४९ किंग्जटन
२५ एप्रिल, १९७५
मुंबईत दीड तास थांबलो होतो. घरचे कोणी आले होते की काय ते समजले नाही. प्रधानमंत्र्यांच्या लवाजम्यात काही पत्ताच लागला नाही. गव्हर्नर व मुख्य मंत्री सपत्निक हजर होते. त्यांनी सर्वांना चालत विमानतळाच्या मजल्यावर नेले. त्यामुळे कोणीच भेटू शकले नाही.
श्री. बाळासाहेब देसाई इंदिरा गांधींची भेट व्हावी म्हणून उभे होते. पण ते घडले नाही. मजजवळ आले. मी प्रकृतीची चौकशी केली. बरी नाही म्हणाले. श्रीमती गांधींची भेट न झाल्याने निराश होऊन परतले.
बरोबर ९। वाजता निघालो. थोडे खाऊन घेतले. इंदिराबाईंशी किरकोळ गप्पा झाल्या. जमैकन प्रधानमंत्र्यांनी लिहिलेले ''पॉलिटिक्स अॅण्ड चेंज'' हे पुस्तक मजजवळ होते. ते पाहण्यासाठी त्यांना दिले.
थोडा वेळ वाचले आणि १०॥ वाजता झोपी गेलो. जवळ-जवळ १० तासांचे उड्डाण आहे. मी ६-७ तास झोपलो. इंदिराबाई तर ९ तास शांत झोपल्या होत्या.
लंडनला पोहोचल्यावर श्री. बी. के. नेहरू हजर होतेच. दीड-दोन तास ते होते. बराच वेळ इंदिराबाईंशी बोलत बसले होते. त्यात काही खाजगी, काही सार्वजनिक असावे. परतताना लंडन येथे बाईंनी नकार दिलेला कार्यक्रम त्यांनी स्वीकारावयास लावला. परतताना मी लंडनमध्ये थांबत नाही म्हणून ते बरेच नाराज दिसले. परंतु काम नसताना थांबण्यात अर्थ काय! गेल्या महिन्यात तर मी थांबलोच होतो. कशी तरी समजूत काढली.
पुन्हा १० तासांचा प्रवास. मी सर्व वेळ वाचनात काढला. किंग्जटनला पोहोचेपर्यंत घडयाळात बदल न करता भारतीय स्टँडर्ड टाइम मी ठेवले होते. त्या अंदाजाने तिथल्या वेळेप्रमाणे दुपारचे लंच घेतले. दिल्लीहून निघाल्यापासून बरोबर २५ तासांनी किंग्जटनला पोहोचलो.
यातले शेवटचे चार तास प्रकाश होता. बाकीचा प्रवास - अवती - भोवती रात्रच होती. किंग्जटनला पोहोचलो तेव्हा सकाळचे ९.३५ झाले होते. आगत-स्वागत झाले. येथील प्राईम मिनिस्टर स्वागतासाठी आले होते.
या बेटावर इंदिराजींच्या आगमनाचे मोठे कौतुक होते. संध्याकाळी टेलिव्हिजनवर त्यांची बऱ्यापैकी मुलाखत दाखविली.
येथे या परिषदेला जोडून इंग्लंडच्या राणीची भेट ठेवली असल्यामुळे वृत्तपत्रांत सर्वत्र त्या राणीसाहेबांच्या तसबिरी पाने भरभरून होत्या.
येथे पोहोचल्यावर मात्र मला थकवा वाटला. काही तातडीचे कार्यक्रम नसल्यामुळे दुपारी ४-५ तास झोपून काढले. परिषदेच्या कामाच्या तयारीबाबत माहिती घेतली.
श्री. केवलसिंग यांनी श्री. टी. के. कौलचा निरोप आणला आहे की मी जाताना न्यूयॉर्कमध्ये थांबू नये. डॉ. किसिंजर भेटण्याची इच्छा दाखविण्याची शक्यता आहे. आणि तसे झाले तर नाही म्हणणे बरे दिसणार नाही. या वेळी भेटण्यात फारसा फायदा नाही.
अजून काही निर्णय घेतला नाही. आज-उद्या ठरवीन. आज दुपारी ११ वाजता परिषद सुरू होईल. (सकाळी ६ वाजता हे लिहीत आहे. परत दुपारी लिहीन.)