५४ किंग्जटन
६ मे, १९७५
संध्याकाळी ६ वाजता परिषद संपली. परिषदेहून हॉटेलमध्ये आल्याबरोबर लगेच भारतीय पत्रकारांशी चर्चा झाली.
रात्री काही सांस्कृतिक कार्यक्रम सरकारमार्फत ठेवला होता पंरतु मी जायचे नाही असे ठरविले. कारण सकाळी लवकर उठून सामानाची आवरा-आवर करून, ९ वाजताचे विमान पकडून, पुढच्या देशी प्रयाण करणे महत्त्वाचे होते.
माझ्या कल्पनेप्रमाणे परिषद चांगली झाली. कॅरीबियनमधल्या छोटया देशांचा हा 'शो' होता म्हटले तरी चालेल. ४०-५० च्या मधली पिढी राज्यकर्ती आहे. आधुनिक शिक्षणामुळे त्यांची समज उत्तम - वागणे-बोलणेही चपखल आणि अनौपचारिक. कामाचा उरक चांगला.
परिषदेचे अध्यक्ष श्री. मॅनली यांनी अतिशय कुशलतेने काम चालविले. ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि हिंदुस्थानचे प्रतिनिधी आपले म्हणणे आवश्यक तेव्हा मुद्देसूद, शांतपणे पण स्पष्टपणे आणि थोडक्यात सांगत असत. उगीच दिमाख दाखविण्याचा प्रयत्न कोणी केला नाही. आम्हीही केला नाही.
महत्त्वाच्या मुद्यावरील निर्णय आम्हाला हवे तसे मिळाले. Nuclear Explosion च्या मुद्यावर कॅनडाचे प्रधानमंत्र्यांनी आज सकाळी नैतिक मुद्यावर (?) तक्रार उभी करून, शांततापूर्ण विधायक कामासाठी अणुस्फोट आणि अणुअस्त्रासाठी अणुस्फोट यांत फरक नाही असे म्हणणे मांडले आणि त्यावर परिषदेचा निर्णय बदलून घेण्याचा डाव टाकला.
परंतु आम्ही आमचे म्हणणे शांतपणे मांडून हा फरक शास्त्रज्ञांनीच मान्य केला आहे असे स्पष्ट केले. नैतिक तक्रारच करावयाची असल्यास अणुअस्त्रांचे मक्तेदार प्रमुख देश आहेत त्यांना उपदेश केला पाहिजे. कारण संहार त्यांच्यामुळे होणार आहे. अण्वस्त्रांसंबंधी आमची नीति पहिल्यापासून स्पष्ट आहे आणि आजही ती आम्ही सोडलेली नाही. गेल्या २५ वर्षांची या देशाची शांततापूर्ण नीति पाहिली असता भारताच्या हेतूबद्दल शंका घेता कामा नये असे विचार मी मांडले.
कॅनडाने आम्हाला प्रारंभापासून या क्षेत्रात सहकार्य केल्याबद्दल खरे म्हणजे आम्ही त्यांचे महत्त्व मानतो. त्यांनी अकारण गैरसमज करून घेऊन या प्रश्नात कटुता वाढवू नये असेही सांगितले.
प्रधानमंत्र्यांनी धोरण बदलून मला फक्त हा नैतिक प्रश्न म्हणून उठवावयाचा आहे. ठरावाची भाषा बदलण्याचा आग्रह धरून हिंदुस्थानशी मतभेद वाढवावयाचे नाहीत अशी सामोपचाराची भाषा वापरली आणि हा एक वादग्रस्त प्रश्न या परिषदेपुरता तरी संपला.
परंतु माझ्या कल्पनेप्रमाणे हे प्रकरण वारंवार उपस्थित केले जाणार आहे. आशिया खंडातील आणि हिंदी महासागरातील इतर देशांचे मनांत भारताबद्दल संशय व भीति वाढविण्याचा यात डाव आहे. हा डाव खेळणारांना साथ मिळणारच नाही असे नाही.
गेले आठ दिवस येथे काढले. दिवस कसे जातात हेच समजत नाही. निसर्ग-सौंदर्य, संगीत आणि मित्रभाव यासाठी हा देश नित्य स्मरणात राहील. अनेक खंडांतील व वंशांतील लोक एकमेकांत मिसळून एक देश बनलेला आहे. "Out of many, one people" हे या देशाचे ब्रीदवाक्य (Motto) आहे.
पुण्याचे एक महाराष्ट्रीय जोडपे येथे मुद्दाम भेटावयास आले होते. १०-१२ वर्षे इथे आहेत. चांगली नोकरी व पगार आहे. परंतु त्यांचे मन अजून येथे लागलेले नाही. परत केव्हा जाऊ असे बाई अगदी डोळयांमध्ये पाणी आणून सांगत होत्या.
मी त्यांना वरील ब्रीदवाक्याची आठवण करून दिली तेव्हा त्या म्हणाल्या की, आम्ही येथे अजून पाहुणेच आहोत. मुलाबाळांच्या शिक्षणासाठी, विशेषत: मुलीच्या शिक्षणासाठी व संस्कारांसाठी परत गेलेच पाहिजे. मध्यमवर्गीय भारतीय प्रतिक्रियेचा एक नमुना म्हणून हे नमूद केले आहे.
नवा देश बनत असतो तेव्हा जुने मोहपाश-सर्व प्रकारचे-तुटून जावे लागतात. जुन्याच्या राखेतून नव्याचा जन्म होतो. भारत खऱ्या अर्थाने नवा व्हावयाचा असला तर जुने मोडून-तोडून टाकल्याशिवाय गत्यंतर नाही. कदाचित हे कुणाला अतिरेकाचे वाटेल. एकांगी वाटेल. पण मला वाटते, इतिहासाचा अर्थ असाच दिसतो.