केरळात संमिश्र शासन (Coalition) किती यशस्वी होईल हे सांगणे आज अवघड आहे. परंतु केरळात तरी ते अपरिहार्य आहे यात मुळीच शंका नाही. कार्यक्रमावर आधारित असे उजव्या कम्युनिस्टांशी सरकारमध्ये सामील होऊन सहकार्य करण्याचा हा पहिला प्रयोग आहे. कठीण प्रयोग आहे. आपल्या पक्षाच्या स्वार्थासाठी संयुक्त आघाडी वापरण्याचे कम्युनिस्टांना बाळकडू आहे. ते तसे केरळमध्ये करणारच नाहीत हे सांगणे अशक्य आहे.
छोटया राज्याच्या अंतर्गत परिस्थितीमुळे अपरिहार्य झालेले हे पाऊल उद्या कदाचित् ७१साली केंद्रीय निवडणुकांचे वेळीही उचलावे लागणार काय हा महत्त्वाचा धोरणाचा प्रश्न बनला आहे. केंद्रीय सरकारमध्ये कम्युनिस्टांना सामील करून घेऊन काम चालवायचे की काय या प्रश्नावर बरीच रणधुमाळी माजणार असे दिसते.
या कल्पनेला माझा सक्त विरोध आहे. कदाचित् यातून दुरावाही निर्माण होण्याचे भय आहे. परंतु काय करणार?
भारताकडे परत निघताना माझ्या मनापुढे अशा अनेक चिंता वाढून ठेवल्या आहेत. परंतु सावधानतेने आणि विचारपूर्वक त्यांना तोंड द्यावेच लागेल.
प्रकृति सामान्यपणे बरी राहिली. बरोबर दिलेल्या औषधांपैकी, एक ए. पी. सी. आणि दुसरे एक मलम यांचे खेरीज कशाची गरज लागली नाही हे भाग्यच म्हणावयाचे!