समस्यांचे आव्हान स्वीकारणे आणि त्या समस्या सोडविणे यांचा अव्याहत क्रम म्हणजे जीवनविकास असे म्हटले जाते. यशवंतरावांच्या जीवनात जन्मापासून एकापाठीमागून एक हाच क्रम आढळतो. ज्यांच्या जीवनाचा शोध घ्यावा, महत्ता अजमावण्याचा प्रयत्न करावा अशा आधुनिक भारतात, राष्ट्रीय जीवनात वैशिष्ट्यपूर्ण स्थान प्राप्त झालेल्या ज्या थोड्या व्यक्ती आहेत त्यांत यशवंतराव ठळकपणे आहेत. त्यांचा म्हणून स्वतंत्र इतिहास घडला आहे. त्यांनी आपल्या कर्तृत्वानं तो घडविला आहे. अशा श्रेष्ठ विचारवंत, कर्तृत्ववान व्यक्तीच्या जीवनाची समीक्षा केवळ राजकारणी यशवंतराव एवढ्यापुरतीच करण्याने त्या समीक्षेला पूर्णता अशी कधीच येणार नाही. किंबहुना ती एकारलेली भूमिका ठरेल. समग्र यशवंतराव असे दर्शन घडावयाचे तर राजकारणी यशवंतराव आणि व्यक्ती यशवंतराव अशी ती बेरीज आहे. समीक्षकांना, इतिहासकारांना हे भान ठेवावे लागणार आहे. अन्यथा एकांगी लेखन, विचारमंथन म्हणजे त्यांच्यावर आणि इतिहासावरही अन्याय केल्यासारखे होण्याचा धोका आहे. अर्थात समीक्षकांचा, इतिहासलेखकांचा शासनकाटा, तोलकाटा समतोल राहीलच याची तरी काय शाश्वती ! आपण फक्त अपेक्षा करावी इतकेच !
राजकारणी यशवंतराव व्यक्तिशः आणि राष्ट्राच्या कठीण प्रसंगातही काँग्रेस पक्षाच्या प्रमुख प्रवाहापासून कधी बाजूला झाले नाहीत. काँग्रेसची एक, दोन, तीन छकले झाली, मतभेद झाले, तपशील बदलले, पक्षावर व्यक्तिनिष्ठेच्या आपत्ती कोसळल्या आणि जाणत्या माणसांनी त्याचा खेळ केला तरी या सर्व अवस्थांमध्ये यशवंतराव लोकगंगेपासून बाजूला झाले नाहीत. याचा अर्थ कुणी 'संधिसाधू' असा केला असेल, करोत बापडे ! काँग्रेस पक्ष हा देशातील बहुसंख्याकांचा पक्ष आहे, ती एक बहुजनांची चळवळ आहे (मास मुव्हमेंट), याचं यशवंतरावांना भान होतं. मनात दुहेरी भावना नव्हत्या. त्याचबरोबर एकाकी व्यक्ती कसलाच विकास करू शकत नाही, स्वतःचा नाही आणि लोकांचाही नाही याचं यशवंतरावांचं भान पक्कं होतं. लोकशाहीच्या वर्तुळात एकदा स्वतःला झोकून दिलं म्हणजे त्यानंतर त्या वर्तुळापासून आपण निराळे होऊ शकत नाही, राहू शकत नाही; तसे झाले तर स्वत्वच नष्ट होण्याची भीती आहे. ध्येयापासून अलग पडण्याचा धोका असतो हे उमजण्यातही त्यांच्या बुद्धीची प्रगल्भता, परिपक्वता निश्चितच होती. त्यामुळे स्वातंत्र्याचे, लोकशाहीचे होमकुंड, यज्ञकुंड देशात धगधगल्यापासून किंवा धगधगल्यानंतर त्यातलाच एक निखारा बनून ते राहिले, ते काही संधिसाधू म्हणून नव्हे ! यज्ञकुंड धगधगत राहावे यासाठी. यज्ञकुंडातून बाहेर पडतो तो एकटा निखारा धगधगत राहू शकत नाही. त्याची राख होते. यशवंतरावांना स्वतःची राख होऊ द्यावयाची नव्हती. त्यांना ती राख अपेक्षित होती ती संकुचित भावनांची, क्षुद्रतेची. यशवंतरावांनी ती पूर्वीच करून टाकली आणि संघटनेच्या समूहाच्या महान यज्ञात सातत्याने जळत राहून आपले आणि राष्ट्राचे जीवन तेजस्वी करावयाचे हाच ध्यास धरून राहिले. जीवन समृद्ध बनल्यामुळेच हा निर्णय ते करू शकले. सावधानतेने करू शकले.
