दैवी होती. एका माथेफिरू तरुणाच्या कृत्याची सजा सर्व समाजाला भोगावी लागली. जळीत घटनेकडे आपण मानवतेच्या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे. शासन जळीत कर्जे माफ करीत आहे त्यापाठीमागे उपकाराची भावना नाही. देणारा राजा आहे आणि घेणारी प्रजा आहे अशी भावना मुळीच नाही. प्रजेचं रक्षण करणं हे शासनाचं कर्तव्यच आहे. या एका भावनेतूनच हे कर्ज माफ करण्यात आलं आहे. हे कर्ज माफ केल्याची घोषणा केल्यानंतर बर्याच लोकांनी मला पत्रे लिहिली की, 'तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे गोब्राह्मण प्रतिपालक होऊ इच्छिता. ब्राह्मणाचे प्रतिपालन करीत असताना गाईला विसरू नका.' मी त्यांना सांगू इच्छितो की, हे नवे राज्य गोब्राह्मण प्रतिपालक नसून प्रजापतिपालक आहे. प्रजेचं हित जपणं हे नवमहाराष्ट्राचं धोरण आहे. ब्राह्मण नवमहाराष्ट्राची प्रजा आहे. महाराष्ट्रातील खेड्यापाड्यातून येणारा युवक कार्यकर्ता ध्येयानं प्रेरित झाला आहे. समाजासाठी काहीतरी काम करून दाखविण्याची त्यांची इच्छा आहे. त्यांची भाषा रांगडी आहे; पण त्यामागची भावना प्रामाणिक आहे. त्याला ब्राह्मणवर्गाने समजावून घेतलं पाहिजे. त्याला मार्गदर्शन करून त्यांच्यात सुधारणा केली पाहिजे. या कर्जमाफीनंतर अनेक कर्जमाफीच्या मागण्या येत आहेत. जळीत कर्जमाफीमागील व इतर कर्जमाफीमागील हेतू वेगळे आहेत. १९४८ ला झालेल्या प्रसंगांनी सामाजिक मनात खोल जखम झालेली आहे. ती जखम भरून निघावी हा या कर्जमाफीमागील उद्देश आहे. हा समाज ४८ पासून राष्ट्रीय प्रवाहापासून फटकून वागतोय. तो समाज मुख्य प्रवाहात यावा ही आमची प्रामाणिक इच्छा आहे. ब्राह्मण वर्गाचं बौद्धिक विकासाचं कार्य नोंद घेणारं आहे. त्यांच्या बुद्धीचा उपयोग विकासकामात करून महाराष्ट्र व भारताला प्रगतिपथावर नेता येईल. ब्राह्मणांनीदेखील आपल्या मनातून अपराधीपणाची भावना झटकून टाकावी. देशाच्या विकासाकरिता आपल्या बुद्धीचं योगदान द्यावं.
हे राज्य मराठा नाही तर मराठीचं राज्य आहे. इतिहासात जेव्हा जेव्हा सर्व मराठी समाज एकसंध झाला त्या त्या वेळी या मराठी माणसाने अटकेपार झेंडे फडकाविलेले आहेत. मला नव्या महाराष्ट्रात तेच करावयाचे आहे. ती काळाची गरज आहे. सामाजिक एकसंधता बळकट झाल्यावर आपापसांत मतभेद झाले तरी चालतील. हे मतभेद बुद्धीवर आधारित असतील. प्रथम आपण सर्व समाज एकसंध होऊन एकजुटीनं महाराष्ट्राच्या विकासाची पायाभरणी करूया.''
सुसंस्कृत नागरिक घडविण्यात साहित्य, नाट्य, चित्रपट, लोककला यांचा सिंहाचा वाटा असतो याची साहेबांना जाणीव आहे. साहेबांना स्वतःला कला, साहित्य यांचं आकर्षण आहे. या क्षेत्रात काम करणार्यांना प्रोत्साहन देण्याचं धोरण सरकारनं ठरविलं. विदर्भासोबत झालेल्या करारानुसार पहिल्यांदा महाराष्ट्र राज्य विधानसभेचं अधिवेशन नोव्हेंबर १९६० ला साहेबांनी नागपूरला घेतलं. या अधिवेशनात साहेबांनी 'महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ' स्थापन करण्याची मान्यता घेतली. तर्कतीर्थ लक्षणशास्त्री जोशी यांची अध्यक्ष म्हणून नेमणूक केली. नागपूर येथेच या मंडळाचं उद्घाटन साहेबांनी केलं.
कलावंत म्हणून साहेब ज्यांना दैवत मानत ते नारायण राजहंस ऊर्फ बालगंधर्व विकलांग अवस्थेत जीवन जगताहेत असं पु. लं. देशपांडे यांनी साहेबांच्या निदर्शनास आणून दिलं. साहेबांनी बालगंधर्वांना मासिक ३०० रुपये मानधन सुरू केलं. बडोदे दरबाराचे राजकवी यशवंत (यशवंत दिनकर पेंढारकर) हे कराडच्या शंकरराव करंबळेकरांचे परिचित. त्यांचा महाराष्ट्रानं यथोचित सन्मान करावा असं करंबळेकरांनी साहेबांना सुचविलं. साहेबांनी राजकवी यशवंतांचा 'महाराष्ट्रकवी' म्हणून सन्मान केला. महाराष्ट्रकवी यशवंतांना तहहयात ४०० रुपये मासिक मानधन मंजूर केलं. १९६० पासून हे मानधन महाराष्ट्रकवी यशवंतांना मिळू लागलं. विश्वकोश, डायरेक्टोरेट ऑफ लँग्वेजेस अशी नवीन खाती निर्माण करून त्याची अंमलबजावणी साहेबांनी केली.