विदेश दर्शन - १२

यशवंतरावांनी जे आणि जसं लिहिलं ते जसेच्या तसे प्रकाशित करीत आहे. यांतील फक्त पहिली दोन पत्रे, भारतातील, आसामच्या दौऱ्यातील आहेत. अन्य सर्व विदेश-दौऱ्यात लिहिलेली आहेत. संरक्षणमंत्री, अर्थमंत्री, विदेशमंत्री असतांना त्यांनी जे लिहिलं ते सर्व वेणूताईंना समोर ठेवून लिहिलं आहे.

तरीपण पति-पत्नीमधील पत्रव्यवहार असा केवळ व्यक्तिगत संदर्भ येथे उरलेला नाही. स्वतंत्र भारताच्या एका विशिष्ट काळातील परिस्थितीचे, इतिहासाचे, विकसनशील राष्ट्राच्या भूमिकेचे स्पष्टीकरण यात नोंद झालेले आहे. त्याचबरोबर त्या कालखंडातील एक मुत्सद्दी, विचारवंत, साहित्यिक, असं त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचं आगळं दर्शन घडतं.

अर्थमंत्री आणि विदेशमंत्री असतांना जागतिक अर्थमंत्रि-परिषदेत आणि नंतर विदेशमंत्री असताना संयुक्त राष्ट्र संघाच्या (यूनो) आमसभेत, जगातील ज्येष्ठ विचारवंतांच्या उपस्थितीत त्यांनी भारताची, विकसनशील राष्ट्रांची जी अभ्यासपूर्ण आणि स्पष्ट शब्दांत कैफियत सादर केली ती त्यांची दोन स्वतंत्र भाषणे या ग्रंथाच्या परिशिष्टात समाविष्ट केली आहेत. त्यातून त्यांच्या भूमिकेचं, विचारांचं दर्शन घडतं. एक भाषण १९७१सालीच त्यांनी माझ्याकडे स्वत:च पाठविले होते. दुसरे विदेशमंत्रिपदाच्या कारकीर्दीतील आहे.

प्रवासी यशवंतरावांचे हे विचारधन प्रवास करीत वेणूताईंपर्यत पोहोचले. पुन्हा प्रवास करीत माझ्या भेटीला आले. वाचकांच्या भेटीसाठी त्याला पुन्हा प्रवास सुरू करावा लागला आहे! त्याचं आणि वाचकांचं मनोमीलन घडावं, प्रवास सफल संपूर्ण व्हावा हीच अपेक्षा!
शुभास्ते पंथान: सन्तु!

 -रामभाऊ जोशी