विदेश दर्शन - २७

श्री. मॅक्नामारा यांचे भाषण बँकेच्या कामाला नवी दिशा द्यावी ही जी त्यांची तळमळ आहे त्याला साक्ष देणारे ठरले. भाषणाच्या शेवटी शेवटी तर ते काहीसे गहिवरले!

त्यांचा प्रमुख मुद्दा असा होता की, निव्वळ आर्थिक विकासाने प्रश्न सुटणार नाहीत असे अनुभवास आले आहे. सामाजिक परिवर्तन करण्याचे सामर्थ्य निव्वळ आर्थिक विकासात आढळत नाही. निव्वळ विकासाबरोबर विषमताहि वाढत जाते. जागतिक बँकेने भविष्यासाठी आपल्या कामाची दिशा ठरविताना याही प्रश्नाचा सखोल विचार करण्याची गरज आहे. आणि हे विवेचन रास्त आहे.

येथेही प्रगत व समृध्द देश आणि अविकसित देश असे महत्त्वाचे दोन गट उघडच दिसून येत होते. दोघांनाही चिंतित करणा-या समस्या आहेत. परंतु त्यांचे स्वरूप वेगवेगळे आहे. त्या सोडविण्याचे मार्गही अलग आहेत.

समृध्द देशांची चिंता त्यांच्या देशांत एकसारखी वाढत राहिलेली चलनवाढ (Inflation) आहे. या बाबतीत अमेरिकेची चिंता फार मोठी आहे. त्यांनी मार्ग सुचविला आहे. 'Flexible exchange rate' चा. परंतु त्याला प्रमुख विरोध आहे फ्रान्सचा. युरोपीय सर्व राष्ट्रे-इंग्लंडसुध्दा- फ्रान्सला पाठिंबा देत आहे. अमेरिकेने अंदाज पाहून आपला आग्रह अधिक रेटण्याचा प्रयत्न केला नाही.

अविकसित राष्ट्रांचे प्रश्न (भारतही त्यात सामील आहे) जवळ जवळ मूलत: एकसारखेच आहेत. या सर्व प्रश्नांचा उल्लेख माझ्याप्रमाणे इतर गव्हर्नर्सनींही आपापल्या भाषणात आग्रहपूर्वक आणि निर्भीडपणे केला. या प्रश्नांचा काहीसा उल्लेख निकोसिया येथून जे लिहिले त्यात केला आहे.

आज समारोपाची भाषणे झाली त्यांत श्री. स्वाइट्झर व श्री. मॅकनामारा या दोघांनींही या प्रश्नांचा आवर्जून उल्लेख करून त्या बाबतीत मार्ग काढण्याची आवश्यकता आहे असे सुचविले. त्या बाबतीत अधिक विस्ताराने विचार करण्याचे अभिवचन दिले. या बाबतीत प्रधानमंत्र्यांना पाठविण्याचा माझा अहवाल आजच पुरा करून घेतला.

उद्या सकाळी येथून निघेन. जवळ-जवळ दोन आठवडयांनी परत घरी येण्यास मी कसा अगदी उत्सुक आहे. पहिल्या आठवडयानंतरच परत जावेसे वाटू लागले होते. अगदी एकटे राहणे किती अवघड आहे हे पुन्हा एकदा अनुभवले. तुम्ही सर्वजण माझ्या लहान-सहान गोष्टी इतक्या करत असता की, मी एकटा असलो की अगदी लहान मुलासारखी माझी परिस्थिती होते. श्री. माधव गोडबोले माझी फारच काळजी घेत आहेत.

येथे आल्यानंतर महत्त्वाची व चांगली बातमी जी ऐकली ती केरळच्या निवडणूक निकालाची. आमचा काँग्रेस पक्ष केरळात विजयी झाला हे भविष्याच्या दृष्टीन उत्तम झाले. देशव्यापी व सर्वत्र संघटना असलेला असा 'राष्ट्रीय काँग्रेस' हाच पक्ष होता. त्याचा खरा वारसा आमच्या पक्षाकडेच आहे असे लोकमतावरून दिसून आले.