५ ध्येयनिष्ठ नेता - यशवंतराव
रामभाऊ जोशी
समर्थांची चतुःसूत्री मनात ठेवून विसाव्या शतकात राजकारण प्रधान यशस्वी राष्ट्रप्रपंच करणार्या नेत्यांमध्ये यशवंतराव चव्हाण हे अग्रगण्य नेते होते. आयुष्याची एकाहत्तर वर्ष 'जीवनाचा अर्थ' शोधण्याचीच वाटचाल त्यांनी केली. संपूर्ण जीवनाला काही अर्थ असू शकतो का अशासंबंधीचे प्रश्न त्यांच्या मनात अनेकदा उद्भवले असण्याची शक्यता आहे. तसं पाहिलं तर त्यांच्या जीवनाच्या सारीपाटावर अनेक अर्थ उद्भवले, चमकले आणि अवकाशात विलीनही झाले. तरीही जीवनाचा त्यांचा शोध सुरूच राहिला.
यशवंतरावांच्या जीवनात अनेकविध अनुभवांची, अवस्थाभेदांची संख्या वाढली. संख्या वाढली तशी संपन्नताही वाढली. परंतु जेव्हा अनुभवात संग्रह, समन्वय, संबद्धता, संगती इत्यादींची गुणवत्ता वाढली तेव्हाच याची साक्ष अंतर्मनात उमटली.
जीवनाची धडपड काहीतरी प्राप्त करण्यासाठी असते. जीवनाच्या प्रारंभीच्या काळात यशवंतरावांची धडपड, खटपट, देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी झाली. स्वातंत्र्योत्तर काळात स्वराज्याचे सुराज्य बनविण्यासाठी होत राहिली. निरनिराळ्या व्यक्ती, तत्त्व, अर्थ त्यांनी आपल्या जीवनाला जोडण्याचा प्रयत्न केला आणि संपूर्ण जीवनावर त्याची प्रतिक्रिया उमटत राहिली.
यशवंतरावांच्या विचारकोषात जीवन हाच जीवनाचा अर्थ होता. वैयक्तिक जीवन हेच त्याचे ध्येय. लोकसत्ताक जीवनाचा अर्थही वैयक्तिक जीवन असाच करावा लागतो. लोकसत्ताक राष्ट्रीय जीवनात प्रत्येक व्यक्ती ही सत्तेचे श्रेष्ठ असे केंद्रच आहे. राष्ट्रसत्तेचे उगमस्थान, उत्कर्षस्थान, मानवमात्रच आहे. उत्कर्ष साधणारी शक्तीही तीच आणि उच्छेद करणारीही तीच. लोकसत्ता म्हणजे लोकांची सत्ता हे खरे असले तरी अनेकांची एकावरील सत्ता मात्र नव्हे. लोकसत्तेचा खरा अर्थ व्यक्तिमात्राची स्वतःवरील पूर्ण सत्ता, प्रत्येक व्यक्तीचे स्वतःपुरते संपूर्ण स्वातंत्र्य.
भारतीय लोकराज्यात, लोकशाहीत, यशवंतरावांनी प्रत्येक व्यक्ती हीच श्रेष्ठ सत्तेचे केंद्र मानले. संपूर्ण स्वातंत्र्याचा अधिकारबिंदू राहील असेच अभिप्रेत धरले. लोकशाही म्हणजे समूहशाही नव्हे, किंवा वैयक्तिक स्वातंत्र्य संपुष्टत आणणारी कंपूशाही नाही याची जाण त्यांनी स्वतः सातत्यानं ठेविली आणि ही जाण ठेवलीच पाहिजे असं जाहीरपणानं आवर्जून प्रतिपादन केले.
यशवंतराव हे ध्येयवादी, ध्येयनिष्ठ आणि ध्येयप्राप्तीसाठी सर्वस्व अर्पण करण्याची तयारी केलेले देशनिष्ठ नेते होते. लोकशाही किंवा सामुदायिक सत्ता याचा 'अनेकनिष्ठ एकात्मता' असाच अर्थ त्यांनी सांगितला. कंपूशाहीचा अहंकार आपल्या जीवनात निर्माण होऊ नये यासाठी समूहनिष्ठेचा परीघ ते सतत वृद्धिंगत करीत राहिले. त्यामुळे त्यांना वैयक्तिक आणि कंपूशाहीच्या अहंकाराची बाधा होऊ शकली नाही. देशाची, सगुणाची, म्हणजेच माणसाची आणि त्यासाठी ध्येयाची उपासना ते आजन्म करीत राहिले.
देशसेवा म्हणजे काय ? असं कोणी विचारलं तर त्यांचं सांगणं असे की देशाची, देशातील लोकांची सेवा. तीच उपासना देशाची आणि म्हटलं तर देवाचीही !
यशवंतराव महाराष्ट्राच्या मातीत जन्मले आणि वाढले. देश आणि देव यात अंतर नाही अशी राष्ट्रसंतांची शिकवण लाभलेली ही भूमी. यशवंतरावांचा वैयक्तिक आणि राजकीय प्रपंच इथंच सुरू झाला. त्यांनी प्रपंचही केला आणि राजकारणही केलं. परंतु राजकारणाशिवाय केलेला प्रपंच हा खरा प्रपंच नव्हे ही राष्ट्रसंतांची शिकवण त्यांच्या मनीमानसी रुजलेली असावी. 'प्रपंची जाणे राजकारण !' ही सज्जनगडची शिकवण त्यांची मार्गदर्शिका बनली. ही शिकवण त्यांच्या ठिकाणी जागृत होती, जिवंत होती. देशसेवेचं बोट धरून त्यांची वाटचाल अखंड सुरू राहिली ती त्यामुळेच होय.