आम्ही पार नाराज झालो. आता कसले ते पुन्हा मंदिरात फिरतात ? आपली ही प्रतापगडवारी फुकट झाली - असे बोलतच आम्ही त्यांना गाठलं. त्यांनी आम्हाला बघताच प्रश्न केला, ''छावा आणलाय ?''
''होय'' अनिरुद्धनं उत्तर देत-झटकन पुस्तकाचं रॅपर खोलत ती लाभाची पहिली प्रत त्यांच्या हाती दिली. कसदार, अनुभवी साहित्यिकानं हाताळावं तसं ते पुस्तक हळुवार हाताळत महाराष्ट्राचं ''बलवंत'' ''यश'' आकाशबोलीत बोललं - ''सुंदर पुस्तक छापलंय अनंतरावांनी. शिवाजीराव, हे मोठंच काम करण्याचं भाग्य लाभलंय तुम्हाला.''
मी वाकून त्यांना भवानी मंदिराच्या दारातच नमस्कार करून म्हणालो, ''भवानीच्या पायांवर ही पहिलीच प्रत वाहून ती आपणाला द्यायची आहे साहेब !''
''छा...न - चला !'' म्हणत ते मंदिरात जाण्यासाठी हातात तशीच छाव्याची प्रत घेऊन माघारी वळले. मी आणि अनुरुद्धनं पूर्ततेचे निःश्वास टाकले.
प्रतापगडावर छाव्याची प्रत तुळजाभवानीच्या शिवकर व विमल चरणावर स्वहस्ते ठेवून तिच्यावर हळदकुंकू व फुले वाहून भवानीला क्षणभर आजवर आपल्या उदंड नजारे पाहिलेल्या सोशिक डोळ्यांत त्या जगन्मातेला समजावून घेत- भोवतालच्या आम्हा सर्वांना विसरून साहेबांनी डोळे मिटले व हात जोडले.
काही सेकंद ते महाराष्ट्राचे ''बलवंत'' ''यश'' तसेच निःस्तब्ध राहिले.
त्या वेळी त्यांच्या शेजारीच भवानीसमोर असताना विचार आला होता की - ''या क्षणी साहेब कसला विचार करीत असतील ? शिवरायांचा ? सजा भोगणार्या शंभूराजांचा ? की भवानीलाच आपल्या कसदार बोलीत त्यांनी साकडे घातले असेल - की जीवन जे लाभले ते शिवशंभोच्या निष्ठेने तुझ्या पायीच तर हयातभर ठेवीत आलो. पुढे आभाळात सूर्य-चंद्र असेतो कोठेही लाभो - ते महाराष्ट्रातच लाभो - जगन्माते सदैव सेवेचे बळ दे !''
आज तर ते महाराष्ट्राचे ''बलवंत'' ''यश'' लौकिकाच्या अर्थाने सरले आहे. यशवंत बलवंत चव्हाण ऊर्फ असंख्यांचे साहेब देहाने तुम्हा-आम्हात नाहीत. मात्र ज्या वैचारिक सामर्थ्याला ते सदैव अमर व अजर मानत आले त्या रूपाने ते कधीच अदृश्य होऊ शकत नाहीत. त्यांच्या त्या रूपालाच सादर विनम्र श्रद्धांजली !