छत्रपती शिवराय या महाकाव्यावर व एकूणच काव्यावर कुसुमाग्रज फारच छान बोलले त्या दिवशी. त्या अगोदर भाऊसाहेब खांडेकरांचेही कवी यशवंतांच्या रविकिरण मंडळातील आठवणी सांगणारं, अत्यंत दुर्मिळ संदर्भ देणारं रंगतदार भाषणही झालं होतं.
शेवटी अध्यक्ष म्हणून यशवंतराव काय बोलतात यासाठी जमलेल्या महाराष्ट्रातील निवडक वक्ते, साहित्यिक व शिवप्रेमींची उत्सुकता कमालीच्या शिगेला पोचली. ही खरे तर यशवंतरावांच्या वक्तृत्वकलेचीच कसोटी होती.
-- आणि त्या दिवशी यशवंतरावांनी आपल्या आयुष्यातील एक अविस्मरणीय व्याख्यान व तेही अगदी सहजपणे दिलं. वीस वर्षांनंतरही त्यांनी त्या वेळी पहिलंच जे वाक्य व ज्या सफाईदार मराठमोळ्या बोलीत उच्चारलं होतं ते आजही मला स्पष्ट आठवतं ! रिवाजाचं सर्व प्रास्ताविक आपल्या नेहमीच्या ऐटदार ढंगात करून यशवंतराव त्या वेळी म्हणाले होते -
''मैतरणी बिगी बि गी चाल - असं म्हणत महाराष्ट्राच्या दर्याखोर्यात भटकणारे रांगडे कवी यशवंत आज शिवप्रभूंच्यावर हे समर्थ महाकाव्य रचून महाकवींच्या दालनात जाऊन बसलेत याचा त्यांचा चाहता म्हणून मला आज अतिशय आनंद होत आहे !''
त्यांच्या ह्या सहज व रास्त अशा पल्लेदार वाक्यानं क्षणभर सलामीच्याच टाळ्या घेतल्या ! ती सुरुवातच अगदी अनपेक्षित होती.
''न्याहरिचा वकुत होईल -
मैतरणी बिगी बिगी चाल''
ह्या कवी यशवंतांच्या एका गाजलेल्या गीताच्या 'मुखड्याच्या ओळी' जमलेल्या रसिकांच्या स्मृतिकाषातून त्यांनी तरारून अशा एकाकू जबरदस्त वाक्यात खेचून बाहेर घेतल्या होत्या. आपल्या त्या जवळ जवळ विस्मृत गीताचा एवढा वाजवी व रोकडा प्रत्ययय प्रत्यक्ष यशवंतरावांनी सहज दिलेला पाहून साक्षात कवी यशवंतांनीच सद्गदित होऊन चष्मा काढून डोळे टिपल्याचे अनेकांनी पाहिले. यशवंतरावांनी ती कसोटीची सभा सहज जिंकली.
त्या सलामीच्या लढतीनंतर उभं बालगंधर्व सुमारे तासभर कान टवकारून यशवंतरावांच्या तोंडून राजाराम कॉलेजच्या आठवणी, ४२ चा लढा, शिवरायांच्या चरित्रातले दुर्मिळ संदर्भ नुसतं ऐकतच राहिलं त्या दिवशी... छतांच्या पंख्यांची घरघरही तेव्हा स्पष्ट ऐकू येत होती. एतकी शांतता, हास्य-विनोद धरून मध्येच आपोआप पसरत होती. खरोखरीच तो प्रकाशन समारंभ एक दुर्मिळ असा साहित्यिक अनुभव होता.
अभिजात साहित्यिकाचंच रसिक मन यशवंतरावांत जन्मजातच वावरत होतं. महाविद्यालयीन विद्यार्थी म्हणून कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयात शिकत असतानाच अनेक नाटके कोल्हापूरच्या भोसले नाट्यगृहात पिटात बसून यांनी पाहिली होती. औंधच्या दाजी गुरवांचा लयदार पखवाज ऐकण्यात अनेक रात्री रंगविल्या होत्या. त्यांनी शाहीर शंकरराव निकम, पिराजीराव सरनाईक, सिद्राम मुचाटे यांचे रसरशीत पोवाडे समोर बसून अनेकदा ऐकले होते. बेचाळीसच्या मंतरलेल्या व भूमिगत काळातील यशवंतरावांच्या, शाहीर निकम यांच्या व शाहीर औंधकर ऊर्फ ग. दि. माडगूळकर यांच्या बैठकींचा उल्लेख तिघेही आवर्जून करीत. होय. ४२ च्या दंगलमय-चैतन्यदायी काळात गदिमा 'शाहीर औंधकर' म्हणून प्रसिद्ध होते !
ही चोखंदळ रसिकता यशवंतरावांच्या बाबतीत मूलभूत त्यांच्या ठायी असलेल्या निखळ देशप्रेमाच्या व जनप्रेमाच्या हातात हात घालून ऐन धामधुमीच्या काळातही नांदत होती आणि हेच त्यांचं आगळेपण होतं. त्या काळातही अंदमानहून परतलेले थोर क्रांतिकारक व पतितपावन हे सर्व जमातींसाठी देशातील पहिले मंदिर उठविणारे थोर क्रियाशील भारतभक्त म्हणून ते स्वा. सावरकरांना रत्नागिरीला जाऊन भेटून आले होते. सावरकर त्या वेळी भारतकीर्त नेते असल्याने या भेटीची व्हावी तेवढी चर्चा तेव्हा व नंतरही झालेली नाही. आज वास्तविक ती व्हायला हवी. अस्पृश्यता हा हिंदू धर्मावरील स्पष्ट कलंक आहे, हे मानणार्या स्वातंत्र्यवीर सावकर व डॉ. आंबेडकर यांच्याबद्दल यशवंतरावांठायी अत्यंत सच्चा व सार्थ असा आदरभाव होता. मॅट्रिकला असतानाच त्यांनी शाळकरी वयात हरिजनांसाठी शाळा काढली होती. त्या वेळी तिच्या उद्धाटनासाठी यशवंतरावांनी कर्हाडात महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांना आवर्जून आणलं होतं. सामाजिक अनिष्ट रूढींनी पछाडेला समाज शिकून ज्ञानी व्हावा ही यशवंतरावांची केवळ करुणा भावाची धारणा नव्हती, तर अभ्यासातून, अनुभवातून आखलेली ती मानवतेची कास धरणारी अत्यंत बलिष्ठ अशी विचारधारा होती. यासाठी महाराष्ट्रासारख्या विशाल व कृषि-औद्योगिक दृष्ट्या झपाट्यानं पुढे झेपावणार्या भू-प्रदेशाचे मुख्यमंत्रिपद ही 'की-पोस्ट' त्यांनी वेळोवेळी आपली खंबीर शब्द भरीला घालून पूर्ण अकरा वर्षे श्री. वसंतराव नाईक या सुविद्य अशा वंजारा समाजातील प्रशासनकुशल नेत्याच्या हाती हेतुतः सोपविली होती.