१० पॅरिस
१९ सप्टेंबर, १९७१
मुंबईहून निघाल्यानंतर बरोबर १६॥ तासांनी पॅरिसमध्ये पोहोचलो. येथे येईपर्यंत मी माझे घडयाळ भारतीय वेळेप्रमाणेच ठेवले होते म्हणून लक्षात आले. वाटेत बेरुत, रोम, फ्रँकफर्ट येथे थांबावे लागले. फ्रँकफर्टमध्ये एअर इंडिया बदलून एअर फ्रान्स मधून पॅरिसचा प्रवास केला.
पॅरिसच्या विमानात बसताना ध्यानात आले की, आमच्या सामानांपैकी दोन बॅगा बेपत्ता आहेत. त्या दिल्लीतच राहिल्या, की एअर इंडियाच्या जम्बोमधून लंडन, न्यूयॉर्कला गेल्या याचा काहीच अंदाज येत नव्हता. श्री. माधव गोडबोले यांनी सर्व ठिकाणी निरोप ठेवून शोध करण्यास सांगितले होते. परंतु कोणत्या दोन बॅगा नाहीत याचा काहीच अंदाज नव्हता.
माझ्या कपडयांच्या दोन्ही बॅगा गेल्या असतील तर अंगावरचे कपडे व हातातील छोटया बॅगेतील एक दोन शर्टस् खेरीज मजजवळ काहीच नव्हते. नाही म्हटले तरी काहीशी चिंता, काहीसा विनोद अशी संमिश्र भावना मनात येऊन गेली.
पॅरिसमधला कालचा सर्व दिवस मुंबईहून निघताना घातलेल्या कपडयातच घालविला. रात्री लक्षात आले की, माझी एक कपडयाची बॅग आहे. दुसरी बेपत्ता आहे. (ज्यात सूट्स्, शर्टस्, पायमोजे बूट, टोप्या, बनियन्स वगैरे होते.) मी म्हटले नाही सापडली तरी शेरवाणी व चुरीदारवर आपले काम चालवून नेऊ. पण सुदैवाने सकाळी लंडनमार्गे दुसरी बॅग परत पॅरिसमध्ये पोहोचली.
या सर्व हवाई सफरीमध्ये सामान सुरक्षित राहणे हे प्राण सुरक्षित राहण्याइतकेच महत्त्वाचे व सोयीचे आहे असे दिसते.
इथपर्यंत प्रवास तर मजेत झाला. जम्बोमधून पहिला प्रवास. अगदीच अगडबंब काम आहे. दुमजली इमारतीत बसल्यासारखे वाटते.
एअर इंडियाने हवेतील राजवाडा असे याचे वर्णन केले आहे. सुखसोयी व इंटिरिअर डेकोरेशन वगैरे उत्तम आहेत. गोपी व कृष्णलीलेच्या चित्रमालांनी सर्व काही सजविले आहे. राजस्थानी रंगीबेरंगी पेहरावातील एक देखणी हवाई सुंदरी राधेशी स्पर्धा करीत होती म्हटले तरी चालेल.
मला एक नवी आणि आवडलेली नवी गोष्ट म्हणजे आपल्याच जागेवर बसून आपल्या कानामध्ये प्लगज् घालून भारतीय व पाश्चिमात्य संगीत ऐकण्याची सोय सर्व प्रवासभर आहे. मी निघालो त्या रात्री नाही पण दुस-या दिवशी सकाळी याचा भरपूर आनंद लुटला.
निघालो त्या रात्री झोप मात्र म्हणावी तशी झाली नाही. पाच एक तास अधूनमधून जाग येत पडून होतो. रात्र असल्यामुळे बाहेर काही दिसत नव्हते. तेव्हा पडून राहण्यातच शहाणपण होते. उजाडल्यानंतर रोमपासून फ्रँकफर्टपर्यंतचा प्रवास मस्त झाला. अधूनमधून विस्तीर्ण समुद्र दिसत होता. एकाकी 'एल्बा' बेट स्वच्छ आकाशामुळे मधेच दृष्टीस पडले, आणि नेपोलियनचे शेवटचे खडतर दिवस मनापुढे येऊन गेले.