५० किंग्जटन
१ मे, १९७५ (सकाळी ६ वाजता)
परवा दुपारी लिहावयास बसेन म्हटले तरी ते शक्य झाले नाही. काहीही करून मी वेळ काढीन म्हणून ठरवले होते. परंतु या परिषदांसाठी आले म्हणजे इतकी कामे व अंतर्गत-औपचारिक इतक्या मीटिंग्ज ठरतात व होत असतात की काही सोय नाही.
परिषदेच्या उद्घाटनाचा भाग समारंभपूर्वक व थाटात पार पडला. भारताच्या पंतप्रधानांना मोठे सन्मानाने वागविले.
जमेकाचे पंतप्रधान मायकेल मॅनले यांचे भाषण फार उत्तम झाले. स्वच्छ, मूलगामी विचार, अचूक व सुरेख शब्दांची निवड - निर्भीड मांडणी आणि सौजन्यता यांचे योग्य मिश्रण भाषणात होते. मला ते भाषण आवडले.
त्यांच्या भाषणाच्या उत्तरादाखल पंतप्रधान श्रीमती गांधी यांचे भाषण झाले. कॅरिबियन* मधील लहानसर बेटावरील जनतेबद्दल त्यात जिव्हाळा होता. जमेकन् संगीताबद्दलचा भावपूर्ण उल्लेख त्यातील नर्म विनोदामुळे अधिक हृदयस्पर्शी झाला. कॉमनवेल्थसंबंधी उल्लेख व अपेक्षाही उत्तम शब्दांत व्यक्त केली. आपल्या पित्याचा उल्लेख अत्यंत समर्पकपणे केला.
टेलिव्हिजनवर सर्व देशभर हे भाषण ऐकले गेले. वृत्तपत्रांत, जनतेला हे भाषण आवडल्याचा आवर्जून उल्लेख होता.
माझा या परिषदेचा पहिला अनुभव आहे. मी गेली दोन्ही अधिवेशने दोनही दिवस सर्व वेळ थांबून बारकाईने ऐकली. पाहिली. आज जागतिक आर्थिक व व्यापारविषयक प्रश्नांची चर्चा होणार आहे. त्यात बोलणारही आहे.
कॉमनवेल्थचे सर्व प्रमुख नेते आले आहेत. ब्रिटिश पंतप्रधानांचे अशा परिषदांत अकारण स्तोम पूर्वी होते म्हणे! परंतु आता बदल दिसतो. अनेक सभासदांपैकी एक मात्र या नात्याने या वेळी तरी वावरत आहेत. तसं म्हटलं तर कुणालाही हेवा वाटावा असे स्थान एकंदर कामकाजात इंदिराबाईंनाच मिळाले असे निर्धास्तपणे म्हणता येईल.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
* दक्षिण अमेरिकेचा ईशान्य किनारा आणि वेस्ट इंडीज बेटे यांच्या मधल्या भागातील समुद्राला 'कॅरिबियन सी' नाव देण्यात आले आहे.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
श्री. विल्सन वक्तशीर येत व बहुतेक सर्व वेळ हजर असत. एक-दोन वेळेस, विशेषत: साऊथ आफ्रिकेच्या प्रश्नाचे वेळी विधायक स्वरूपाचे भाषणही केले. अनुभवी, ज्येष्ठ मुत्सद्याला शोभेसे! परंतु एकंदरीत सर्व सूर खालच्या पट्टीत वाटला. आज व्यापारविषयक चर्चेचा प्रारंभ ते करणार आहेत. पाहू या, काय नवीन कल्पना, वा धोरणे मांडताहेत ते!