आफ्रिका खंडामध्ये अंतर्विरोध फारच आहेत. काही सूक्ष्म आहेत तर काही अगदी उघड आहेत. आज जे सूक्ष्म आहेत ते उद्या उघड होतील.
विकासाचे स्तर आणि गति यांमध्ये फरक आहेत. नैसर्गिक साधने व नेतृत्वाची गुणवत्ता यांमधील फरकांमुळे आज असलेले फरक उद्या वाढतील आणि त्यातून राजकीय समस्या उभ्या राहतील यात शंका नाही.
आफ्रिकन अरब व काळे आफ्रिकन असा प्रश्न आजही काही प्रमाणात आहेच. मुस्लिम आफ्रिका व ख्रिश्चन आफ्रिका असाही सूक्ष्मभाव दिसतो.
श्री. न्येरेरे आणि केनेथ कौंडा यांचे मला महत्त्व वाटते ते यासाठी की, हे सर्व प्रश्न त्यांनी हेरले आहेत आणि त्यांची उत्तरे सापडतील असे विचार व संस्थात्मक संबंध वाढविण्याच्या प्रयत्नात आहेत.
आफ्रिका खंडातील हे विरोध वाढविण्यात पश्चिम युरोप व अमेरिका यांचे हितसंबंध आहेत. हल्ली काही देशांत चीनही प्रयत्नशील आहे. भारताच्या दृष्टीने स्वतंत्र, संपन्न व स्नेही आफ्रिका ही महत्त्वाची गरज आहे. आमच्या विदेश-नीतीचे हे मूल सूत्र राहील.
आज सकाळी एकाएकी श्रीमती पद्मजा नायडू वारल्याचे वृत्त आले. इंदिराजी दु:खी झाल्या. सकाळी एकाएकी मला बोलावून मी आजच दिल्लीला परत जाते, असे म्हणाल्या.
सर्व कार्यक्रम एकदम बदलले. सकाळच्या अधिवेशनामध्ये आल्या परंतु सर्वांना भेटून निरोप घेण्यासाठी. संध्याकाळी ७ वाजता येथून निघाल्या.
त्यांना निरोप देऊन week end साठी सर्व प्रमुख पाहुणे (Tryall in Hanover) या ठिकाणी आलो आहोत. रविवारी संध्याकाळी परत किंग्जटनला जाऊ. उत्तरेच्या किनाऱ्यावरचे एक महत्त्वाचे (नं.२ चे) शहर आहे. या शहरापासून १०-१२ मैलांवर सागराच्या काठी केळी-नारळी यांच्या वनामध्ये छोटेखानी बंगलेवजा कॉटेजमध्ये राहिलो आहोत. भोवताली निसर्ग अगदी रसरसून आहे. पण माझे मन उदास आहे. श्रीमती पद्मजाजींचे सौजन्यपूर्ण, सुसंस्कृत आणि स्नेहशील व्यक्तित्त्व आता यापुढे दिसणार नाही, या विचाराने मन विषण्ण झाले.