५३ माँटेगो बे (जमेका)
४ मे, १९७५
गेले दोन-तीन दिवस अनेक प्रश्नांनी माझ्या मनात काहूर मांडले आहे. त्या प्रश्नांची उत्तरे काय आहेत कोण जाणे. पण प्रश्न तरी नेमके काय आहेत व त्यांची उत्तरे काय असावीत वा असू शकतील हे एकदा कागदावर मांडून पहावे असे मनात आले आहे.
कामाच्या व प्रवासाच्या दैनंदिन गर्दीमध्ये आपल्या अंतर्मनात डोकावून पाहाण्यासाठीही सवड व शांतता मिळत नाही. येथील निवांत वातावरणामध्ये ते शक्य होईलसे वाटते. हे लिहिणे (पत्रे) म्हणजे तुझ्याशी केलेली संभाषणेच आहेत. तेव्हा हे सगळे तुझ्याशी बोलायचे नाही तर कोणाशी?
मी सुरुवातीला म्हटले आहे की, गेल्या 'दोन-तीन दिवसांत' प्रश्नांनी काहूर केले आहे. याचा अर्थ ते प्रश्न काही दोन-तीन दिवसांत निर्माण झालेले नाहीत. गेले अनेक महिने व काही वर्षे म्हटले तरी चालेल, हे प्रश्न जमून गेले आहेत.
काही प्रश्न जसजसे उभे राहात गेले त्या त्या वेळी तात्कालिक उत्तरे मिळत गेली. पण सुसंगत उत्तराची आखणी झालेली नाही. ही एक रुखरुख मनाला लागून आहे. येथील मुक्कामात निवांतपणामुळे ही रुखरुख स्वस्थ बसू देईना एवढाच त्याचा अर्थ.
पुढल्या वर्षी तीस वर्षे होतील मी पहिली निवडणूक जिंकून सरकारमध्ये आलो. अनेक अडचणी आल्या. परिश्रम करावे लागले. अनेकांचे आशीर्वाद मिळाले. लौकिक अर्थाने नावलौकिक मिळाला. सत्तेची अनेक स्थाने पाहिली. राज्यात आणि केंद्रात. सामान्य अर्थाने कुणालाही हेवा वाटावा अशी!
मीही अशा स्थानांची महत्त्वाकांक्षा धरली होती हे म्हणणे खरे नाही. किंवा त्यासाठी कुणाच्या पाठीमागे लाचारीने लागलो असेही नाही. परंतु जेव्हा जबाबदारी आली तेव्हा मागे फिरून पाहिले नाही.
अडचणींची व संकटांची कल्पना माझ्याइतकीच तुलाही आहे. कोणत्या परिस्थितीत कोणते काम स्वीकारले व ते का हे तुझ्याइतके दुसऱ्या कुणास माहिती नाही. टीकाकार स्वाभाविकच सत्तेच्या मागे लागले आहेत वगैरे म्हणणार याची मला कल्पना आहे. मी त्यांच्याशी वाद घालायला जाणार नाही.
पण योजून एखादी सत्तेची जागा हस्तगत करावयाची असे मी कधीच केले नाही. पण वस्तुस्थिती आहे की, सातत्याने गेली तीस वर्षे सत्तास्थानावर आहे.
जाणीवपूर्वक सत्तेचा उपयोग समाजाच्या परिवर्तनासाठी करावयाचा माझा प्रयत्न राहिला. नव्या विचारांना सामोरा गेलो, मुख्यत: दलितांबद्दल कणव ठेवून सामाजिक न्याय प्रस्थापित केला पाहिजे ही माझी प्रेरणा प्रथमपासूनची होती. माझ्या हातात संपूर्ण (?) सत्ता होती तेव्हा त्या सत्तेचा आग्रहाने व योजनापूर्ण दृष्टीने आणि वर उल्लेखिलेल्या उद्दिष्टांसाठी उपयोग करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.