राजकारणप्रधान राष्ट्रप्रपंच (पॉलिटिक्स) करताना 'सावध' असावेच लागते. हे 'सावध' पण सर्वांविषयीच ठेवावे लागते. जोडीला साक्षेप-अत्यंत ज्वलंत साक्षेपही ठेवावा लागतो. राजकरणी असणं वेगळं आणि साक्षेपी राजकारणी असणं वेगळं. यशवंतराव हे सर्वकाळ सबध, साक्षेपी राजकारणी असल्याबद्दलची लोकमान्यता त्यांनी संपादन केली होती. तरीपण राजकारण म्हणजेच सारं जीवन असं त्यांनी कधी मानलं नाही. तसं आचरण केलं नाही.
यशवंतराव 'सावध' नेते होते तरी त्यांचं व्यक्तिमत्त्व आणि कर्तृत्व मात्र एकारलेलं राहिलं नाही. सामाजिक कार्यातून आणि विचारातून त्यांची प्रगमनशील जीवनदृष्टी फुलत गेली. राजकीय, सामाजिक विचारप्रणालीचा त्यांनी मनःपूर्वक अभ्यास केल्याने त्यांचा वैचारिक पिंड समृद्ध बनला. दृष्टिकोण विस्तारला. व्यक्तित्व आणि नेतृत्व याचा पाया पक्का झाला. ते कुशल प्रशासक होते. तरबेज संसदपटू म्हणून त्यांनी मान्यता मिळविली. राष्ट्रीय आपत्ती उद्भवली असता आपल्या कणखर, तत्त्वनिष्ठ क्षमतेचं प्रत्यंतर आणून देणारा पल्लेदार दृष्टी लाभलेला नेता म्हणून भारताच्या अभ्युदयाचे आशास्थान म्हणूनच सर्व धर्मांच्या, पंथांच्या, पक्षांच्या लोकांनी त्यांच्या निर्णयाकडे दृष्टी रोखून ठेवली. ते स्वतः सांप्रदायिक, संकुचित विचाराचा स्वीकार करण्यापासून दूर राहिले. व्यक्तीची मूलभूत प्रतिष्ठा आणि स्वातंत्र्य यावरील विश्वास आणि निष्ठा आयुष्याच्या अखेरीपर्यंत त्यांनी अभंग ठेविली. ज्ञानाच्या उपासनेतून सामाजिक क्रांतीला जाणीवपूर्वक चालना देऊन समाजपरिवर्तनाचं ध्येय गाठण्यासाठी राबणारा आणि बहुजन समाजापर्यंत सुखाचा प्रकाश पोहोचवून समाजाला सुखाच्या मार्गानं वाटचाल करावयास उद्युक्त करणारा, प्रेरणा देणारा अभ्यासू, दूरदर्शी, मुत्सद्दी, समाजवादी अग्रगण्य लोकनेता हीच ध्येयनिष्ठा यशवंतरावांची भारतीय लोकमानसातील प्रतिमा आहे.
देशनिष्ठा, बुद्धिनिष्ठा, नीतिनिष्ठा, ध्येयनिष्ठा आणि या सर्वांना ओलांडून जाणारी जन्मजात मातृनिष्ठा असं हे यशवंतरावांच्या जीवनाचं पंचामृत आहे. यातील एकेक अलग करून किंवा एकत्रिपणे, कसंही चाखलं तरी मधुरता सारखीच !