यशवंतरावांचे महाराष्ट्रासाठी जे सखोल असे 'समाजहितैषीपण' खुलून व उभरून आले ते १ मे १९६० पासून. ते जेव्हा महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शपथ घेऊन कार्य व कर्तव्यबद्ध झाले तेव्हापासून.
आजचा सहकाराची कास धरून आर्थिक आघाडीवर किमान सुस्थिर झालेला महाराष्ट्र ही यशवंतरावांची वैचारिक कमाई आहे. पुढचा इतिहास हे त्यांचे कार्य डावलूच शकणार नाही.
आजचा शैक्षणिक दृष्ट्या अंग धरलेला नागरी व ग्रामीण महाराष्ट्र ही यशवंतराव बाळासाहेब देसाई यांची दूरदृष्टी आहे. बाळासाहेबांच्या बाराशेच्या आतील उत्पन्नाच्या शिकाऊ मुलांना मोफत शिक्षण या क्रांतिकारक कायद्याला यशवंतरावांनी पाठबळच दिलं. त्यांनी रयत शिक्षण संस्थेसाठी दिलेली अनुदानं योग्य मानली.
आजचा शासकीय विकेंद्रीकरणाचा महाराष्ट्र ही यशवंतरावांची एक जीवनपूर्ती साधू बघणारी स्वप्नसृष्टी होती. त्या सृष्टीत त्यांना अपेक्षेएवढं यश आलं नाही. तरीही लोकशाही महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात पोचू शकली हे सत्य नाकारता येणार नाही.
हाती कर्तुमकर्तुम सत्ता असली म्हणजे माणसं जनप्रिय होतातच असे नाही. उलट ती बर्याच वेळा अपेक्षाभंगापोटी जनरोषाला पात्र ठरतात. यशवंतराव राजकीय क्षेत्रात 'प्रिय' राहिले की नाही हा त्यामुळे अत्यंत गौण मुद्दा ठरतो. ते महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या नागरी आणि ग्रामीण अशा दोन्ही सामान्य जनांचे मात्र अत्यंत प्रिय नेता आणि तेही शेवटपर्यंत राहिले.
एक साहित्यिक म्हणून त्यांच्याशी माझा जो व्यक्तिगत संबंध आला तो अत्यंत अकृत्रिम. आत्मीय ॠणानुबंधाचा व केवळ अविस्मरणीय ॠजुभावांचा आहे. त्यांना भेटताना मला कधीच प्रेशर वाटलं नाही इतकी जिवलग आत्मीयता त्यांच्या विचारपुशीत व हस्तांदोलनात असे.
''छावा''चं पूजन त्यांच्या सारस्वत शिवहस्तेच करायचं हे मी ती कथावस्तू बांधायला सुरुवात करतानाच मनोमन ठरवलं होतं.
१९७९ साली छाव्याचं फक्त अखेरचं एक प्रकरणच लिहायचं बाकी असताना मला स्कूटरचा तीव्र अपघात आला. उपचारासाठी तेव्हा जसलोकमध्ये दाखल होण्यापूर्वी मी पत्नीला - सौ. मृणालिनी सावंत हिला - छाव्याचं 'शेवटचं' प्रकरण अत्यंत निर्धारानं डिक्टेट केलं होतं.
मी जसलोकमध्ये असतानाच काँटिनेंटलच्या अनंतराव कुलकर्णी यांनी 'छावा' छापून सिद्ध करून मला पत्र लिहिलं - ''तुमच्या बोलण्याप्रमाणे आता तुम्ही हॉस्पिटलमधूनच पूजनासाठी साहेबांना विनंतिपत्र लिहा. ते नक्की येतील.''
त्याप्रमाणे मी दिल्लीला एक साधं पोस्टकार्ड जसलोकमधून साहेबांना लिहिलं. आशय मोजकाच पण बोलका होता - ''कदाचित माझं हे शेवटचं पुस्तक असेल. ते हाती घेतानाच आपल्या हस्तेच त्याचं पूजन व्हावं हा निर्धार केला होता. आपण अवश्य पुण्याला यावं व कृपया या पुस्तकाचं पूजन करावं.''
- यशवंतरावांनी अत्यंत आपुलकीच्या, प्रेमळ व वडिलधार्या जाणतेपणानं दिल्लीहून पुण्याला परस्पर येऊन अत्यंत साधेपणानं काँटिनेंटलच्या कार्यालयात छाव्याचं पूजन केलं. त्या पूजनाला मी उपस्थित नव्हतो. माझ्या पत्नीची व दोन्ही मुलांची काळजीपूर्वक चौकशी करताना यशवंतरावांच्या चर्येवर उठलेले गांभीर्याचे भाव आजही त्या वेळच्या त्यांच्या फोटोत स्पष्ट दिसतात.
छाव्यासाठी एवढीच कर्तव्याची भावना त्यांनी मानली नाही. पुस्तक छपाई, मुखपृष्ठ, बांधणी असं पूर्ण सिद्ध होताच मी पुन्हा त्यांना लिहिलं या 'छाव्याची' पहिली प्रत तुमच्या हस्ते प्रतापगडच्या तुळजाभवानीच्या चरणावर वाहिल्याशिवाय मी व प्रकाशक ती वाचकांच्या हाती देणार नाही. पुन्हा साहेबांचं पत्र आलं - ''मी अमक्या तारखेला क-हाडला येतो आहे. परस्पर प्रतापगडावर येईन. तुम्ही अनिरुद्ध यांच्यासह प्रत घेऊन प्रतापगडावर यावं, आपण ती भवानी चरणी वाहू.''
'छावा' च्या संदर्भात यशवंतरावजींशी असलेला ॠणानुबंध एवढा दृढ सधन होता की शेवटच्या क्षणी प्रतापगडावर घडलेलं नाट्य मी आणि काँटिनेंटलचे श्री. अनिरुद्ध कुलकर्णी कधीच विसरू शकणार नाही.
आम्ही दोघे ऐन उन्हाळ्यात गाडी घेऊन वेळेवर प्रतापगड गाठावा म्हणून पुण्याहून गेलो खरे. पण तरीही थोडा वेळ झालाच. आम्ही प्रतापगडाच्या पायर्या भराभर चढून, केदारेश्वराचं मंदिर मागे टाकून भवानीच्या मंदिराच्या समोरील आवारात कसेबसे आलो आणि दोघेही क्षणभर थांबलोच. आमच्या धावपळीवर पाणी पडायचीच वेळ स्पष्ट दिसत होती. साहेब भवानीचं दर्शन घेऊनच मंदिराबाहेर पडून पायात बूट सरकविताना दिसत होते !

 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
			 
									 
			